संरक्षण मंत्रालय
भारत आणि अमेरिकेतील युद्ध अभ्यास 2026 या संयुक्त लष्करी सरावाचा औली इथले परदेशी प्रशिक्षण केंद्र तसेच महाजन फील्ड फायरिंग रेंज इथे प्रारंभ
Posted On:
15 SEP 2026 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2026
भारत आणि अमेरिकेतील युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाच्या 22 व्या पर्वाचा आज उत्तराखंडातील औली इथल्या परदेशी प्रशिक्षण केंद्रावर समारंभपूर्वक प्रारंभ झाला. या सरावात सहभागी दोन्ही देशांच्या प्रत्येकी 600 सैनिकांचा समावेश असलेल्या तुकड्या सहभागी झाल्या आहेत. भारतीय लष्कराच्या 14 पायदळ तुकडीचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल अमरीश गुंजन आणि अमेरिकी लष्कराच्या 11 व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या 11 व्या इन्फंट्री ब्रिगेड कॉम्बॅट टीमचे कमांडर कर्नल बेंजामिन जॅकमन यांनी या सहभागींना संबोधित केले. उत्तराखंडातील औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथे समांतरपणे या सरावाचे आयोजन केले गेले आहे.
पर्वतीय तसेच निम्न पर्वतीय भागांत एकात्मिक युद्ध समूह (Integrated Battle Groups) तैनात करण्याच्या बाबतीतील संयुक्त लष्करी क्षमतेत वृद्धी घडवून आणणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. याअतंर्गत लष्कर प्रधान मोहिमांवर भर दिला गेला आहे. या उपक्रमामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील परस्पर समन्वित कार्यक्षमतेत अधिक सुधारणा घडून येईल, मोहीमांच्या कार्यान्वयन विषयक सर्वोत्तम पद्धतींची सुलभतेने देवाणघेवाण करता येईल, तसेच संयुक्त नियोजन आणि अंमलबजावणीलाही बळकटी मिळू शकणार आहे.
या सरावाअंतर्गत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यावर मोठा भर दिला गेला आहे. या सरावाअंतर्गतच्या प्रशिक्षणात पाळत ठेवणे तसेच टेहळणीसाठीचे ड्रोन्स आणि इतर स्वयंचलित यंत्रणांच्या वापराचा समावेश केला आहे. यासोबतच महाजन फील्ड फायरिंग रेंज इथे आधुनिक शस्त्र प्रणालींचे प्रात्यक्षिकही केले जाणार आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमधील विशिष्ट विषयांवर तज्ञ उदयोन्मुख तंत्रज्ञान तसेच बहुक्षेत्रिय युद्धाच्या क्षेत्रातील घडामोडींवर विचारांची देवाणघेवाणही करणार आहेत.
हा सरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांसाठी आपापली युद्धकौशल्ये, तंत्रे आणि कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्याची, तसेच विविधांधी भौगोलिक स्थिती आणि लष्करी वातावरणात परस्पर समन्वयाने मोहिमा राबवण्याची क्षमता वृद्धींगत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

राधिका अघोर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310594)
अभ्यागत कक्ष : 12