संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वदेशी निर्मितीला चालना देण्यासाठी डीआरडीओद्वारे विकसित क्षेपणास्त्र प्रणालीचे तंत्रज्ञान भारतीय संरक्षण उद्योगाला हस्तांतरित करण्यास संरक्षण मंत्र्यांची मंजुरी

Posted On: 25 AUG 2026 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून डीआरडीओद्वारे विकसित सर्व पारंपरिक क्षेपणास्त्र प्रणालींचे तंत्रज्ञान, देशांतर्गत निर्मितीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाला हस्तांतरित करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण, संरक्षण परिसंस्थेमध्ये देशांतर्गत उद्योगांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हे उद्योग विहित पात्रता, प्रमाणन आणि नियामक आवश्यकतांनुसार स्वदेशी उत्पादन घेण्यास सक्षम होतील.

या निर्णयामुळे क्षेपणास्त्र प्रणाली विकास ते औद्यीगिक उत्पादन हे संक्रमण यशस्वीरीत्या शक्य होईल. यातून प्रगत संरक्षण प्रणालीच्या विकास आणि निर्मितीसाठी भारतीय उद्योगांच्या क्षमतेचा लाभ घेण्याचे डीआरडीओचे अथक प्रयत्न प्रतिबिंबित होतात. या निर्णयाचा हेतू, देशांतर्गत निर्मिती क्षमता वाढवणे, संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक पाया बळकट करणे आणि पुरवठा साखळीमध्ये भारतीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व इतर तंत्रज्ञान भागीदारांच्या सहभागासाठी संधी निर्माण करणे, हा आहे.

या पुढाकाराचा उद्देश देशाच्या संरक्षण निर्मिती क्षेत्राच्या वाढीला पाठबळ देण्यासोबत, परिचालन क्षमता वाढवणे,आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत मूल्यवर्धन वृद्धिंगत करणे, हा आहे. प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचे हस्तांतरण व आत्मसात करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि देशाची स्वदेशी संरक्षण क्षमता अधिक बळकट करण्यासाठी भारतीय उद्योगांशी निकट सहकार्य करण्यास डीआरडीओ वचनबद्ध आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303383) अभ्यागत कक्ष : 14