ऊर्जा मंत्रालय
मनोहर लाल यांनी G20 'ऊर्जा विपुलता’ मंत्रीस्तरीय बैठकीत घेतला सहभाग; मंत्रिस्तरीय सत्रांना केले संबोधित आणि अमेरिका व कॅनडासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या
स्वच्छ ऊर्जा, नियामक कार्यक्षमता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकला
Posted On:
16 SEP 2026 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,16 सप्टेंबर 2026
केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल यांनी 15 सप्टेंबर 2026 रोजी ह्युस्टन येथे जी 20 एनर्जी ऍबंडन्स अर्थात जी 20 ऊर्जा विपुलता कार्यगटाच्या बैठकांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी 'स्तंभ 1) आणि 'स्तंभ 2) अंतर्गत आपली मते मांडली आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याबाबत अमेरिका व कॅनडाच्या वरिष्ठ नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.

स्तंभ 1 : ऊर्जा सुरक्षा आणि किफायतशीर मूलभूत ऊर्जा पुरवठा अर्थात बेसलोड
मंत्र्यांनी सुरक्षित आणि लवचिक ऊर्जा प्रणाली उभारण्यातील भारताच्या जलद प्रगतीवर प्रकाश टाकला. यामध्ये 552 गिगावॉट स्थापित क्षमता, 50 टक्क्यांहून अधिक बिगर-जीवाश्म इंधनाचा वाटा, तसेच सौर ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, अणुऊर्जा आणि स्वच्छ स्वयंपाकाच्या इंधनाची उपलब्धता या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. तंत्रज्ञान-निरपेक्ष, सर्वसमावेशक ऊर्जा मार्ग आणि आयएसए म्हणजेच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, ओएसओडब्लूओजी म्हणजे ‘वन सन’, ‘वन वर्ल्ड’, ‘वन ग्रिड’ व ग्लोबल बायोफ्युअल्स अलायन्स अर्थात जागतिक जैव-इंधन आघाडी यांच्या माध्यमातून जागतिक सहकार्यासाठी भारताच्या कटिबद्धतेवर भर दिला.

स्तंभ 2: परवाना प्रक्रिया आणि नियामक कार्यक्षमता
मनोहर लाल यांनी नॅशनल सिंगल विंडो सिस्टम अर्थात राष्ट्रीय एकखिडकी प्रणाली, परिवेश आणि पीएम गती शक्ती यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्याच्या आणि नियामक निश्चितता बळकट करण्याच्या भारताच्या सुधारणांची माहिती दिली. पायाभूत सुविधांचा वेळेवर विकास करण्यासाठी कार्यक्षम परवाना प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि क्षमता बांधणी व नियामक आधुनिकीकरणासाठी जी 20 देशांमधील सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.
अमेरिकेसोबत द्विपक्षीय बैठक

केंद्रीय मंत्र्यांनी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे सचिव ख्रिस राइट यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता , हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि डेटा सेंटर्ससाठी भारताच्या ऊर्जा पायाभूत सुविधांच्या योजनांवर, तसेच भारताच्या अणुऊर्जा विस्तार आराखड्यावर चर्चा केली. दोन्ही बाजूंनी 'अमेरिका-भारत ऊर्जा सुरक्षा भागीदारी' अंतर्गत स्वच्छ ऊर्जा, लवचिक पायाभूत सुविधा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांवर लक्ष केंद्रित करून सहकार्यासाठीच्या प्राधान्यक्रमांचा पुनरुच्चार केला.
कॅनडासोबत द्विपक्षीय बैठक

मनोहर लाल यांनी कॅनडाचे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधने मंत्र्यांचे संसदीय सचिव कोरी होगन यांचीही भेट घेतली. ऊर्जा कार्यक्षमता, कमी उत्सर्जन करणारे तंत्रज्ञान आणि समुद्र मंथन योजनेअंतर्गत समुद्रातील शोधकार्याबाबत सहकार्य करण्याच्या शक्यतांवर त्यांनी चर्चा केली. मंत्र्यांनी कॅनेडियन कंपन्यांना भारताच्या विस्तारत असलेल्या अन्वेषण आणि उत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी आणि उदयोन्मुख ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये आपला सहभाग अधिक दृढ करण्यासाठी प्रोत्साहित केले.
केंद्रीय मंत्र्यांनी ऊर्जा स्रोतांचे विविधीकरण, स्वच्छ व विश्वसनीय बेसलोड क्षमतेचा विस्तार आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा जलद अवलंब यांद्वारे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याच्या भारताच्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी यावर भर दिला की, भारत आपल्या नागरिकांसाठी सुरक्षित, शाश्वत आणि परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यासाठी आणि जागतिक ऊर्जा स्थिरतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी अधिक दृढ करत असताना, एक संतुलित, भविष्यासाठी सज्ज ऊर्जा धोरण राबवत राहील.
शैलेश पाटील/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310903)
अभ्यागत कक्ष : 9