वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि रशियाचे उद्योग आणि व्यापार मंत्री आन्तोन अलिखानोव्ह यांची इनोप्रॉम इंडिया 2026 मधल्या एनआयसीडीसी पॅव्हेलियनला भेट

Posted On: 10 SEP 2026 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि रशियाचे  उद्योग आणि व्यापार मंत्री आन्तोन अलिखानोव्ह यांनी त्यांच्या द्विपक्षीय बैठकीनंतर, प्रदर्शनाच्या पाहणीचा एक भाग म्हणून, 'इनोप्रॉम इंडिया 2026' च्या दुसऱ्या दिवशी भारत मंडपम, नवी दिल्ली इथे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनआयसीडीसी) पॅव्हेलियनला भेट दिली.

दोन्ही मंत्र्यांनी एनआयसीडीसी टीमशी संवाद साधला आणि भारताच्या औद्योगिक आणि उत्पादन परिसंस्थेला  बळकट करण्याच्या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या प्रमुख उपक्रमांबद्दल माहिती घेतली. एनआयसीडीसीने राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम (NICDP), इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीज, पीएम मित्रा पार्क्स, भारत औद्योगिक विकास योजना (BHAVYA), इंडस्ट्रियल कॉरिडॉर लँड प्लॅटफॉर्म (ICLP) आणि एनआयसीडीसी लॉजिस्टिक्स डेटा सर्व्हिसेस लिमिटेड (NLDSL) द्वारे विकसित केलेल्या डिजिटल लॉजिस्टिक्स पर्यायांविषयी सादरीकरण केले.

या संवादादरम्यान उत्पादन, औद्योगिक तंत्रज्ञान, स्थानिकीकरण आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात भारत-रशिया सहकार्याच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला.

एनआयसीडीसी पॅव्हेलियनला उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान कंपन्या आणि व्यावसायिक शिष्टमंडळांसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी औद्योगिक ठिकाणे, पायाभूत सुविधांची सुसज्जता, संपर्क, जमिनीची उपलब्धता आणि भारतात उत्पादन सुरू करण्याच्या संधींबद्दल प्रचंड उत्सुकता दाखवली. एनआयसीडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक रजत कुमार सैनी यांनीही पॅव्हेलियनला भेट देऊन प्रदर्शनादरम्यान राबवल्या जाणाऱ्या गुंतवणूकदार सहभाग आणि संपर्क उपक्रमांचा आढावा घेतला.

एनआयसीडीसीने रशियन समकक्षांशी, ब्रिक्स प्रतिनिधींशी, संभाव्य गुंतवणूकदारांशी आणि उद्योग प्रतिनिधींशी थेट बैठकांची मालिकाही आयोजित केली. या चर्चेत संभाव्य उत्पादन भागीदारी, स्थानिकीकरण, तंत्रज्ञान सहकार्य, पुरवठा-साखळी एकत्रीकरण आणि भारताच्या उदयोन्मुख 'इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीज'मधल्या संधींचा समावेश होता.

या उपक्रमांमध्ये प्रगत अभियांत्रिकी, यंत्रसामग्री आणि उपकरणे, वाहतूक प्रणाली, वाहने, धातू, ऊर्जा, एरोस्पेस, औषधनिर्माण, रसायने आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांचा समावेश होता.

याप्रसंगी उत्पादक, तंत्रज्ञान प्रदाते आणि पुरवठा-साखळी घटकांमधल्या भागीदारीसह भारतीय आणि रशियन उद्योगांमधल्या जवळच्या सहकार्याच्या शक्यतांवरही चर्चा झाली.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी एनआयसीडीसी पॅव्हेलियनमध्ये मिळालेला प्रतिसाद हा भारताच्या औद्योगिक विकास कार्यक्रमातला सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय रस आणि जागतिक उत्पादन गुंतवणुकीच्या संधी दर्शवणारा होता.

भारतात आयोजित 'इनोप्रॉम' च्या या पहिल्या आवृत्तीने भारत आणि रशियाचे सरकारी प्रतिनिधी, उद्योग आणि गुंतवणूकदार यांच्यात थेट संवादाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, तसेच औद्योगिक आणि तांत्रिक सहकार्यावरच्या चर्चेला गती दिली आहे.


निलीमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308957) अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein: English , हिन्दी