वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचा जपान दौरा संपन्न; भारतात अधिक गुंतवणुकीचे आणि अधिक भक्कम औद्योगिक भागीदारीचे केले आवाहन
भारताचे सहा-स्तंभीय सेमी कंडक्टर धोरण गोयल यांनी केले अधोरेखित; जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे निमंत्रण
भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यवस्थेतील सहभागाचा विस्तार करण्यात जपानी कंपन्यांनी दाखवली रुची
Posted On:
27 AUG 2026 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी काल, म्हणजेच बुधवारी आपला जपानचा अधिकृत दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. या दौऱ्यात, त्यांनी टोक्यो, नागोया आणि ओसाका या शहरात अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या, या बैठकांचा उद्देश, जपानची भारतातील गुंतवणूक वाढवणे, औद्योगिक भागीदारी अधिक मजबूत करणे आणि उदयोन्मुख तसेच महत्वाच्या क्षेत्रात, द्विपक्षीय आर्थिक सहकार्य अधिक विस्तारणे, असा होता.
आपल्या या दौऱ्यादरम्यान, गोयल यांनी, जपान सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांशी, वित्तीय संस्थांशी आणि उद्योग संस्थांच्या कार्यकारी प्रमुखांशी चर्चा केली. भारताविषयी विशेष रस आहे अशा 30 जपानी कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या प्रमुखांचाही यात समावेश होता. या बैठकांमध्ये, गुंतवणुकीचा विस्तार, लवचिक पुरवठा साखळ्या अधिक मजबूत करणे, तंत्रज्ञानविषयक भागीदारीच्या दिशेने पुढे जाणे आणि व्यवसाय- ते -व्यवसाय सहकार्याचे नवे मार्ग शोधणे, यावर भर देण्यात आला.
या बैठकीचा महत्वाचा उद्देश म्हणजे, भारतासाठी, जपानमधून दीर्घकालीन संस्थात्मक भांडवलाची उभारणी करणे हा होता. त्यासाठी गोयल यांनी जपानमधल्या आघाडीच्या वित्तीय संस्थांशी चर्चा केली. या चर्चामध्ये, भारतात, भांडवलाचा पुरवठा अधिक वाढवण्याच्या संधींची चाचपणी करण्यात आली. भारतात वाढत असलेल्या पायाभूत सुविधा, उत्पादन क्षेत्र, तंत्रज्ञान आणि वित्तीय व्यवस्था, अशा सर्वांविषयी यावेळी चर्चा झाली.
तसेच, गोयल यांनी, भांडवली वस्तू, यंत्रसामग्री आणि वाहन उद्योग; सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता; स्टार्टअप्स; तसेच विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार या क्षेत्रांविषयी झालेल्या स्वतंत्र गोलमेज चर्चांचेही अध्यक्षस्थान भूषवले. या चर्चांमध्ये जपान आणि भारतातील विविध व्यावसायिक क्षेत्रांतील कंपन्यांचे प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील पुरवठादार कंपन्या तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विशेष सहभाग असलेल्या ठोस गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक भागीदारीच्या संधी शोधण्यासाठी या चर्चांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धीमत्ता विषयक चर्चेत, गोयल यांनी, भारतात, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक अशी सेमी कंडक्टर व्यवस्था विकसित करण्याची महत्वाकांक्षा अधोरेखित करत, 2032 पर्यंत सेमी कंडक्टर ची मागणी, 150 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असेही सांगितले. म्हणूनच, चिप डिझाईन, सेमीकंडक्टर यंत्रणा आणि सामग्री, फॅब्रिकेशन, एटीएमपी/ओएसएटी, संशोधन आणि विकास आणि कौशल्य (प्रतिभा) विकास असे, भारताचे या क्षेत्रातील सहा स्तंभीय धोरण अधोरेखित केले.
