वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
टोकियो येथील भारत-जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारताच्या विकसित होत जाणाऱ्या स्टार्ट अप परिसंस्थेवर प्रकाश टाकला
स्टार्ट अप, गहन तंत्रज्ञान, नवोन्मेष तसेच एमएसएमई या क्षेत्रांतील सहकार्य आणखी दृढ करण्याप्रतीच्या कटिबद्धतेला भारत आणि जपान यांचा दुजोरा
भारत-जपान स्टार्ट अप गोलमेज परिषदेत आघाडीच्या सुमारे 40 जपानी कंपन्या सहभागी
Posted On:
26 AUG 2026 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2026
टोकियो येथील भारत-जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेत आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गेल्या दशकभरात स्थापन झालेल्या सुमारे 250,000 स्टार्ट अप उद्योगांसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप परिसंस्था म्हणून भारताच्या उदयावर अधिक प्रकाश टाकला. ते म्हणाले की भारताची भव्य देशांतर्गत बाजारपेठ, गहन एसटीईएम म्हणजेच विज्ञान,तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रातले प्रतिभावंत, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच वेगाने विस्तारत जाणारी नवोन्मेष परिसंस्था यांच्यामुळे जपानचे तंत्रज्ञान, गुंतवणूक तसेच नवोन्मेष भागीदारीसाठी भारत आकर्षक स्थळ ठरतो आहे.
सदर गोलमेज परिषदेने सरकारमधील ज्येष्ठ प्रतिनिधी, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि दोन्ही देशांमधील स्टार्ट अप उद्योगांना एकत्र आणून, स्टार्ट अप, गहन तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग या क्षेत्रांतील सहकार्य आणखी दृढ करण्यासंदर्भात भारत आणि जपान यांच्यातील सामायिक कटिबद्धतेला दुजोरा दिला आहे. या परिषदेत झालेल्या चर्चांमध्ये तंत्रज्ञान भागीदारी बळकट करणे, गुंतवणुकीला चालना तसेच दोन्ही देशांदरम्यान नवोन्मेष प्रेरित आर्थिक सहकार्याच्या पुढच्या टप्प्याची जोपासना करणे यावर अधिक भर देण्यात आला.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करत राजदूत नगमा मोहमद मलिक यांनी दोन्ही देशांदरम्यान स्टार्ट अप मधील वाढता सहभाग अधोरेखित केला. भारत-जपान पिचिंग मालिकेने यापूर्वीच 65 भारतीय स्टार्ट अप्सना सुमारे 100 जपानी महामंडळांशी जोडले आहे आणि 30 हून अधिक व्यावसायिक भागीदारींसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. राजदूत म्हणाल्या की 222 सदस्यांच्या भारतीय व्यापारी शिष्टमंडळाच्या सहभागामुळे दोन नाविन्यपूर्ण परिसंस्थांमध्ये नवीन आणि दीर्घकालीन भागीदारी सुरु करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत-जपान स्टार्ट अप सहकार्याच्या पुढच्या टप्प्यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी चार घटकांवर आधारलेला दूरदृष्टीपूर्ण आराखडा मांडला: सुरुवातीच्या टप्प्यातील संशोधन, गहन तंत्रज्ञान नवोन्मेष तसेच व्यावसायिकीकरण यांच्यासाठी दीर्घकालीन भांडवल उभारणीसाठी जपान-भारत गहन तंत्रज्ञान भांडवल कॉरिडॉर; दोन्ही देशांतील विद्यापीठे, चिंतन संस्था, संशोधन आणि विकास संस्था, प्रयोगशाळा तसेच चाचणी सुविधा यांना जोडणारा दुतर्फा नवोन्मेष सेतू; भारतातील व्यापक अभियांत्रिकी प्रतिभा आणि उद्योजकीय अष्टपैलुत्व यांना जपानचे अचूक अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतांशी जोडणारे उत्पादन आणि तंत्रज्ञान एकत्रीकरण; आणि भारतीय संस्थापक, जपानी महामंडळे, व्हेन्चर निधी आणि धोरणात्मक गुंतवणूकदार यांच्यादरम्यान नियमित संवादात सुलभता आणण्यासाठी संयुक्त स्टार्ट अप पिचिंग मंच.
