उपराष्ट्रपती कार्यालय
संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग-शिक्षणसंस्थांमधील सहकार्य हीच भारताच्या प्रगतीची गुरुकिल्ली: उपराष्ट्रपती
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांसाठी युवा वर्गाने स्वतःला सज्ज राखावे : उपराष्ट्रपती
Posted On:
29 AUG 2026 4:04PM by PIB Mumbai
शैक्षणिक संस्थांनी केवळ मूलभूत शिक्षण देण्यापुरते मर्यादित न राहता ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित झाले पाहिजे असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले आहे. पेरुंदुरई, इरोड येथील ‘कोंगू वेल्लाळर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (केव्हीआयटी) ट्रस्टच्या संस्थापक दिन सोहळ्यात आणि ‘अरीवुकुडम’ या ज्ञानकेंद्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते.
सी. पी. राधाकृष्णन यांनी युवा वर्गाला आपले ज्ञान निरंतर अद्ययावत करण्याचे आणि मूलभूत शिक्षणाकडून संशोधनाभिमुख शिक्षणाकडे वाटचाल करण्याची कळकळीची विनंती केली. त्यांनी तरुणांना संशोधन, नवोन्मेष आणि स्वामित्व हक्क (पेटंट्स) निर्मितीत सक्रिय सहभाग घेण्याचे तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्रमानव तंत्रज्ञान, अर्धसंवाहक, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानासारख्या नव्या युगातील क्षेत्रांसाठी स्वतःला सज्ज राखण्याचे आवाहनही केले.
“बदल हाच एकमेव शाश्वत नियम आहे” यावर भर देत, सी. पी. राधाकृष्णन यांनी तरुणांना स्वतःची ताकद ओळखण्याचा, स्पष्ट ध्येय निश्चित करण्याचा आणि इतरांशी तुलना न करता सातत्यानं प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी मानसिक शांती आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेसाठी योग आणि ध्यानाचं महत्त्व अधोरेखित केलं, तसेच स्वामी विवेकानंदांच्या “तुम्ही जसा विचार करता, तसेच बनता” या विचारांचा पुनरुच्चार केला.
‘अरीवुकुडम’ हे संशोधन, नवोन्मेष आणि ज्ञाननिर्मितीचे प्रमुख केंद्र बनेल. यामुळे या संस्था सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय विकासात योगदान देणाऱ्या जागतिक ज्ञान केंद्रांच्या रूपात अधिक मजबूत होतील, असा विश्वास उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला.
भारताच्या शाश्वत प्रगतीसाठी संशोधन, नवोन्मेष आणि उद्योग-शिक्षणसंस्थांमधील मजबूत सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी अधोरेखित केले. या प्रसंगी त्यांनी कोंगू इंजिनिअरिंग कॉलेज या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, ‘टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेटर’ या तंत्रज्ञान व्यवसाय नवउद्यम केंद्रा द्वारे आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि तांत्रिक उपायांची पाहणी केली.
सी. पी. राधाकृष्णन यांनी, महाविद्यालय आणि न्यासा (ट्रस्ट) शी जोडलेल्या गुणवंत तसेच उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार केला. यावेळी त्यांनी अरिवुकूडम – संशोधन उद्यान, औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालय, कोंगू नॅचरोपॅथी अँड योग मेडिकल कॉलेज हे निसर्गोपचार आणि योग वैद्यकीय महाविद्यालय तसेच केव्हीआयटीटीच्या क्लाउड किचन (ऑनलाइन/घरपोच खाद्यपदार्थांची सेवा देणारे स्वयंपाकगृह) च्या पायाभरणीच्या स्मरणफलकाचे अनावरण केले.
***
निलिमा चितळे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2304543)
अभ्यागत कक्ष : 8