सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतीचिन्हांच्या केलेल्या ई-लिलाव 2026 मध्ये गुजरातचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक कलाकृती दर्शवणाऱ्या वस्तूंचा समावेश
गुजरातमधील पारंपारिक हस्तकला, स्थापत्य वारसा आणि आधुनिक नवकल्पनांना 8 व्या पीएम स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावात स्थान
Posted On:
21 SEP 2026 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2026
‘पंतप्रधानांना मिळालेल्या स्मृतिचिन्हांच्या ई-लिलाव-2026’ च्या आठव्या आवृत्तीत गुजरातमधील स्मृतिचिन्हांचा वैविध्यपूर्ण संग्रह आहे. हा संग्रह गुजरातराज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपारिक कला आणि हस्तकला, स्थापत्यकलेचा वारसा, वस्त्रे प्रावरणे आणि आधुनिक कलेचे दर्शन घडते . हा संग्रह गुजरातच्या सांस्कृतिक अस्मितेची वैशिष्ट्यपूर्ण ओळख असून, राज्याच्या चिरंतन परंपरा आणि आधुनिक भारताच्या उभारणीतील त्याचे योगदान अधोरेखित करतो.
गुजरातचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक भारत यांचा संगम
गुजरात मधील या संग्रहात राज्याचा स्थापत्य वारसा, पारंपारिक वस्त्रोद्योग कला, स्थानिक पारंपरिक चित्रकला, क्रीडा क्षेत्रातील कामगिरी आणि तांत्रिक प्रगती दर्शवणाऱ्या स्मृतिचिन्हांचा समावेश आहे.

वडनगर इथल्या 17 व्या शतकातील हटकेश्वर महादेव मंदिराचे स्थापत्य दर्शवणारे स्मृतीचिन्ह. यात, रामायण आणि महाभारतातील प्रसंगांवरून प्रेरित अशी वैशिष्ट्यपूर्ण सजावट आणि कलाकुसर दर्शवण्यात आली आहे.

गुजरातचे टेबल टेनिसपटू मानव ठक्कर यांनी खेळाशी संबंधित दिलेली संस्मरणीय भेट; त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

पारंपरिक शैलीतील 'माता-नी-पचेडी' या 'जीवन वृक्षाचे' (Tree of Life) हे कापडावरील चित्र; ही कलाकृति विद्वत्ता, सामर्थ्य, समृद्धी आणि सर्व सजीवांमधील परस्परसंबंध दर्शवते.

चौकटीत बसवलेले 'पिठोरा' चित्र, जे, मध्य गुजरातमधील राठवा, भिल्ल आणि भिलाला समाजाशी संबंधित आहे. यात पिठोरा कलेशी निगडित सांस्कृतिक आणि श्रद्धा दर्शवणारे घोडे, देवता आणि विविध चिन्हे तसेच नक्षीकामांचा समावेश आहे.

काचेत कोरण्यात आलेले मोढेरा येथील सूर्य मंदिराची प्रतिकृति.गुजरातचा वारसा आणि सौर उर्जेतील भारताची तत्कालीन प्रगती यांचा संगम.
या लिलावात गुजरातचा सांस्कृतिक वारसा आणि विकास दर्शवणाऱ्या इतरही काही स्मृतीचिन्हांचा समावेश आहे; यामध्ये अंबाजी मंदिर, सोमनाथ मंदिर आणि द्वारकाधीश मंदिर यांची प्रतिकृती; पारंपरिक भुजोडी शाल आणि लिप्पन कलाकृती; राजकोटमधल्या एम्स (AIIMS)ची लाकडी प्रतिकृती; वास्तूकलेचा उत्कृष्ट नमूना असणारी अडलजची वाव अर्थात अडलज मधील पायऱ्यांची विहीर दर्शवणारे लाकडाचे स्मृतीचिन्ह; तसेच टाटा इलेक्ट्रॉनिक्सची 'चर्खा टू चिप्स' (Charkha to Chips) अशी शीर्षके असलेली सेमीकंडक्टरविषयक स्मृती-पट्टिका यांचा समावेश आहे.
पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई-लिलावाच्या आठव्या आवृत्तीची सुरुवात 17 सप्टेंबर 2026 रोजी झाली आहे. देशाच्या विविध कलात्मक परंपरा, पारंपरिक हस्तकला, सांस्कृतिक प्रथा, आध्यात्मिक परंपरा आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरी दर्शवणाऱ्या देशभरातील एकूण 1,498 स्मृतिचिन्हांचा या लिलावात समावेश आहे.
हा लिलाव नवी दिल्लीतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए), यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित केला जातो. या उपक्रमाद्वारे नागरिक, संग्राहक , संस्था आणि कलाप्रेमींना विविध प्रसंगी पंतप्रधानांना मिळालेल्या अद्वितीय अशा भेटवस्तू प्राप्त करण्याची संधी मिळते.
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावातून मिळणारा निधी 'नमामि गंगे' अभियानासाठी वापरण्यात येणार आहे. गंगा नदी आणि तिच्या परिसंस्थेचे जतन, पुनरुज्जीवन आणि संरक्षण यांसाठी समर्पित असलेली ही एक राष्ट्रीय मोहीम आहे. हा उपक्रम भारताचा सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय पर्यावरण या प्रमुख अभियानांची सांगड घालतो.
जानेवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या 'पंतप्रधान स्मृतीचिन्ह ई-लिलाव' उपक्रमाच्या मागील आवृत्त्यांच्या माध्यमातून 'नमामि गंगे' प्रकल्पासाठी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारला गेला आहे.
‘पंतप्रधान स्मृतिचिन्हांचा ई-लिलाव 2026’ https://pmmementos.gov.in/#/ या अधिकृत पोर्टलद्वारे ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे.
राधिका अघोर/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2313226)
अभ्यागत कक्ष : 5