अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने ईशान्य भारतात केलेल्या कारवाईत मेथाम्फेटामाइनच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीला आणले
Posted On:
16 SEP 2026 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधातील सातत्यपूर्ण कारवाई अंतर्गत, ईशान्य भारतात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीच्या कारवाया उघडकीला आणल्या असून, या कारवाईत मेथॅम्फेटामाइन या अमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला. डीआरआय च्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांमधील ही एक असून, बेकायदेशीर उत्पादनांच्या बाजारात या अमली पदार्थांचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे. या कारवाईत गुप्तचर माहितीच्या आधारे अनेक ठिकाणी समन्वय साधून पाळत ठेवून, एकाच वेळी कारवाई करण्यात आली, यामुळे मेथाम्फेटामाइनचा मोठा साठा जप्त करण्यात यश मिळाले.
गुप्तचर माहितीच्या आधारे, डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी 15.09.2026 रोजी आसाम आणि त्रिपुरामध्ये विविध ठिकाणी चार ट्रक अडवले. या ट्रक्समधून मेथाम्फेटामाइनच्या गोळ्यांचा मोठा साठा वाहून नेला जात असल्याचा संशय होता.

15.09.26 रोजी, पहिल्या कारवाईत, संशयित ट्रकपैकी एक ओळखला गेला आणि आसाम रायफल्सच्या 38 बटालियनच्या सहाय्याने सिलचरपासून सुमारे 100 किमी अंतरावर रामनाथपूर, आसाम येथे तो अडवण्यात आला. त्यानंतर, अशाच प्रकारचा माल घेऊन जाणारा दुसरा संशयित ट्रक जवळच्या परिसरात आढळला. मात्र, वाहनचालक अथवा त्याचा सहकारी त्या वाहनात नव्हते.
पहिल्या ट्रकची झडती घेतल्यावर, चालकाच्या केबिनच्या छतामध्ये लपवून ठेवलेली एकूण 55 किलो वजनाची 275 पाकिटे जप्त करण्यात आली, या पाकिटांमध्ये गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्या होत्या, त्या मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या असाव्यात असा संशय आहे. दुसऱ्या ट्रकची तपासणी केल्यावर, त्याच रंगाच्या गोळ्यांची 271 पाकिटे जप्त करण्यात आली, त्याचे वजन 54.2 किलो होते, ते चालकाच्या केबिनच्या छतावर लपवून ठेवले होते. या कारवाईत एनडीपीएस कायद्याच्या तरतुदींनुसार एकूण 109.2 किलो संशयित मेथॅम्फेटामाइन गोळ्या जप्त करण्यात आल्या आणि दोन वाहने जप्त करण्यात आल्या आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
त्याच वेळी, गुप्तचर माहितीवर आधारित मोहिमेचा एक भाग म्हणून, खोवाईहून आगरतळा येथे सिमेंटची अधिकृतपणे घोषित केलेली खेप घेऊन जाणारे आणखी एक मालवाहू वाहन ओळखण्यात आले आणि 'आसाम रायफल्स'च्या 28 बटालियनच्या मदतीने अगरतळापासून सुमारे 45 किमी अंतरावर तेलियामुरा येथे अडवण्यात आले. सखोल तपासणीदरम्यान, चालकाच्या केबिनच्या छतामध्ये लपवून ठेवलेली 295 प्लास्टिकची पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये 72.6 किलो वजनाच्या गुलाबी-केशरी रंगाच्या गोळ्या होत्या, त्या मेथाम्फेटामाइन या अमली पदार्थांच्या असाव्यात असा संशय आहे. हा प्रतिबंधित माल आणि वाहन जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान मिळालेल्या पुढील माहितीच्या आधारे आणि डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे, त्रिपुरामधील पनीसागरजवळ त्याच टोळीच्या मालकीचा आणखी एक ट्रक अडवण्यात आला. या वाहनाची झडती घेतल्यावर वाहनात लपवून ठेवलेल्या 50 किलो वजनाच्या संशयास्पद मेथाम्फेटामाइन या अमली पदार्थांच्या गोळ्या आढळून आल्या. हा प्रतिबंधित माल आणि वाहन जप्त करण्यात आले आणि चालकाला अटक करण्यात आली.
डीआरआयच्या समन्वित कारवाईमुळे एकूण 231.8 किलो संशयास्पद मेथाम्फेटामाइन गोळ्या जप्त करण्यात आल्या आणि तीन जणांना अटक करण्यात आली. या प्रतिबंधित मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारही ट्रकही जप्त करण्यात आले.
यापूर्वी, ऑगस्ट 2026 मध्ये, डीआरआयने सिलचर आणि मिझोरामजवळ गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या दोन कारवायांमध्ये 76 किलो मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या जप्त केल्या होत्या, या गोळ्या विविध ठिकाणी वाहनांमध्ये लपवून ठेवल्याचे आढळले.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311089)
अभ्यागत कक्ष : 9