संरक्षण मंत्रालय
लवचिकता, ताकद, नवोन्मेष, सर्वसमावेशक विकास आणि करुणेसह भारत 'विकसित भारत@2047' च्या दिशेने वाटचाल करत आहे: संरक्षण मंत्री
Posted On:
18 SEP 2026 3:29PM by PIB Mumbai
'विकसित भारत@2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांमध्ये लवचिकता, निर्धार, सहानुभाव, नवोन्मेष, ताकद, सर्वसमावेशक समृद्धी आणि राष्ट्रीय अस्मितेची मजबूत भावना जोपासण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून सरकार देशाची सेवा करत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 18 सप्टेंबर 2026 रोजी केरळमधल्या कोची इथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी ठामपणे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत चिकाटीने टिकून राहण्याचे धैर्य, नागरिकांची सुरक्षा आणि संरक्षण, सेवेची भावना, ध्येय साध्य करण्याचा निर्धार, सहानुभाव, भावी पिढ्यांना प्रेरणा देणे, राष्ट्रीय क्षमता बळकट करणे आणि सर्वसमावेशक समृद्धी व जागतिक नेतृत्व सुनिश्चित करणे यांसारख्या भारताच्या शतकानुशतके जुन्या मूल्यांपासून प्रेरणा घेऊन विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे.
_20260918153012_a34d5f.jpeg)
संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केले की 2014 पूर्वी भारताला भ्रष्टाचार आणि गैरप्रशासनासारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे लोकांचे मनोबल कमकुवत झाले होते, मात्र गेल्या 12 वर्षांत झालेली देशाची प्रगती आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्याच्या आणि आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करण्याच्या क्षमतेतून घडली आहे. गेल्या 12 वर्षांत जगाने कोविड-19 सारख्या महामारीचा सामना केला आहे आणि अनेक युद्धे पाहिली आहेत, त्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम झाला आहे. जागतिक आव्हाने असतानाही, आपण आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर स्थिरपणे पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.
दुष्ट शक्तींपासून नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षेबाबत सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करताना, ऑपरेशन सिंदूर हा देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्यांचा नायनाट करण्यासाठी सीमा ओलांडण्याच्या भारताच्या इच्छेचा दाखला आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. नक्षलवादही संपुष्टात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
स्वदेशी क्षमता सातत्याने बळकट करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टावर बोलताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, स्वदेशी संरक्षण उत्पादन 2014 मध्ये केवळ 40,000 कोटी रुपये होते, ते आता जवळपास 1.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ते पुढे म्हणाले की, संरक्षण निर्यात जवळपास 600 कोटींवरून वाढून सुमारे 40,000 कोटी रुपये झाली असून भारतीय उपकरणे सुमारे 100 देशांमध्ये पोहोचत आहेत.
_20260918153047_899fc4.jpeg)
आज जग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असल्याने भारत एक सांस्कृतिक नेतृत्व म्हणून उदयाला आला आहे, यावर त्यांनी भर दिला. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि जागतिक जैवइंधन आघाडी यांसारख्या उपक्रमांद्वारे भारत आता जगाचे नेतृत्व करत आहे, असेही ते पुढे म्हणाले.
भारताचा विकास प्रवास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नाही, तर त्यात राष्ट्रीय आत्मविश्वास मजबूत करणे आणि वसाहतवादी मानसिकतेच्या पलीकडे जाणे देखील समाविष्ट आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
आजच्या काळात माध्यमांच्या अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेबद्दल बोलताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, स्वतंत्र आणि निष्पक्ष वृत्तपत्र हे उत्तरदायित्व ठरवण्याचे सर्वात मजबूत साधन आहे, असेही सिंह यांनी सांगितले.
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2312333)
अभ्यागत कक्ष : 15