वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
ब्रिक्सअंतर्गत अधिक व्यापक, लवचिक आणि संतुलित व्यापार प्रस्थापित व्हावा असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
ब्रिक्स सदस्य देशांनी बाजारपेठा खुल्या कराव्यात तसेच नियामक प्रक्रिया सुलभ कराव्यात असे गोयल यांचे आवाहन
ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांनी आर्थिक देवाण घेवाण व्यवस्थेशी जोडून घ्यावे आणि परस्परांच्या स्थानिक चलनांत व्यापाराला चालना देण्याचे गोयल यांनी केले आवाहन
कृषी, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, सेवा, स्टार्टअप आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांत अधिक सहकार्य प्रस्थापित होण्याची गरज गोयल यांनी केली व्यक्त
पुरवठा साखळी जोडणी, व्यापार विषयक सुविधा आणि नवोन्मेष हे या ब्रिक्सचे प्रमुख प्राधान्यक्रम असल्याची बाब परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केली अधोरेखीत
Posted On:
11 SEP 2026 12:10PM by PIB Mumbai
जागतिक व्यापारात ब्रिक्सचा वाटा जवळपास एक चतुर्थांश आहे, अशावेळी ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांनी अधिक व्यापक, अधिक लवचिक आणि संतुलित व्यापारी भागीदारी उभारण्याची गरज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स व्यापार मंचाच्या आज झालेल्या उद्घाटन सत्राला गोयल संबोधित करत होते. आपल्या संबोधनातून त्यांनी आर्थिक सहकार्याच्या संपूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी अधिक व्यापक स्वरुपात बाजारपेठा उपलब्ध करून देणे, वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी आणि सुलभ नियामक प्रक्रियांची गरजही अधोरेखीत केली. या मंचाच्या निमित्ताने होणाऱ्या चर्चेतून महत्त्वाचे निष्कर्ष हाती येतील आणि ब्रिक्स देशांमधील आर्थिक संवाद तसेच व्यापारी भागीदारी पुढच्या टप्प्यावर जाईल , अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या उद्घाटन सत्राला रशियाचे आर्थिक विकासमंत्री मॅक्सिम रेशेतनिकोव्ह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले.
भारत हा ब्रिक्सअंतर्गत व्यापाराचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याची बाब गोयल यांनी अधोरेखीत केली. अभियांत्रिकी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांच्या बाबतीत भारताकडे भक्कम क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही क्षेत्रांचा भारताच्या उत्पादन निर्यातीतील सर्वांत मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले. भारत जगाचे औषधालय म्हणून ओळखला जातो असेही ते म्हणाले. या आणि इतर उत्पादनांसाठी विश्वासू भागीदार म्हणून जगापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने भारत ब्रिक्सकडे एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
भागीदार देशांमधील व्यापक आणि लवचिक व्यापाराचे महत्त्वही गोयल यांनी अधोरेखित केले. पुरवठा साखळी वैविध्यपूर्ण असायला हवी, व्यापार हा कोणत्याही सदस्य देशातील विकासात तसेच जनतेच्या कल्याणात अडथळा ठरता कामा नये. कच्चा माल आणि महत्त्वाची खनिजे यांसह परस्परांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठा खुल्या करायला हव्यात असे आवाहनही त्यांनी ब्रिक्स सदस्य देशांना केले.
पुरवठा साखळ्या जेव्हा दोन्ही बाजुंनी कार्यरत असतात, तेव्हा त्या अधिक लवचिक असतात, असे गोयल म्हणाले. जगातील 88 टक्के देशांमध्ये सीमाशुल्कापेक्षा बिगर सीमाशुल्क उपाययोजना अधिक खर्चिक निर्यातीला कारणीभूत ठरतात, त्यामुळे बाजारपेठेत सहज आणि सुकर प्रवेश असायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. ब्रिक्स सदस्य आणि भागीदार राष्ट्रांनी नियामक प्रक्रियांचे सुलभीकरण करताना सीमाशुल्क प्रक्रिया अधिक वेगवान होण्यासाठी आपल्या बाजारपेठा खुल्या कराव्यात असे गोयल म्हणाले.
कृषी क्षेत्रात व्यापक सहकार्य करण्यावर भर देत गोयल यांनी सर्व ब्रिक्स राष्ट्रांमध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांना संयुक्तपणे कार्य करत कृषी-तंत्र स्टार्टअप्स विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. त्यांनी देशांना एकमेकांसाठी सेवा क्षेत्रातील बाजारपेठा प्रत्यक्ष अर्थाने खुल्या करण्याचे, तसेच व्यावसायिकांना सीमापार मुक्तपणे ये-जा करण्यास सुलभता निर्माण करण्याचे आवाहन केले. याशिवाय, एकमेकांच्या व्यावसायिक पात्रतांना परस्पर मान्यता देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यावर भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
भारताच्या स्टार्टअप्स आणि उद्योजकता परिसंस्थेतील महिलांचा सहभाग अधोरेखित करताना, गोयल म्हणाले की भारतातील 250,000 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपैकी 45 टक्क्याहून जास्त स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला भागीदार किंवा संचालक आहेत. गेल्या दशकभरात वितरित केलेल्या लघु कर्जपुरवठ्यातील दोन तृतीयांश महिला उद्योजकांना वितरित केल्याचे ते म्हणाले. यामुळे महिला आपल्या पायावर उभे राहून स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. या आठवड्यात नवी दिल्लीत झालेल्या ब्रिक्स महिला उद्योजक आघाडीच्या बैठकीचा उल्लेख करुन ते म्हणाले की ब्रिक्सच्या प्रत्येक प्रदर्शनात आणि व्यापार मेळ्यात महिलांच्या नेतृत्त्वाखालील उद्योगांचा सहभाग असावा त्यांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देता येईल अशा इतर संधींमध्ये सहभागी व्हावे असा आग्रह आपण केला आहे.
