कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
शांघाय येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा-2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे कुशल युवा पथक रवाना
जगातील सर्वात महत्त्वाच्या कौशल्य स्पर्धेत 70 सदस्यीय भारतीय संघ 63 कौशल्य प्रकारात होणार सहभागी
भारत 11 नवीन आणि उदयोन्मुख कौशल्य प्रकारांमध्ये करणार पदार्पण
Posted On:
15 SEP 2026 10:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) आज नवी दिल्लीतील कौशल्य भवन येथे शांघाय येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धा-2026 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकाचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
चीनमधील शांघाय येथे 22 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 48व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे 70 कुशल तरुण स्पर्धकांचे पथक 63 कौशल्य प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. हे स्पर्धक जागतिक स्तरावर तांत्रिक उत्कृष्टता, सर्जनशीलता, अचूकता,नवोन्मेष आणि कारागिरी या क्षेत्रात भारताची वाढती क्षमता प्रदर्शित करतील.
या सोहळ्याला कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) तसेच शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. “भारतीय चमू एक आत्मविश्वासपूर्ण, सर्जनशील आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम पिढीचे नेतृत्व करत आहे. हा चमू जगातील सर्वोत्तम स्पर्धकांशी भिडण्यास सज्ज आहे. नव्या युगातील कौशल्य प्रकारात या चमूचा सहभाग भारताच्या कौशल्य व्यवस्थेची वाढती व्याप्ती दर्शवतो,” असे भारतीय चमूला संबोधित करताना जयंत चौधरी म्हणाले.
पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन केंद्र सरकार कौशल्य स्पर्धा, कौशल्य महोत्सव आणि राज्ये तसेच उद्योगांसोबतच्या दृढ भागीदारीच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या व्याप्तीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे ही बाब त्यांनी नमूद केली. भविष्यात अशा जागतिक कौशल्य स्पर्धांचे यजमानपद भूषवण्याचे स्वप्न आपण नक्कीच पाहिले पाहिजे असे ते म्हणाले. स्पर्धकांनी स्वतःच्या प्रशिक्षणावर विश्वास ठेवावा, ध्येयावर लक्ष केंद्रित करावे आणि कोणत्याही दडपणाशिवाय स्पर्धेत उतरावे असा मार्गदर्शपर सल्लाही त्यांनी दिला. शांघाय ही केवळ एक स्पर्धा नसून आपले कौशल्य आपल्याला किती दूरपर्यंत नेऊ शकते याचा शोध घेण्याची एक संधी आहे असे ते म्हणाले. कधीही हार न मानण्याची वृत्ती जोपासा, आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवा तसेच एका संपूर्ण पिढीला आत्मविश्वासाने आणि अभिमानाने कौशल्याची निवड करण्यासाठी प्रेरित करा असा प्रोत्साहनपर संदेशही त्यांनी स्पर्धकांना दिला.
भारताचे संघ प्रथमच 11 नवीन कौशल्य श्रेणींमध्ये भाग घेणार आहेत. याअंतर्गत भारताचे संघ दंत अवयवरचनाशास्त्र (Dental Prosthetics), परस्परसंवादी डिजिटल माध्यमांचे डिझाइन (Digital Interactive Media Design), इंटेलिजेंट अर्थात बुद्धिवंत सुरक्षा तंत्रज्ञान (Intelligent Security Technology), उद्यान निर्मिती कला (Landscape Gardening), प्रकाश विद्युत तंत्रज्ञान (Optoelectronic Technology), किरकोळ विक्री, मानवरहित हवाई प्रणाली, औद्योगिक यांत्रिकी (Industrial Mechanics), सॉफ्टवेअर चाचणी, अवजड वाहन तंत्रज्ञान आणि विमान देखभाल या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील भारताच्या सहभागातून, देशाच्या पारंपारिक उद्योग व्यवसायांची चौकट पार करून जटिल तंत्रज्ञान, तज्ञतेच्या सेवा आणि भावी पिढीच्या औद्योगिक क्षमतांपर्यंत विस्तारत असलेल्या कौशल्य प्रशिक्षण परिसंस्थेच्या व्याप्ती आणि परिपक्वतेची प्रचिती येते.
वर्ल्डस्किल्स हा व्यावसायिक कौशल्यांमधील उत्कृष्टतेची दखल घेणारा आणि अशा उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणारा जगातील ेक प्रमुख मंच आहे. या उपक्रमाच्या शांघाय इथल्या यंदाच्या पर्वात 60 पेक्षा जास्त देशांसह जगभरातील विविध भागांतून 1400 पेक्षा जास्त युवा स्पर्धक, विविध प्रकारच्या 64 कौशल्य विषयक स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत.
70 सदस्यांचे हे पथक शांघायसाठी रवाना होत असताना, त्यांच्यासोबत देशाच्या आकांक्षा, प्रशिक्षक व मार्गदर्शकांची तज्ज्ञता, उद्योग व संस्थांचा पाठिंबा आणि देशभरातील कुटुंबांचे प्रोत्साहन आहे. जे कौशल्याच्या जोरावर निर्मिती, उभारणी, नवोन्मेष आणि उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, भविष्य त्यांचेच आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे.










राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310700)
अभ्यागत कक्ष : 6