भारतातील कुशल आणि तरुण मनुष्यबळाची मोठी उपलब्धता आणि जपानचे अत्याधुनिक तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रातील कौशल्य तसेच उत्पादन क्षमता यांच्या संयोगातून जागतिक दर्जाची सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान क्रांतीसाठी भारतात चालना मिळू शकते, असेही गोयल यांनी यावेळी अधोरेखित केले.
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील चर्चांमध्ये सहभागी झालेल्या जपानी कंपन्यांनी सेमीकंडक्टर सामग्री आणि उपकरणे, पॉवर सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, लॉजिस्टिक्स आणि संबंधित प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारतातील आपली उपस्थिती विस्तारण्याची इच्छा व्यक्त केली. धोलेरा आणि साणंद यांसारख्या उदयोन्मुख सेमीकंडक्टर क्लस्टर्समध्ये विश्वासार्ह वीजपुरवठा, अल्ट्रा-प्युअर वॉटर, कुशल मनुष्यबळ आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांसह आवश्यक सहाय्यक पायाभूत सुविधा पुरवण्याबाबतही चर्चा झाली.
मंत्र्यांनी जपानचे अर्थ, व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा र्योसेई, तसेच जेट्रो, जेबीआयसी आणि जिका यांच्या वरिष्ठ प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक, सक्षम पुरवठा साखळी, उत्पादन क्षेत्रातील सहकार्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानी कंपन्यांचा अधिक सहभाग अशा विषयांवर चर्चा झाली.
1,500 हून अधिक आघाडीच्या जपानी कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केइदानरेन (जपान बिझनेस फेडरेशन) सोबतच्या संवादात गोयल यांनी भारत-जपान आर्थिक भागीदारीची वाढती व्याप्ती अधोरेखित केली. पारंपरिक व्यापार तसेच आर्थिक सुरक्षा, सक्षम पुरवठा साखळी, प्रगत तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, संरक्षणाशी संबंधित उत्पादन आणि लोकांमधील परस्पर संबंध यांचा या भागिदारीत समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी भारतातील गुंतवणूक वाढवावी आणि भारतात आपला विस्तार अधिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
जपानी उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी मंत्र्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्या सहज उपलब्धता आणि सक्रिय सहभागाची या नेत्यांनी प्रशंसा केली. भारताच्या विकासाच्या प्रवासावरील आपल्या दृढ विश्वासाचा पुनरुच्चार करत जपानी उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी धोरणात्मक संबंध वाढवण्याची आणि संपूर्ण भारतात गुंतवणुकीत विविधता आणण्याची आपली वचनबद्धता दर्शवली.
गोयल यांनी नागोया येथे आयोजित 'भारत-जपान नेक्स्ट जनरेशन इकॉनॉमिक पार्टनरशिप' रोड शो लाही संबोधित केले. या रोडशोमध्ये चुबू प्रदेशातील 80 हून अधिक जपानी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. यात वाहन उद्योग, अंतराळ, मशिन टूल्स, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, वाहनांचे सुटे भाग तसेच लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) यांसारख्या क्षेत्रांवर चर्चा झाली.
भारताच्या मजबूत आर्थिक पायाभूत स्थितीवर प्रकाश टाकत, गोयल यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर आव्हाने असूनही भारतीय अर्थव्यवस्थेने 7.7 टक्के वाढ नोंदवली आहे आणि 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2025 मधील जपान दौऱ्यादरम्यान निश्चित करण्यात आलेल्या, पुढील दशकात भारतात 10 ट्रिलियन येन जपानी खाजगी गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांनाही चालना मिळाली. भारताच्या विकासाच्या पुढील टप्प्यात, विशेषतः उत्पादन, पायाभूत सुविधा, वित्तीय सेवा, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा आणि इतर नव्या पिढीच्या उद्योगांमध्ये जपानी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि कंपन्यांच्या अधिक सहभागाचे त्यांनी आवाहन केले.
* * *
निलिमा चितळे/राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303831)
अभ्यागत कक्ष : 10