गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकातील हुबळी येथील जे जी एम एम वैद्यकीय महाविद्यालय आणि केएलई रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या परिसराला दिली भेट


शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून केएलई गेल्या 110 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करत आहे

250 एमबीबीएस जागा आणि 1,200 खाटांच्या या नव्या सुविधेत 300 खाटा गरीबांसाठी राखीव; कर्नाटकात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा विस्तारण्याच्या दिशेने नवा टप्पा

Posted On: 19 SEP 2026 8:58PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज कर्नाटकातील हुबळी येथील जे जी एम एम वैद्यकीय महाविद्यालय आणि केएलई रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या परिसराला भेट दिली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी एक्स या समाजमाध्यम मंचावरील आपल्या पोस्टमध्ये सांगितले, “आज कर्नाटकातील हुबळी येथील जे जी एम एम वैद्यकीय महाविद्यालय आणि केएलई रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या परिसराला भेट दिली. शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून केएलई गेल्या 110 वर्षांहून अधिक काळ देशाची सेवा करत आहे. 250 एमबीबीएस जागा आणि 1,200 खाटांच्या या नव्या सुविधेपैकी 300 खाटा गरीबांसाठी राखीव आहेत. कर्नाटकात जागतिक दर्जाची आरोग्यसेवा विस्तारण्याच्या दिशेने हा एक नवा टप्पा आहे.”

सुमारे 50 एकर क्षेत्रावर अंदाजे 700 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय संकुलाचे एकूण बांधकाम क्षेत्र 20 लाख चौरस फूट आहे. या रुग्णालयात एकाच छताखाली विविध प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सामान्य औषधोपचार, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, फुफ्फुसविकार, प्रसूती व स्त्रीरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, मानसोपचार, दंतचिकित्सा आणि फिजिओथेरपी यांसारख्या मूलभूत विशेष वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध असतील. याशिवाय हृदयरोग, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी, अवयव प्रत्यारोपण, मूत्रविज्ञान, कर्करोग उपचार आणि एंडोक्रिनोलॉजी यांसारख्या अतिविशेष वैद्यकीय सेवांसह आधुनिक प्रयोगशाळांची सुविधाही येथे उपलब्ध असेल.

रुग्णालयात 24 तास उच्च-गती आपत्कालीन आणि ट्रॉमा सेवा, आधुनिक डायलिसिस युनिट, डिजिटल एक्स-रे, उच्च-रिझोल्यूशन सीटी स्कॅनिंग आणि अल्ट्रासोनोग्राफी यांसारख्या अत्याधुनिक सुविधांचाही समावेश असेल.

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2312599) अभ्यागत कक्ष : 13