वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचा जागतिक व्यापारातील सहभाग विस्तारण्यासाठी देशव्यापी मुक्त व्यापार करार (एफटीए) वापर मोहिम राबवण्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

Posted On: 03 SEP 2026 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज, जगभरात भारताचा व्यापार विस्तारण्यासाठी आणि वाढलेल्या बाजारपेठ उपलब्धतेचे फायदे देशभरातील उद्योगांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्यासाठी, मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) जास्तीत जास्त वापर करण्याकरिता केंद्रित, सर्वसमावेशक आणि देशव्यापी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नवी दिल्ली येथे आज “मुक्त व्यापार करारांचा लाभ: जनसंपर्क कार्यक्रम” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना गोयल यांनी भारताच्या विस्तारत असलेल्या मुक्त व्यापार करारांच्या जाळ्याचे देशभरातील उद्योगांसाठी अधिक निर्यात संधींमध्ये रूपांतर करण्याकरिता एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

दिवसभराच्या कार्यशाळेत केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, निर्यात प्रोत्साहन परिषद तसेच विविध उद्योग संघटनांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. भारताच्या विस्तारत असलेल्या मुक्त व्यापार करारांच्या जाळ्याचे भारतीय निर्यातदारांसाठी, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) आणि प्रथमच निर्यात करणाऱ्यांसाठी, ठोस  परिणामांमध्ये रूपांतर करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

भारताने त्याच्या योगदानासाठी जगभरात ओळखली जाणारी आणि प्रतिष्ठित  अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे तसेच जगाचा एक विश्वासार्ह भागीदार बनले पाहिजे, असे गोयल म्हणाले. या विश्वासाचे मूल्यात रूपांतर झाले पाहिजे, तसेच 2047 पर्यंत भारताला 30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने देशभरातील सामूहिक प्रयत्नांमधून हे मूल्य निर्माण झाले पाहिजे. या उद्दीष्टात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा वाटा असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

गोयल म्हणाले की भारत आपल्या आर्थिक प्रवासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यातून जात आहे. त्यांनी स्थिर किंमतींवर आधारित असलेल्या पहिल्या तिमाहीतील 7.8% जीडीपी वाढीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की जगभरातील अनिश्चितता आणि प्रचंड अशांततेच्या काळात 7.8% जीडीपी वाढ साध्य करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांनी लोकांना नकारात्मक विचार करणाऱ्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देण्याचे आवाहन केले.

गोयल म्हणाले की सुमारे 60 ट्रिलियन डॉलर्सच्या जीडीपीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्थव्यवस्थांशी संलग्न असलेले नऊ मुक्त व्यापार करार भारताला जवळपास दोन-तृतीयांश जागतिक व्यापारामध्ये प्राधान्यपूर्ण प्रवेश उपलब्ध करून देतील. ते म्हणाले की कॅनडा, मेक्सिको, चिली, मर्कोसुर, सॅकू, जीसीसी आणि इस्रायल यांच्यासह भारत पुढील काही महिने आणि एक-दोन वर्षांत जे इतर मुक्त व्यापार करार करणार आहे, तसेच आसियान, कोरिया आणि जपान यांच्यासोबत आढावा घेण्याचे प्रयत्न करणार आहे किंवा अधिकाधिक बाजारपेठ मिळवण्यासाठी इतर पावले उचलल्यास भारताला जागतिक व्यापाराच्या 75% भागामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी दराने प्रवेश मिळेल.

आधीच कार्यान्वित असलेल्या आणि लवकरच लागू होणाऱ्या मुक्त व्यापार करारांविषयी बोलताना मंत्री म्हणाले की चालू वर्षासाठी एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 15 जुलैपासून भारत-युके मुक्त व्यापार करार कार्यान्वित झाला असून मॉरिशस, ओमान, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि युके हे देश आधीच या करारात सामील आहेत. चार देशांचा समावेश असलेला ईएफटीए देखील लवकरच कार्यान्वित होईल तर न्यूझीलंड लवकरच या करारांतर्गत येईल आणि त्यानंतर युरोपियन युनियनचे 27 देश सामील होतील.

ते म्हणाले की अमेरिका भारताच्या स्पर्धकांच्या तुलनेत भारताला सवलतीचा दर देऊ शकला तर‌ पीटीए निश्चित केला जाईल आणि त्याचे अधिक तपशील जाहीर केले जातील.

गोयल म्हणाले की भारताने चालू वर्षासाठी 1 ट्रिलियन डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे, जे सुमारे 16% वाढ दर्शवते.

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306316) अभ्यागत कक्ष : 12