गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते पणजी येथे थे गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचे निशाण (President's Colour) प्रदान
गोवा पोलिसांना प्रदान केलेले राष्ट्रपतींचे निशाण म्हणजे गोवा पोलीसांच्या आठ दशकांच्या समर्पित सेवा आणि शौर्याचा राष्ट्रीय स्तरावर झालेला गौरव
गोव्याच्या विस्तृत किनारपट्टीचे रक्षण करण्याची, पर्यटकांच्या सुरक्षेची सुनिश्चिती करण्याची आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची जबाबदारी गोवा पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली
अंमली पदार्थांच्या उच्चाटनाच्या बाबतीतही गोवा पोलीस उत्तम कामगिरी करतील असा विश्वास केंद्रीय गृह मंत्र्यांनी केला व्यक्त
Posted On:
07 SEP 2026 7:19PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्याची राजधानी पणजी येथे गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचे निशाण (President's Colour) प्रदान करण्यात आले. या निमित्ताने झालेल्या समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नव आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक, केंद्रीय गृह सचिव, गोव्याचे मुख्य सचिव, गोव्याचे पोलीस महासंचालक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. गोवा पोलिसांना राष्ट्रपतींचे निशाण प्रदान करणे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आठ दशकांच्या उल्लेखनीय सेवेनंतर, गोवा पोलीस आज राष्ट्रपतींनी दिलेल्या या सन्मानासह देशातील इतर अनेक पोलीस दलांच्या बरोबरीने उभे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या ज्या राज्यांच्या पोलीस दलांना राष्ट्रपतींचे निशाण बहाल करण्यात आले आहे, त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान त्यांच्या गौरवशाली इतिहास, व्यावसायिक उत्कृष्टता, धैर्य, शिस्त आणि समर्पणासाठी मिळाला असल्याचेही शाह यांनी नमूद केले. गोवा हे एक लहान पण अत्यंत महत्त्वाचे राज्य असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. गोवा राज्याच्या स्थापनेनंतर, गोवा पोलिसांवर सुरक्षित शहर, सुरक्षित समाज आणि सुरक्षित सागरी सीमांची सुनिश्चिती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राज्याच्या स्थापनेपासून गोवा पोलिसांनी या तिन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत आणि राष्ट्रीय सुरक्षेत महत्त्वाचे योगदान दिले आहे असे ते म्हणाले.

विकसित राष्ट्र होण्यासाठीची सर्वात महत्त्वाची पूर्वअट म्हणजे देशाची संपूर्ण अंतर्गत सुरक्षा आणि सीमांची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित करणे ही आहे, असे अमित शहा म्हणाले. गोव्याला अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा या दोन्हीची जबाबदारी सोपवण्यात आल्या असून ही गौरवाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. गोव्याच्या विस्तृत सागरी सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी गोवा पोलिसांच्या खांद्यावर आहे. ही जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडताना, गोवा पोलिसांनी पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आणि मजबूत अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे, असे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी, गृहमंत्र्यांनी कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या अमर शहीदांना आदरांजली वाहिली. त्यांनी विशेषत्वाने पोलीस कर्मचारी बलराम शिंदे, अभिषेक शेर, शैलेश गावकर आणि विश्वास बी. देयकर यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या समर्पणामुळे गोवा पोलिसांना हा सन्मान मिळण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळाले आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
2026 पर्यंत भारताने 9 मुक्त व्यापार करार (एफटीए) पूर्ण केले आहेत. हे करार आता 38 देशांसोबत प्रभावी व्यापारी व्यवस्था म्हणून स्थापित झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्तारामुळे जगभरात सायबर फसवणुकीचा धोका जाणवत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सर्व राज्यांशी थेट संवाद सुरू केला असे शहा यांनी सांगितले. आगामी काळात 1930 हा हेल्पलाइन क्रमांक सर्व प्रकारच्या सायबर फसवणुकीविरोधात एक मजबूत ढाल म्हणून काम करेल आणि सर्व क्षेत्रांमध्ये भक्कम सुरक्षा प्रदान करेल, असे ते म्हणाले. गोवा पोलिसांनी 1930 हेल्पलाइनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित कॉल एजंट सुरू करून या संदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून गोवा पोलीस देशातील इतर राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे, अशा शब्दात त्यांनी पोलीस दलाचा गौरव केला.
_20260907192944_032135.jpeg)
त्यांनी सांगितले की, या हेल्पलाईनद्वारे कोकणी, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये तक्रारी नोंदवता येतील.
त्याचबरोबर, ही सेवा इतर भारतीय भाषांमधील तक्रारींची नोंदणी करण्यासाठी आणि त्या योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासही मदत करेल. यावेळी मंत्री अमित शाह म्हणाले की, देशभरातून आणि जगभरातून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात. त्यामुळे, दूरदृष्टी दर्शवत मुख्यमंत्र्यांनी हे सुनिश्चित केले की, हा 'एआय' म्हणजेच कृत्रिम बुध्दिमत्ता हा घटक केवळ कोकणी आणि मराठीपुरता मर्यादित न राहता, संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांचा त्यात समावेश केला जावा. पर्यटकांच्या हिताच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे आणि दूरदर्शी पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह म्हणाले की, गोवा पोलीस स्थापनेपासूनच प्रत्येक क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करत आहेत. खेळांमधील नैपुण्य हे गोवा पोलिसांचे एक वैशिष्ट्य राहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, 2029 मध्ये भारतात 'आंतरराष्ट्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा' आयोजित केली जाईल. या स्पर्धेमध्ये पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसाठीही क्रीडा स्पर्धांचा समावेश असेल. या प्रतिष्ठित स्पर्धेत पदकांच्या शर्यतीत भारत मागे राहणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी गोवा पोलिसांच्या सर्व कर्मचाऱ्यांना केले. या स्पर्धेची सर्वांनी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे आणि पूर्ण उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही शाह यांनी केले.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने आगामी काळात अमली पदार्थांविरुद्ध एक अधिक प्रभावी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 2026 ते 2029 या कालावधीसाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. या आराखड्यांतर्गत, सर्व संबंधित विभाग आणि सर्व राज्य सरकारांच्या सहभागातून भारतातील प्रत्येक गाव आणि शहर अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अमली पदार्थांचा सामना करण्यामध्येही गोवा पोलीस एक आघाडीचे दल म्हणून पुढे येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
***
सुषमा काणे/माधुरी पांगे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2307675)
अभ्यागत कक्ष : 10