रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने मुकुटबन (आदिलाबाद) आणि गडचांदूर दरम्यान 38.21 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपये खर्चाला दिली मंजुरी
नवीन मार्गामुळे प्रवासाचे अंतर कमी होणार असून मालवाहतुकीची कनेक्टिव्हिटी सुधारण्याबरोबरच औद्योगिक आणि खाणकाम क्षेत्राच्या विकासाला बळ मिळणार
Posted On:
18 SEP 2026 11:23AM by PIB Mumbai
प्रादेशिक रेल्वे संपर्क व्यवस्था बळकट करण्याच्या आणि प्रवासी आणि मालवाहतूक अधिक जलद आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्रातील मुकुटबन (आदिलाबाद) आणि गडचांदूर दरम्यान 38.21 किमी लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला 493 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे.
औद्योगिक आणि खाणकाम केंद्रांशी मजबूत कनेक्टिव्हिटी
यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर ही महत्त्वाची औद्योगिक आणि खाणकाम केंद्रे आहेत. या क्षेत्रात अनेक सिमेंट प्रकल्प, 'वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड'च्या कोळशाच्या खाणी आणि जवळच्या चुनखडीच्या खाणी कार्यरत आहेत. ही नवीन रेल्वे मार्गिका या औद्योगिक क्षेत्रांशी रेल्वे संपर्क अधिक दृढ करेल आणि मालवाहतूक अधिक कार्यक्षमतेने करायला सहाय्य करेल.
मालवाहतूक सुधारण्यासाठी आणि सध्याच्या रेल्वे जाळ्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कमी अंतराचा मार्ग
नवीन रेल्वे मार्गामुळे प्रवासाचे अंतर, वाहतुकीचा वेळ आणि संबंधित खर्च कमी होईल. तसेच, हा मार्ग सध्याच्या वर्धा-माणिकगड विभागावरील गर्दी कमी करण्यासाठी एक पर्यायी मार्ग ठरेल आणि मालवाहतूक सुरळीत करेल.
सविस्तर प्रकल्प अहवालानुसार, प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्याद्वारे 6.08 एमटीपीए (MTPA) इतकी मालवाहतूक तसेच प्रत्येक दिशेने दररोज दोन 'मेमू' (MEMU) गाड्यांच्या वाहतुकीला सहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे. या मालवाहतुकीमध्ये कोळसा आणि कोक, सिमेंट, स्पंज आयर्न, धातू भंगार, लोखंड आणि पोलाद, खते आणि अन्नधान्य यासारख्या विविध वस्तूंचा समावेश असेल.
माजरी-नांदेड मार्ग आणि प्रमुख ठिकाणांशी थेट संपर्क
ही नवीन रेल्वे मार्गिका कोळसा आणि सिमेंट क्लस्टर आणि माजरी-नांदेड मार्ग यांच्यात थेट संपर्क उपलब्ध करून देईल. यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील इतर ठिकाणांकडे होणारी कोळसा, सिमेंट आणि आरएमएसपी वाहतूक कमी अंतराच्या मार्गाने करता येईल.
बल्लारशाह-नागपूर या गर्दीच्या मार्गावरील अवलंबित्व कमी होणार
या प्रकल्पामुळे बल्लारशाह-नागपूर या अती गर्दीच्या, 'हाय-डेन्सिटी नेटवर्क' (एचडीएन) मार्गावरील अवलंबित्व कमी होईल आणि त्याचवेळी यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील तुलनेने कमी संपर्क असलेल्या भागांशी रेल्वे संपर्क सुधारेल. रेल्वेच्या सुधारित पायाभूत सुविधांद्वारे या प्रदेशातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल.
प्रादेशिक रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण
नवीन रेल्वे मार्गिका प्रादेशिक रेल्वे जाळ्याची क्षमता वाढवेल, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुलभ करेल आणि वाढत्या माल आणि प्रवासी वाहतुकीच्या गरजांसाठी एक अतिरिक्त रेल्वे कॉरिडॉर उपलब्ध करून देईल. हा प्रकल्प औद्योगिक आणि प्रादेशिक आर्थिक घडामोडींना चालना देण्याबरोबरच, सध्याच्या रेल्वे नेटवर्कच्या अधिक कार्यक्षम वापरासाठी योगदान देईल अशी अपेक्षा आहे.
***
नितीन फुल्लुके/ राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2312153)
अभ्यागत कक्ष : 7