केंद्रीय मंत्र्यांनी या कार्यक्रमात भारत सरकारतर्फे प्रस्तावित आणि गहन तंत्रज्ञान संबंधित उद्योगांना पाठबळ देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या, सुमारे 1 अब्ज डॉलर्स मूल्याच्या दुसऱ्या फंड ऑफ फंड्स वर देखील प्रकाश टाकला आणि जपानमधील गुंतवणूकदारांना अधिक सहभागाचे निमंत्रण दिले.
जपानी भागधारकांनी भारतीय स्टार्ट अप परिसंस्थेच्या वाढत्या परिपक्वतेचे स्वागत केले.जेआयसीए चे ज्येष्ठ उपाध्यक्ष शोहेई हारा यांनी दुतर्फा भागीदारीचे महत्त्व ठळकपणे सांगत, सामाजिक आणि विकासविषयक आव्हानांना मोठ्या प्रमाणातील व्यवसाय संधींमध्ये परिवर्तीत करण्याच्या भारताच्या क्षमतेकडून शिकवण घेत, या भागीदारीत जपान स्वतःच्या तांत्रिक क्षमतांचे योगदान देऊ शकतो असे नमूद केले. जेआयसीएने भारतीय बाजारपेठेत जपानी स्टार्ट अप्सना मोठ्या संख्येने असलेल्या संधींचे दर्शन घडवण्याचा हेतू देखील व्यक्त केला.
या गोलमेज परिषदेत टोकियो महानगरपालिका आणि जेट्रोच्या वरिष्ठ नेतृत्वाने सहभाग घेतला, त्यांनी जपानी कंपन्यांना या सत्रात आणण्यासाठी मिशनसोबत भागीदारी केली होती. सुमारे 40 आघाडीच्या जपानी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या चर्चेत भाग घेतला. विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्स, भारतीय व्यावसायिक संघटना आणि भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळाचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.
उद्योग प्रतिनिधींनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना स्टार्टअप्स आणि जागतिक पुरवठा साखळ्यांशी जोडण्याच्या आणि भारतात उत्पादन व विस्तार करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना प्लग-अँड-प्ले अर्थात त्वरित सुरु करता येण्यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वावर भर दिला.
व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदारांनी भविष्यातील भारत-जपान गुंतवणुकीसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर, आरोग्यसेवा, अंतराळ, संरक्षण, प्रगत उत्पादन आणि गहन तंत्रज्ञान ही प्रमुख क्षेत्रे असल्याचे ओळखले. गुंतवणूकदारांनी भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचे प्रामुख्याने इंटरनेट आणि सॉफ्टवेअर व्यवसायांपासून उत्पादन- आणि तंत्रज्ञान-केंद्रित उद्योगांकडे होणारे स्पष्ट स्थित्यंतरही अधोरेखित केले.
भारतीय स्टार्टअप्सनी हवाईक्षेत्र आणि संरक्षण, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा, कृत्रिम अवयव, रोबोटिक्स, गोदामांचे स्वयंचलन, दळणवळण, मोबिलिटी आणि डिजिटल हेल्थ या क्षेत्रांमधील आपल्या क्षमतांचे प्रदर्शन केले. अनेक कंपन्यांनी तंत्रज्ञान पडताळणी, अचूक उत्पादन, गुंतवणूक, बाजारपेठ प्रवेश आणि जपानी व जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये एकत्रीकरणासाठी जपानसोबत भागीदारीच्या शक्यता पडताळून पाहिल्या.
गोलमेज परिषदेने भारत आणि जपानच्या परस्पर पूरक सामर्थ्यांची दखल घेतली. भारताकडे व्याप्ती, प्रतिभा, डिजिटल क्षमता आणि उद्योजकतेचा वेग आहे, तर जपानकडे दीर्घकालीन भांडवल, प्रगत तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्रातील उत्कृष्टता आणि जागतिक दर्जाचे मानक आहेत. या सामर्थ्यांच्या एकत्रीकरणामुळे भारत, जपान आणि इतर देशांमधील बाजारपेठांमध्ये सेवा देण्यास सक्षम, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उद्योग आणि तंत्रज्ञान निर्माण करण्यास मदत होऊ शकते.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303557)
अभ्यागत कक्ष : 14