इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने महाराष्ट्राच्या मंत्रालयात आयोजित केली कार्यशाळा; एकात्मिक डिजिटल प्रशासनासाठी बहुभाषिक एआयच्या वापराला चालना


मंत्रालयाच्या भाषा विभागासोबतच्या चर्चेतून, मराठी आणि इतर भारतीय भाषांमधून, डिजिटल सेवा अधिक उत्तमप्रकारे पोहोचवण्यात भाषा एआय मधील संधींचा शोध

Posted On: 10 SEP 2026 12:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने, महाराष्ट्र सरकारच्या भाषा विभागाच्या मदतीने मंत्रालयात एक विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या भाषांमध्ये डिजिटल सेवा, सरकारी माहिती आणि नागरिक-केंद्री अॅप अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी बहुभाषिक आणि आवाज-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाच्या क्षमतांचा शोध घेणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

या कार्यशाळेत, अधिक सर्वसमावेशक, सर्वांना सहज उपलब्ध असेल अशी आणि नागरिक केंद्री डिजिटल प्रशासन व्यवस्था उभी करण्यात भाषा एआय चा वापर कसा करता येईल, यावर भर देण्यात आला.  या चर्चेत, लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात जी भाषा वापरतात, ती समजू शकेल, त्यावर प्रक्रिया करून, त्या भाषेतून संवाद साधू शकेल, अशी डिजिटल प्रणाली तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

भाषिणीच्या चमूने यावेळी, आपल्या बहुभाषिक एआय क्षमतांचे थेट उपयोग दाखवून ते समजावून सांगितले. यात, वाणी ओळखणे, मौखिक वाणी ते लिखित, लिखित ते मौखिक, भाषांतर आणि  आवाज- आधारित संवाद अशी वैशिष्ट्ये होती. तसेच या प्रत्यक्ष सादरीकरणात, हे तंत्रज्ञान, सार्वजनिक सेवांच्या अंमलबजावणीमध्ये कसे सामावून घेता येईल, यावर भर देण्यात आला, ज्यातून, नागरिक आणि डिजिटल सेवा यांच्यातील संवाद अधिक नैसर्गिक आणि सर्वसमावेशक वाटू शकेल.

स्थानिक गरजांशी सुसंगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्यासाठी उच्च दर्जाचा आणि विविध भाषिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारा भाषक डेटा किती महत्त्वाचा आहे, यावरही या कार्यशाळेत भर देण्यात आला. मराठी तसेच इतर भारतीय भाषांसाठी भाषिक डेटासेट अधिक सक्षम करण्यासाठी आणि भाषाविषयक एआय  तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी भाषा तज्ज्ञ, सरकारी संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि विविध समुदाय यांच्या अधिक व्यापक सहभागाच्या संधींवर चर्चेत भर देण्यात आला.या पार्श्वभूमीवर, भाषिणीचा क्राउडसोर्सिंग उपक्रम ‘भाषादान’, नागरिकांना भाषक डेटामध्ये योगदान देण्यासाठी आणि अधिक सक्षम भाषक संसाधने विकसित करण्यात मदत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो.

या संवादादरम्यान शासकीय विभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशेष शब्दावलीचा समावेश करण्याबरोबरच विभाग-विशिष्ट 'भाषिक एआय'च्या क्षमतेचा शोध घेण्यात आला. अशा क्षमतांमुळे शासकीय मजकूर समजून घेणे आणि त्यावर प्रक्रिया करणे अधिक सुलभ होईल, तसेच सार्वजनिक सेवांमध्ये अधिक प्रभावी बहुभाषिक संवादाला चालना मिळेल.

पर्यटन, वाहतूक आणि इतर सार्वजनिक सेवांसारख्या क्षेत्रांमध्ये भाषा-समावेशक अनुभवांना पाठबळ देण्यासाठी, प्रस्तावित 'महाभाषिणी' संकल्पनेसह महाराष्ट्र-केंद्रित बहुभाषिक एआय परिसंस्थेच्या क्षमतेवरही चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेमुळे महाराष्ट्र शासन आणि 'भाषिणी' यांच्यात सहकार्याची प्राधान्यप्राप्त क्षेत्रे आणि संभाव्य उपयोग जाणून घेण्यासाठी संधी उपलब्ध झाली.

भाषा तंत्रज्ञान, डेटासंच, संशोधन आणि भाषिक एआयच्या प्रत्यक्ष वापराबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी या कार्यशाळेत शासकीय अधिकारी, भाषा तज्ज्ञ आणि विविध भागधारक एकत्र आले होते.

महाराष्ट्र मंत्रालयातला हा संवाद सर्वसमावेशक बहुभाषिक डिजिटल परिसंस्था निर्माण करण्याच्या दिशेने केंद्र आणि राज्य सरकारमधले सहकार्य बळकट करण्याचे आणखी एक पाऊल ठरले आहे, त्यामुळे भाषा ही प्रसार, सहभाग आणि डिजिटल सक्षमीकरणाचे एक प्रमुख माध्यम बनेल.

डिजिटल इंडिया भाषिणी विभागा विषयी:

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत कार्यरत असलेला 'डिजिटल इंडिया भाषिणी विभाग' एआय-आधारित बहुभाषिक डिजिटल समावेशनासाठी एक राष्ट्रीय परिसंस्था उभी करत आहे. 'भाषिणी' 36 भारतीय लिखित भाषा, 23 भारतीय उच्चारित भाषा आणि 35 आंतरराष्ट्रीय भाषांसाठी वापरता येते, तसेच 800 पेक्षा जास्त सरकारी संकेतस्थळांना सक्षम करते, भाषिणीने 9 अब्जाहून जास्त एकत्रित कृत्रिम बुद्धिमत्ता निष्कर्ष सुलभ केले आहेत आणि दररोज 24 दशलक्ष पेक्षा जास्त कृत्रिम बुद्धिमत्ता निष्कर्षांवर प्रक्रिया होते आहे; त्यामुळे भाषिक एआयच्या माध्यमातून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा अधिक सुलभ व्हायला मदत होत आहे. 'नॅशनल हब फॉर लँग्वेज टेक्नॉलॉजी' (NHLT) हा ग्लोबल साउथमधल्या सर्वात मोठ्या इन्फरन्सिंग मंचापैकी एक असून, त्यामुळे शासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये भाषिक एआयचा वाढता वापर सुलभ होतो आहे.
 

निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2308704) अभ्यागत कक्ष : 14