राष्ट्रपती कार्यालय
भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
भारताचे जागतिक संबंध नेहमीच आपल्या देशातील जनतेच्या आकांक्षांशी सुसंगत असावेत : राष्ट्रपती मुर्मू
Posted On:
27 AUG 2026 8:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्थेत ‘इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम’ पूर्ण करत असलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील (2025 ची तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि हा प्रशिक्षण अभ्यासक्रम करत असलेल्या भूतानच्या दोन राजनैतिक अधिकाऱ्यांनी आज (27 ऑगस्ट 2026) राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी आयएफएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, "परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करणे, देशाच्या हितसंबंधांना पुढे नेणे आणि जगभरातील देशांशी भारताचे संबंध मजबूत करणे ही मोठी जबाबदारी आणि सन्मान तुम्हाला लाभणार आहे."

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताची आर्थिक प्रगती जगासोबत सहकार्य आणि संबंध वृद्धिंगत करण्यासाठी नव्या संधी निर्माण करत आहे. त्यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना गुंतवणूक, तंत्रज्ञान, उत्पादन, अक्षय ऊर्जा आणि नवोन्मेष यांसारख्या क्षेत्रांतील उदयोन्मुख संधींची दखल घेऊन, भारताचे राष्ट्रीय हित पुढे नेणाऱ्या भागीदारी निर्माण करण्याचा सल्ला दिला. मुत्सद्देगिरीचा थेट फायदा भारताच्या समृद्धीसाठी झाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, भारताचे जगासोबतचे संबंध नेहमीच आपल्या देशातील जनतेच्या आकांक्षांशी सुसंगत असले पाहिजेत — 'राष्ट्रहित सर्वोपरि' हा भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक जीवनाचा कायमस्वरूपी सिद्धान्त राहिला पाहिजे. 2047 पर्यंत 'विकसित भारत' बनण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत असताना मुत्सद्देगिरीची भूमिका अधिक विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी आपले काम केवळ सरकारी कार्यालये आणि औपचारिक बैठकांपुरते मर्यादित ठेवू नये. त्यांनी विद्यापीठे, व्यावसायिक, संशोधक, नवोन्मेषक, सांस्कृतिक संस्था, नागरी समाज आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचले पाहिजे. परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाशी अर्थपूर्ण संवाद साधण्याचा आणि विशेषतः भारतीय वंशाच्या तरुणांना भारताच्या विकासप्रवासाशी जोडून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
मुत्सद्देगिरीचे स्वरूप वेगाने बदलत असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या महत्त्वाची नोंद घेतली. "तंत्रज्ञानाचा वापर उत्तम सुशासन आणि सखोल संवादाचे साधन म्हणून केला पाहिजे, परंतु तंत्रज्ञान कधीही संवेदनशीलतेची जागा घेऊ शकत नाही. परदेशातील भारतीय दूतावासांनी गरजेच्या वेळी भारतीय नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध आणि तत्पर राहिले पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले.

परदेशात प्रवास करताना आपण केवळ भारत सरकारचेच नाही, तर 140 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे, असा सल्ला देत अधिकाऱ्यांनी सचोटी, प्रामाणिकपणा आणि व्यावसायिकतेचे सर्वोच्च मानक जपण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी इथे भेट द्यावी
* * *
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303972)
अभ्यागत कक्ष : 8