संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीमध्ये भारतीय नौदलाच्या पहिल्याच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज जहाजबांधणीच्या (एनजीएमव्ही) कामाला सुरुवात

Posted On: 19 SEP 2026 11:46AM by PIB Mumbai

 

कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीमध्ये (सीएसएल) भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज जहाज (एनजीएमव्ही) प्रकल्पातील पहिल्याच जहाजबांधणी कामाची सुरुवात 18 सप्टेंबर 2026 रोजी कील लेइंग समारंभाने झाली. युद्धनौका उत्पादन व अधिग्रहण नियंत्रक, व्हाइस ऍडमिरल संजय साधू या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारतीय नौदल व सीएसएल कंपनीचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मार्च 2023 मध्ये सीएसएल कंपनीसोबत एनजीएमव्ही जहाजबांधणी करार करण्यात आला होता. एनजीएमव्हीमध्ये आधुनिक शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्स बसवण्यात येणार आहेत. यामुळे भविष्यासाठी तयार व युद्धसज्ज दल म्हणून भारतीय नौदलाचे युद्धसामर्थ्य लक्षणीयरित्या वाढेल.

हिंद महासागर क्षेत्रातील कठीण सागरी क्षेत्रात काम करण्यास सक्षम असलेले एक भक्कम व आधुनिक आरमार उभारण्याची भारताची वचनबद्धता एनजीएमव्हीच्या बांधकामातून अधोरेखित होते.

या प्रकल्पामध्ये सर्व प्रमुख निर्णायक साधने देशातच विकसित व उत्पादित झाल्यामुळे भारतीय संरक्षण उत्पादन उद्योगाची वाढती स्वदेशी बनावटीची क्षमतादेखील अधोरेखित झाली आहे. या प्रकल्पाचे कामकाज केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांशी सुसंगत आहे. 

***

आशिष सांगळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2312431) अभ्यागत कक्ष : 19