वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
‘हील इन इंडिया गेटवे’मध्ये प्रशिक्षित काळजीवाहकांची संख्या वाढविण्यासह अधिकाधिक रुग्णालयांनी सहभागी होण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे आवाहन
Posted On:
07 SEP 2026 2:12PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज भारतातील वैद्यकीय उपचारांसाठी पर्यटनाची (मेडिकल व्हॅल्यू टूरिझम) परिसंस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य तसेच वेलनेस सेवांचे मुख्य केंद्र म्हणून भारताला प्रस्थापित करण्यासाठी 5 मुद्द्यांची कृती योजना मांडली. नवी दिल्लीतील 'भारत हेल्थ ग्लोबल एक्सपो 2026' मधील 'संजीवनी 2026' या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवू शकेल असा कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि काळजीवाहूंना (केअरगिव्हर्स) प्रशिक्षण व प्रमाणपत्र देणे ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे, असे ते म्हणाले.
अधिकाधिक रुग्णालयांनी 'हील इन इंडिया' पोर्टलशी जोडले जावे आणि उपचारांचे प्रामाणिक व पारदर्शक पॅकेजेस जाहीर करावेत, असे त्यांनी दुसरा मुद्दा स्पष्ट करताना नमूद केले. रुग्णालयांनी नैतिक पद्धतींचे पालन केले पाहिजे आणि रुग्णांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कधीही करू नये; कारण एका चुकीच्या कृत्यामुळे भारताचे नाव, व्यवसाय आणि विश्वासार्हता खराब होऊ शकते, यावर त्यांनी भर दिला.
तिसरा मुद्दा म्हणून गोयल यांनी विमा कंपन्या आणि हेल्थ-टेक कंपन्यांना अशी उत्पादने आणि प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे आवाहन केले, ज्यामुळे रुग्णांचा प्रवास अधिक सुलभ होईल, त्यांना वेळेवर खर्चाची भरपाई मिळेल आणि कॅशलेस भरणा अधिक सहज उपलब्ध होईल.
चौथा मुद्दा म्हणजे जगभरात प्रदर्शने व सादरीकरणे आयोजित करणे, जागतिक पातळीवर रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी मध्यस्थ व भागीदारी प्रस्थापित करणे आणि केवळ NABH (हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्ससाठीचे राष्ट्रीय मान्यता मंडळ) मान्यताप्राप्त, सत्यापित आणि पॅनेलवरील रुग्णालयांनाच परदेशातून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली जाईल याची खात्री करणे.
पाचवा मुद्दा म्हणून, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांना रुग्णालये व वेलनेस सेंटर्समधील गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे, आपले जाळे विस्तारण्याचे, उच्च दर्जाच्या सुविधांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी देण्याचे आणि रुग्णांच्या कल्याणासाठी या सुविधांचे विपणन करण्याचे आवाहन केले. वैद्यकीय पर्यटन हे केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंतही विस्तारले पाहिजे, असे ते म्हणाले.
भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठीच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत कोणताही भेदभाव असू शकत नाही, यावर त्यांनी विशेष भर दिला. जगातील कोणत्याही भागातून येणाऱ्या व्यक्तीला मिळणारी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा प्रत्येक भारतीय रुग्णालाही मिळेल , याची भारताने खात्री केली पाहिजे, असे गोयल यांनी नमूद केले.
***
सुषमा काणे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2307427)
अभ्यागत कक्ष : 13