दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार विभागाने नागरिकांना बनावट सिम कार्ड मिळवणे तसेच दूरसंचार आयडेंटिफायर्सचा गैरवापर करणे किंवा आयएमईआय क्रमांकात छेडछाड करणे यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे
Posted On:
21 SEP 2026 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,21 सप्टेंबर 2026
दूरसंचार विभागाने मध्य प्रदेश परवानाकृत सेवा क्षेत्र अंतर्गत फसव्या बनावट सिम कार्ड वितरणाविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. अलीकडेच काही सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान असे दिसून आले की, छत्तीसगडमधील एका पॉइंट ऑफ सेल (PoS) एजंटने 25 बनावट मोबाईल कनेक्शन्स बेकायदेशीरपणे सक्रिय केले होते. या एजंटने नागरिकांच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या संमतीशिवाय हे सिम कार्ड चालू केले होते.
हे लक्षात येतात दूरसंचार विभाग आणि सेवा प्रदाता कंपनीने या पॉइंट ऑफ सेलला लगेच कायमचे काळ्या यादीत टाकले आहे त्यामुळे भविष्यात ते फसव्या पद्धतीने सिम कार्ड वितरण करु शकणार नाहीत. या सर्व 25 मोबाईल कनेक्शन्सना दूरसंचार विभागाच्या डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म द्वारे तपासण्यात आले आणि संशयास्पद आढळलेल्या सर्व कनेक्शन्सची पुनर्पडताळणी करण्यात आली. पडताळणीत बनावट आढळलेले सर्व नंबर बंद करण्यात आले आहेत.
दूरसंचार विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना
बनावट सिम कार्ड चे वितरण करणे, दूरसंचार आयडेंटिफायर्सचा गैरवापर करणे किंवा आयएमईआय क्रमांकात छेडछाड करणे हे गैरप्रकार दूरसंचार कायदा 2023 अंतर्गत दंडात्मक अपराध असल्याचा पुनरुच्चार दूरसंचार विभागाने केला आहे. अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास दोषी व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतचा कारावास आणि 50 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. दूरसंचार सेवेशी निगडित फसवणूक रोखण्यासह, नागरिकांना संरक्षण पोहोचवणे आणि एक सुरक्षित आणि विश्वासार्ह दूरसंचार परिसंस्था सुनिश्चित करण्यासाठी दूरसंचार कायदा 2023 मधील तरतुदींचे आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
नागरिकांनी आपल्या नावावर असलेले सिम कार्ड कोणालाही हस्तांतरित करु नये किंवा वापरण्यास देऊ नये कारण सिम कार्डचा गैरवापर झाला तर ते मुळात ज्याच्या नावावर सिम कार्ड आहे त्याच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांना नियमितपणे आपल्या मोबाईलचे कनेक्शन संचार साठी पोर्टल (www.sancharsaathi.gov.in) किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून पडताळून पाहण्याचा सल्ला विभागाने दिला आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्याला आपल्या नावे किती सिम कार्ड आहेत हे पाहता येते आणि ज्यांची आवश्यकता नाही किंवा जे सिम कार्ड मुळात त्यांचे नाही, ते ब्लॉक करता येते. एक सुरक्षित आणि निर्भय दूरसंचार परिसंस्था उभारण्यासाठी आणि दूरसंचार सेवेच्या साधनसंपत्तीचा गैरवापर करुन होणारी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी या उपाययोजना महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण भारतात मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांच्या जलद विस्तारामुळे, सिम कार्ड, दूरसंचार ओळखपत्रे, ज्यामध्ये मोबाईल उपकरणांच्या इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी (आयएमईआय) क्रमांकाचा समावेश आहे, यांचा गैरवापर ही एक गंभीर चिंतेची बाब म्हणून समोर आली आहे. अशा गैरवापरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला तसेच दूरसंचार सेवांच्या सुरक्षा आणि अखंडतेला धोका पोहोचतो. युनिक दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये छेडछाड करणे किंवा त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर कायदेशीर तरतुदी लागू केल्या आहेत.
नागरिकांनी काय टाळावे
दूरसंचार विभागाने नागरिकांना खालील गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
बदलता येण्याजोगा किंवा फेरफार केलेला आयएमईआय क्रमांक असलेल्या मोडेम, मॉड्यूल, सिम बॉक्स किंवा इतर उपकरणांचा वापर करणे, ती मिळवणे किंवा एकत्र जोडणे;
बनावट कागदपत्रे, फसवणूक, कपट किंवा बनावट ओळख वापरून सिम कार्ड मिळवणे;
स्वतःच्या नावावर मिळवलेली सिम कार्डे इतरांना हस्तांतरित करणे, विकणे किंवा सुपूर्द करणे, जे त्यांचा गैरवापर करू शकतात;
मोबाइल ॲप्लिकेशन्स, संकेतस्थळे किंवा इतर कोणत्याही माध्यमांचा वापर करून कॉलिंग लाइन आयडेंटिटी (CLI) किंवा इतर दूरसंचार ओळख क्रमांकांमध्ये बदल करणे;
स्वतःच्या नावावर सिम कार्ड घेऊन ते पुढे सायबर फसवणूक किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने इतरांना उधार देणे, भाड्याने देणे किंवा हस्तांतरित करणे, ज्यामुळे मूळ ग्राहकावर कायदेशीर जबाबदारी येऊ शकते;
आणि
छेडछाड केलेल्या आयएमईआय क्रमांक असलेल्या उपकरणांचा वापर करणे, फसवणुकीच्या मार्गाने सिम कार्ड मिळवणे किंवा त्यांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींना सिम कार्ड हस्तांतरित करणे, यामुळे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात.
संचार साथीच्या माध्यमातून पडताळणी आणि तक्रार नोंदणी
केंद्र सरकारने दूरसंचाराशी निगडित साधनसंपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी आणि भारताच्या दूरसंचार परिसंस्थेला सुरक्षित करुन सक्षम करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. नागरिक त्यांचे मोबाईल कनेक्शन्स आणि उपकरणे सुरक्षित करण्यासह त्यांची पडताळणी करण्यासाठी संचार साथी उपक्रमाअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. नागरिकांनी कायम सतर्क राहावे आणि संचार साथी उपक्रमाअंतर्गत उपलब्ध असलेल्या डिजिटल साधनांचा वापर करुन त्यांचे मोबाईल हॅंडसेट्स सत्यापित आणि सुरक्षित करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
संचार साथी प्लॅटफॉर्मवर 'तुमच्या मोबाईल हँडसेटची सत्यता तपासा' या सुविधेचा वापर करून मोबाईल हँडसेटच्या आयएमईआय तपशिलाची पडताळणी करता येते. ही सेवा नागरिकांना त्यांच्या उपकरणाशी संबंधित माहिती म्हणजेच ब्रँडच नाव, उत्पादकाबद्दल माहिती उपलब्ध करुन देते.
नागरिकांनी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध नागरिक-केंद्रित सेवांचा लाभ घेण्यासाठी www.sancharsaathi.gov.in येथील संचार साथी पोर्टलला भेट द्यावी किंवा संचार साथी मोबाईल ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अँड्रॉइडसाठी: https://play.google.com/store/apps/details?id=com.dot.app.sancharsaathi
आयओएससाठी: https://apps.apple.com/app/sancharsaathi/id6739700695
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2313415)
अभ्यागत कक्ष : 32