गोयल यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारण्यामधील भारताच्या महत्त्वपूर्ण उपक्रमांवर प्रकाश टाकला. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वर आज वर्षाला 250 अब्जाहून अधिक व्यवहार होतात, जे जगभरातील एकूण व्यवहारांच्या संख्येच्या निम्म्याहून अधिक आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी सांगितले की, युपीआय ला 11 देशांमध्येही स्वीकारले जाते. ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांनी आपापल्या पेमेंट प्रणाली एकमेकांशी जोडाव्यात, तसेच एकमेकांच्या स्थानिक चलनांमध्ये व्यापाराला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारताकडे कृषी, औषधनिर्माण, अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि ऑटो पार्ट्स आणि सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये मजबूत क्षमता आहेत आणि त्यांनी स्टार्टअप परिसंस्थांनाही जोडण्याचे आवाहन केले. या प्रवृत्तींमुळे संयुक्त नवोपक्रम, तंत्रज्ञान भागीदारी आणि लवचिक जागतिक मूल्य साखळ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध होते, असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याची शताब्दी साजरी होईपर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे 1.4 अब्ज भारतीयांनी स्वतःसाठी निश्चित केलेल्या 'विकसित भारत 2047' या सामूहिक ध्येयाच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांसोबत सहकार्य अधिक दृढ करण्याची प्रचंड क्षमता आहे, असे गोयल म्हणाले.
ब्रिक्स देशांमधील व्यापार आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी या विषयांवरील सत्रांमधून विधायक आणि अंमलबजावणीयोग्य शिफारसी मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या वर्षी ब्रिक्स सहकार्याच्या संस्थात्मक स्वरूपाची 20 वर्षे पूर्ण होत आहेत; या काळात सदस्यसंख्या, कार्यसूची आणि सहकार्याची कार्यपद्धती या बाबतीत ब्रिक्समध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लवचिकता, नाविन्यपूर्णता, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनांच्या आधारे हा विकासक्रम पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत मोठे बदल होत असताना, तसेच अस्थिरता, अनिश्चितता आणि गुंतागुंत ही प्रमुख वैशिष्ट्ये बनली असताना या प्राधान्यक्रमांचे महत्त्व विशेष आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर भू-राजकीय संघर्ष, महामारी, हवामान बदलामुळे निर्माण होणारे अडथळे, डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानातील प्रगती यामुळे आर्थिक क्षेत्राचे स्वरूप बदलत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
त्यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि प्रगत उत्पादन प्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांकडे प्रमुख संधी म्हणून पाहिले, तसेच उपलब्धता, मानके, सुरक्षा आणि विश्वास यांसारख्या मुद्द्यांचाही उल्लेख केला.
डॉ. जयशंकर म्हणाले की, भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात ब्रिक्स इनक्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंडच्या माध्यमातून नवोन्मेष आणि उद्योजकता परिसंस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे; तसेच याचे फायदे सर्व स्तरांवरील व्यावसायिक समुदायांना मिळायला हवेत, यावर त्यांनी भर दिला.
उद्घाटन सत्रात बोलताना जितिन प्रसाद म्हणाले की, ब्रिक्स बिझनेस फोरम ब्रिक्स अर्थव्यवस्थांची ताकद ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रूपांतरित करण्याची संधी उपलब्ध करून देते.
प्रसाद यांनी संयुक्त राष्ट्रांना प्रशासनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अधिक तंत्रज्ञान देवाणघेवाण आणि सहकार्य करण्याच्या गरजेवर भर दिला.
त्यांनी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर्स ही सहकार्याची क्षेत्रे म्हणून अधोरेखित केली, ज्यामध्ये भारताच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण समाविष्ट आहे. तसेच, संशोधन आणि विकास व स्टार्टअप्ससाठी अधिक संसाधने उपलब्ध करून देऊन ब्रिक्स देशांनी संयुक्तपणे विकास, गुंतवणूक आणि नवनिर्मिती करावी, जेणेकरून तरुणांना आंतरराष्ट्रीय सीमांच्या पलीकडे बाजारपेठांपर्यंत पोहोचणे शक्य होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
***
निलिमा चितळे/तुषार पवार/भक्ती सोनटक्के/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2309145)
अभ्यागत कक्ष : 15