दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंचार विभागाने आयएमईआयमध्ये फेरफार आणि दूरसंचार ओळखचिन्हांचा गैरवापर यासंदर्भात नागरिकांना केले सावध

Posted On: 31 AUG 2026 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

संपूर्ण भारतात मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांचा जलद विस्तार होत आहे. याचसोबत मोबाईल उपकरणांच्या इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) क्रमांकांचा गैरवापर ही एक गंभीर चिंतेची बाब म्हणून समोर आली आहे. अशा गैरवापरामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते आणि दूरसंचार जाळ्याच्या सुरक्षिततेला व अखंडतेला धोका निर्माण होऊ शकतो. वैशिष्ट्यपूर्ण दूरसंचार ओळखचिन्हांमध्ये(टेलिकम्युनिकेशन आयडेंटिफायर्स) फेरफार करणे आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी, केंद्र सरकारने केल्या आहेत.

IMEI क्रमांकांमध्ये फेरफार करणे तसेच अनधिकृत वा फेरफार केलेली दूरसंचार ओळखचिन्हे  असलेले उपकरण वापरणे हा दूरसंचार कायदा 2023 आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे, हे दूरसंचार विभाग पुन्हा स्पष्ट करत आहे.

ग्राहकाने आपल्या स्वतःच्या नावावर सिम कार्ड घेऊन ते नंतर दुसऱ्याला उसने देणे, भाड्याने देणे किंवा सायबर फसवणूक किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी त्याचा गैरवापर होऊ देणे, यामुळे मूळ ग्राहकावर कायदेशीर जबाबदारी येऊ शकते.हे नागरिकांनी देखील लक्षात घेतले पाहिजे.

अशाप्रकारे फेरफार केलेले IMEI क्रमांक असलेल्या उपकरणांचा वापर करणे, फसवणुकीच्या मार्गाने सिम कार्ड मिळवणे, किंवा त्यांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींना सिम कार्ड हस्तांतरित करणे, याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात.

यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे आणि आपले मोबाईल उपकरण सत्यापित व सुरक्षित करण्यासाठी 'संचार साथी' उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेल्या डिजिटल साधनांचा वापर करावा असे आवाहन दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. 

संचार साथी प्लॅटफॉर्मद्वारे मोबाईल हँडसेटच्या IMEI तपशिलाची पडताळणी करता येते. या सेवेमुळे नागरिकांना त्या उपकरणाशी  संबंधित ब्रँडचे नाव, मॉडेलचे नाव आणि उत्पादकाची माहिती यांसारखे तपशील तपासता येतात.

नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, की त्यांनी या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या विविध नागरिक-केंद्रित सेवांचा लाभ घेण्यासाठी www.sancharsaathi.gov.in येथील संचार साथी पोर्टलला भेट द्यावी किंवा संचार साथी मोबाईल ॲप डाउनलोड करावे.

 

* * *

सोनाली काकडे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2305265) अभ्यागत कक्ष : 10