ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी ह्युस्टनमधील भारतीय समुदायासोबत हिंदी दिवस केला साजरा
जी-20 ऊर्जा विपुलता मंत्रिस्तरीय बैठकीपूर्वी नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरला भेट; भारतीय समुदायासोबत संवाद
Posted On:
14 SEP 2026 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026
जी-20 ऊर्जा विपुलता मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतील ह्युस्टन येथे दाखल झालेले वीज आणि गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी 13 सप्टेंबर 2026 रोजी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमांमधून भारतीय समुदायाशी असलेले सांस्कृतिक संबंध, पर्यावरणीय जबाबदारीप्रति असलेली बांधिलकी आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका सहकार्याचा विस्तार करण्याची वचनबद्धता अधोरेखित झाली.

मनोहर लाल 13. 09. 2026 रोजी ह्युस्टन येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने इंटरनॅशनल हिंदी असोसिएशन – ह्युस्टन चॅप्टरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘हिंदी दिवस 2026’ कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात हिंदी भाषेची समृद्धी, सर्वसमावेशकता आणि चैतन्यपूर्ण स्वरूपाचा गौरव करण्यात आला. तसेच, या प्रदेशातील हिंदीप्रेमींना एकत्र आणण्यात आले. मनोहर लाल यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि हिंदीच्या प्रसारासाठी तसेच भारत आणि भारतीय समुदायामधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

भारतीय वाणिज्य दूतावासाच्या भेटीदरम्यान, मनोहर लाल यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण केले. या वृक्षारोपणामुळे दूतावासात स्वच्छता ही सेवा 2026 चा प्रारंभही झाला. “स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय अभियानाचा हा एक भाग आहे. यातून जनसहभाग आणि पर्यावरणीय जबाबदारीच्या मूल्यांना बळकटी मिळाली.

13.09.2026 रोजी मनोहर लाल यांनी ह्युस्टन येथील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरलाही भेट दिली. त्यांनी या सुविधेची पाहणी केली आणि अंतराळ क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्य अधिक बळकट करण्याच्या संधींबाबत चर्चा केली. मनःपूर्वक स्वागत केल्याबद्दल तसेच भेटीदरम्यान स्वतः मार्गदर्शन केल्याबद्दल स्पेस सेंटर ह्युस्टनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विल्यम टी. हॅरिस यांचे मनोहर लाल यांनी आभार मानले.
13.09.2026 रोजी संध्याकाळी मनोहर लाल यांनी ह्युस्टन येथील इंडिया हाऊस येथे भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक स्वागत समारंभाला उपस्थिती लावली. या स्वागत समारंभात व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थी, सांस्कृतिक क्षेत्रातील नेते आणि प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह भारतीय समुदायातील विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी झाले.
वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्यदूत डी.सी. मंजुनाथ यांनी मनोहर लाल यांचे स्वागत केले. तसेच जी-20 ऊर्जा विपुलता मंत्रिस्तरीय बैठकीसाठीच्या त्यांच्या भेटीदरम्यान भारतीय समुदायाशी संवाद साधल्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले.
पुढील तीन दिवसांत (14 ते 16 सप्टेंबर 2026) मंत्री जी-20 ऊर्जा विपुलता मंत्रिस्तरीय बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत जी-20 सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी ऊर्जा सुरक्षा, परवडणारी ऊर्जा, ऊर्जेची उपलब्धता आणि बदलत्या जागतिक ऊर्जा परिस्थितीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करतील. भारताचा सहभाग रचनात्मक आंतरराष्ट्रीय सहकार्याप्रति आणि सुरक्षित, विश्वासार्ह, परवडणारी तसेच शाश्वत ऊर्जेसाठी उपाययोजनांना पुढे नेण्याची भारताची बांधिलकी अधोरेखित करतो.
शैलेश पाटील/हेमांगी काणेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2310199)
अभ्यागत कक्ष : 10