राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
देशाच्या विकासात शैक्षणिक उत्कृष्टता, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांना अमाप महत्त्व: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
05 SEP 2026 4:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 सप्टेंबर, 2026) शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.
या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की आपल्या संविधानात नमूद केलेल्या समान संधींच्या आदर्शाची पूर्तता करण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन आहे. त्या म्हणाल्या की प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण नगण्य ठेवण्याचे यश शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे. या राष्ट्रीय यशाबद्दल त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की शालेय शिक्षण हे शिक्षण प्रणालीचा पाया आहे. ज्ञान आणि कौशल्ये कधीही मिळवता येत असली तरी बालपणातच चांगल्या वर्तनाचे धडे मिळणे अधिक प्रभावी ठरते. सुरुवातीच्या इयत्तांमध्ये मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि नैतिक विकासावर काळजीपूर्वकरीत्या लक्ष केंद्रित करून आपले शिक्षक उत्कृष्ट विद्यार्थी आणि कर्तव्यदक्ष नागरिकांच्या भावी पिढ्या घडवू शकतात.
राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांमधून येतात; काही त्यांच्या कुटुंबातील पहिलेच शिकणारे असतात; इतर सामान्य गावातील शाळांमधून मोठ्या शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेतात; काही स्वभावतःच लाजाळू असतात; काहींमध्ये प्रचंड प्रतिभा असूनही आत्मविश्वासाची कमतरता असते; आणि काही विशेष गरजा असलेली मुले असतात. कोणत्याही कारणामुळे अपुरेपणाची भावना अनुभवणाऱ्या अशा सर्व विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांची उन्नती घडवून आणणे ही शिक्षकांची विशेष जबाबदारी आहे.


राष्ट्रपती म्हणाल्या की देशाच्या विकासात शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांना प्रचंड महत्त्व आहे. भारताला जगाची कौशल्य राजधानी म्हणून स्थापित करणे आणि त्याला ज्ञानाची महासत्ता बनवणे, हे आमच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांपैकी एक आहे.
राष्ट्रपती म्हणाल्या की आपण 'विकसित भारत' घडवण्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहोत आणि हे ध्येय केवळ जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीद्वारेच साध्य होऊ शकते. आपले शिक्षक शिक्षण प्रणालीमध्ये प्राण फुंकतात. आपल्या देशातील एकही विद्यार्थी दर्जेदार शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी यावर भर दिला की आपल्या शिक्षकांनी स्नेह आणि समर्पणातून सर्व विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, प्रेरणा, नैतिकता आणि संवेदनशीलता रुजवली पाहिजे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2306936)
अभ्यागत कक्ष : 10