श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इमारत आणि इतर बांधकाम कामगारांविषयी राष्ट्रीय परिषद मुंबईत संपन्न; बांधकाम कामगारांसाठी कल्याण आणि कौशल्य परिसंस्था मजबूत करण्यावर भर


बीओसीडब्ल्यू कल्याणकारी सेवांचे वितरण मजबूत करण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये अधिक समन्वय आणि परस्परांकडून शिकण्याचे सचिवांचे आवाहन

बीओसीडब्ल्यू परिषदेत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कौशल्य विकास, डिजिटल लेबर चौक आणि कामगार सुलभतेवरील उपक्रम केले प्रदर्शित

Posted On: 12 SEP 2026 3:59PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेल्या इमारत आणि इतर बांधकाम कामगारांविषयीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची आज मुंबईत सांगता झाली. 11–12 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत बांधकाम कामगारांचे कल्याण, कौशल्य, रोजगार आणि सामाजिक संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे, बीओसीडब्ल्यू कल्याणकारी मंडळे आणि इतर भागधारकांचे प्रतिनिधी एकत्र आले होते. केंद्रीय श्रम आणि रोजगार तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी परिषदेच्या पहिल्या दिवसाचे अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी केंद्रीय श्रम आणि रोजगार व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुसऱ्या दिवशी आपल्या प्रास्ताविक भाषणात, सचिवांनी बीओसीडब्ल्यू क्षेत्रातली आव्हाने आणि संधींवर सविस्तर भाष्य केले. कौशल्य परिसंस्था बळकट करणे आणि श्रमप्रतिष्ठेला धोरण आणि कार्यक्रमांच्या रचनेच्या केंद्रस्थानी ठेवणे, हे अधिक प्रतिसादक्षम, सर्वसमावेशक आणि लवचिक श्रम परिसंस्था निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी श्रम बाजारातली माहिती आणि सुलभतेतली विषमता दूर करण्याची, तसेच नोकरी शोधणारे आणि नियोक्ते यांच्यात अधिक चांगले दुवे निर्माण करणाऱ्या यंत्रणा मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला.

 

सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांची रचना करताना कामगारांचे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या स्थलांतराचा योग्य रितीने विचार केला पाहिजे असे सचिवांनी अधोरेखित केले. तसेच, त्यांनी बांधकाम कामगारांचे व्यावसायिक आरोग्य, शारीरिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणच्या इतर समस्यांकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.

परिषदेदरम्यान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सामायिक केलेल्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचे कौतुक करत, त्यांनी शाश्वत सहकार्य आणि परस्परांकडून शिकण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये अनुभवांची अधिक देवाणघेवाण आणि वारंवार ऑनलाइन संवादाची गरज अधोरेखित केली.

पुढील काळातील वाटचालीबाबत सचिवांनी बांधकाम कामगार कल्याण परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी विविध उपाययोजनांचे एकत्रीकरण आणि शाश्वत कल्याणकारी उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी अधिकाधिक विमाशास्त्रीय विश्लेषणाचा वापर करण्यासह महत्त्वपूर्ण मार्ग अधोरेखित केले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात “नवीन कामगार संहितांच्या अनुषंगाने बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या” या विषयावरील सत्राने झाली. या सत्रात विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सादरीकरण केले. बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी तसेच सेवा वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपक्रमांवर आणि सर्वोत्तम पद्धतींवर या सादरीकरणांमध्ये प्रकाश टाकण्यात आला.

उत्तर प्रदेशने बांधकाम कामगारांच्या कौशल्य विकासाबाबत केलेल्या कार्याची माहिती दिली, तर राजस्थानने डिजिटल श्रम चौकांच्या अंमलबजावणीचा अनुभव सामाईक केला. बिहारने श्रम सेवा सुविधा केंद्रांबाबत माहिती दिली, तर आसामने निर्माण सखी पोर्टल सादर केले. या सादरीकरणांनंतर सहभागी राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित भागधारकांमध्ये चर्चा झाली. या चर्चेमुळे बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांना कल्याणकारी तसेच रोजगाराशी संबंधित सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठीचे अनुभव आणि विविध दृष्टिकोन सामाईक करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर परिषदेत कौशल्य विकास आणि रोजगार या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कौशल्य विकासावर, तर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने भारतातील रोजगारवाढीच्या प्रवासावर सादरीकरण केले. त्यानंतर या विषयांवर चर्चा झाली.

लेबर स्टॅक या विषयावरही एक सत्र आयोजित करण्यात आले. तसेच बांधकाम क्षेत्र आणि औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) यावर विचारविनिमय करण्यात आला. या विषयावर सादरीकरण आणि त्यानंतर चर्चा झाली.

दोन दिवसीय परिषदेतील विचारविनिमयामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांचे अनुभव आणि कार्यपद्धती सामाईक करण्यासाठी तसेच बांधकाम आणि इतर बांधकाम कामगारांसाठी कल्याण, कौशल्य विकास, रोजगार आणि सेवा वितरण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

***

शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2309551) अभ्यागत कक्ष : 11