गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या नियामक मंडळाची तिसरी बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या 12 वर्षांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोन आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल
पूर्वी आपत्तींकडे केवळ मदत आणि पुनर्वसन या दृष्टिकोनातून पाहिले जात असे; मात्र आज आपली जोखीम कमी करणे, पूर्वसूचना प्रणाली आणि 'शून्य जीवितहानी' च्या नव्या युगाकडे वाटचाल
'शून्य जीवितहानी'चे उद्दिष्ट ठेवून आपण अनेक आपत्तींचा यशस्वी सामना केला; ही एक मोठी कामगिरी
Posted On:
10 SEP 2026 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे ' राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या नियामक मंडळाच्या तिसऱ्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

बैठकीला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात आणि कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. मोदी सरकारने संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्णपणे बदल घडवून 'शून्य जीवितहानी'चे उद्दिष्ट निश्चित केले आणि देशाला हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या स्थितीपर्यंत पोहचवले. आम्ही अनेक आपत्तींचा यशस्वीपणे सामना करताना 'शून्य जीवितहानी'चे उद्दिष्ट साध्य केले आहे; ही एक मोठी कामगिारी आहे. शाह म्हणाले की, पूर्वी आपत्तींकडे केवळ मदत आणि पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात असे. आज आपण जोखीम कमी करणे, पूर्वसूचना प्रणाली आणि 'शून्य जीवितहानी' या तीन स्तंभांवर आधारित एका नवीन युगात प्रवेश केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातील बदलासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संरक्षणावरही विशेष भर दिला आहे. ते म्हणाले की, पर्यावरण संरक्षण हेच आपत्ती रोखण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.

जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तकालीन घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यासोबतच विज्ञानाच्या माध्यमातून उपायोगात आणलेली साधने आणि त्याच्या वाढत्या वापराची व्याप्ती वाढत असल्याने नवीन प्रकारच्या आपत्तकालीन घटनाही उद्भवू शकतात, ही बाब मंत्री अमित शाह यांनी नमूद केली. हे सर्व पैलू लक्षात घेऊन, या दोन्ही संस्था धोरणनिर्मितीपासून ते प्रशिक्षण आणि अंमलबजावणीपर्यंतच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. काही क्षेत्रांच्या बाबतीत या दोन्ही संस्था एकत्रितपणेही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सर्व भागधारकांना आपत्ती व्यवस्थापनाच्या या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपापल्या विभागात एक समर्पित कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. विभागाच्या अध्यक्षांनी दर तीन महिन्यांतून किमान एकदा या कक्षाची आढावा बैठक घ्यावी आणि या विषयाला प्राधान्य द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जगभरात होत असलेल्या संशोधनाचा अभ्यास करावा आणि देशभरात स्थानिक पातळीवरील गरजेनुसार त्यातील शिफारसी लागू करण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी केली. पाकिस्तानच्या भागातून होणाऱ्या टोळधाडीच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने कायमस्वरूपी सज्जतेवर भर दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले. अशा हल्ल्यांचा सामना करण्यासाठी इतर देशांमध्ये राबवल्या जात असलेल्या सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती देशातही अमलात आणण्याची सूचनाही त्यांनी केली.

आपत्त्कालीन घटनांमागच्या कारणांचा शोध घेऊन, संशोधनाच्या माध्यमातून त्याचे दस्तावेजीकरण करण्याची गरजही अमित शाह यांनी व्यक्त केली. अशा दस्तऐवजीकरणाच्या सहकार्याने परिणामकारक प्रतिबंधात्मक आणि बचावात्मक उपाययोजना विकसित केल्या जाऊ शकतात असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या निधीचे शास्त्रीय पद्धतीने वाटपही करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यांच्या आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत दिला जाणारा निधी जवळपास चार पटीने वाढला आहे, तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत होणारे वाटप जवळपास तीन पटीने वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 11 वर्षांत या क्षेत्रासाठी सुमारे 2.5 लाख कोटी रुपये खर्च केले असून, ही एक मोठी यशदायी कामगिरी असल्याचे ते म्हणाले.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308874)
अभ्यागत कक्ष : 7