संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंद महासागर क्षेत्राच्या सामूहिक सुरक्षा आणि समृद्धीसाठी सुरक्षित सागरी मार्ग व नौवहनाचे स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे: श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयात राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 09 SEP 2026 6:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

"हिंद महासागर क्षेत्राच्या  सामूहिक सुरक्षेसाठी आणि समृद्धीसाठी सुरक्षित सागरी मार्ग, नौवहनाचे स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर आणि अखंडित सागरी व्यापार हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. भारत आणि श्रीलंका यांच्यातले सहकार्य आणखी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले, जेणेकरून एक अनुकूल आणि सुरक्षित सागरी वातावरण निर्माण करता येईल आणि उदयोन्मुख सागरी आव्हाने विकासात्मक हितसंबंधांना व उज्ज्वल भविष्याला बाधक ठरण्यापूर्वीच त्यांचा सामना करता येईल. 9 सप्टेंबर 2026 रोजी कोलंबो येथील श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाला दिलेल्या भेटीदरम्यान, श्रीलंकेचे उप-संरक्षण मंत्री अरुण जयसेकरा, श्रीलंकेच्या भूदल, नौदल आणि हवाई दलाचे कमांडर्स तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

क्षमता बांधणीपासून ते संयुक्त सरावांपर्यंतच्या विविध उपाययोजनांद्वारे भारत आणि श्रीलंकेने आपली क्षमता वृद्धिंगत केली असली, तरी सागरी सहकार्यावर विशेष भर देत भारत-श्रीलंका यांच्यातील दीर्घकालीन संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले.

"घनिष्ठ आणि मजबूत सागरी भागीदारीसाठी आपल्याला नवीन कार्यपद्धती विकसित कराव्या लागतील; जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'महासागर' (क्षेत्रीय सुरक्षा आणि विकासासाठी  परस्पर आणि समग्र प्रगती ) या संकल्पनेचा आधार आहे.  परस्पर आणि समग्र  हे शब्द समन्वय, सहकार्य आणि संयुक्त प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात," असे राजनाथ सिंह म्हणाले.

"भारत आणि श्रीलंका यांच्यातील मजबूत सागरी सहकार्य हे परस्परांसाठी हितावह तसेच सामूहिक विकास व सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असेल," असे ते म्हणाले.

राजनाथ सिंह यांनी द्विपक्षीय सागरी सहकार्यात, विशेषतः 'शोध आणि बचाव' मोहिमांमध्ये साधलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा ठळक उल्लेख केला ; या मोहिमांमुळे समुद्रात अनेक मौल्यवान जीव वाचले आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की, अंमली पदार्थ विरोधी कारवाई, समुद्री चाच्यांविरुद्धची मोहीम आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करत आहेत.

"क्षमता बांधणी आणि संयुक्त सराव यांसारख्या क्षेत्रांत श्रीलंकेसोबत सहकार्य करण्यास भारत तयार आहे; यामुळेदो न्ही देशांना एकमेकांच्या अनुभवांतून शिकता येईल आणि संयुक्त उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती अधिक सुलभ करता येतील," असे त्यांनी सांगितले.

भारत आणि श्रीलंकेच्या मच्छिमारांना भेडसावणाऱ्या आव्हानांसंदर्भात  एकत्रितपणे काम करण्याच्या गरजेवर संरक्षणमंत्र्यांनी भर दिला.

भारताला खरा 'विश्वमित्र' किंवा विश्वासार्ह जगन्मित्र असे संबोधत , त्यांनी आपल्या सामायिक शेजारी देशांशी असलेल्या संबंधांमध्ये रचनात्मक आणि विश्वासार्ह भूमिका बजावण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

याप्रसंगी श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संरक्षण मंत्रालयात आगमन झाल्यावर राजनाथ सिंह यांना 'मानवंदना' देण्यात आली.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

 

 


(Release ID: 2308492) अभ्यागत कक्ष : 12