विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सीएसआयआर- राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांनी स्वदेशी मायक्रो अँड स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनांचे केले अनावरण, देशाच्या मानवविरहित संरक्षण क्षमतांमध्ये वाढ
Posted On:
25 AUG 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2026
प्रगत अंतराळ प्रणोदन क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सीएसआयआर-एनएएल अर्थात राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांनी आज नवी दिल्ली येथे स्वदेशी बनावटीच्या तीन मायक्रो अँड स्मॉल गॅस टर्बाइन इंजिनांचे अनावरण केले. सीएसआयआर मुख्यालयातील एसएसबी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात 5 किलो थ्रस्टचे NJ-05, 50 किलो थ्रस्टचे NJ-50 आणि 100 किलो थ्रस्टचे NJ-100 या इंजिनांचे अनावरण झाले. स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित केलेल्या या कॉम्पॅक्ट प्रणोदन प्रणालींचा उपयोग सामरिक मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही), ड्रोन इंटरसेप्टर्स आणि कॉम्पॅक्ट क्षेपणास्त्र प्रणाली यांसारख्या उपयोजनांसाठी संकल्पित आहे.
या कार्यक्रमात भारतीय संरक्षण आणि विज्ञान समुदायातील वरिष्ठ नेतृत्व एकत्र आले होते. चेअरमन चीफ्स ऑफ स्टाफ कमिटी यांचे चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ एअर मार्शल तेजिदर सिंग ( PVSM, AVSM, VM) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सीएसआयआर-एनएएलचे संचालक डॉ. अभय पशिलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी, देशात विस्तारणाऱ्या ड्रोन परिसंस्थेसाठी बहुस्तरीय इंटिग्रेटर किंवा समाकलक म्हणून एनएएलच्या वाढत्या भूमिकेकडे लक्ष वेधले. भारतीय संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, वेगाने विस्तारणाऱ्या अंतराळ क्षेत्रातील स्टार्ट-अप परिसंस्थेसह संपूर्ण भारतीय उद्योगांमध्ये या प्रगत इंजिनांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याची क्षमता आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
आर. प्रतापनायक यांच्या नेतृत्वाखालील सीएसआयआर-एनएएलच्या वैज्ञानिक पथकाने गॅस टर्बाइन इंजिनच्या विकासाबाबत सविस्तर तांत्रिक सादरीकरण केले. या सादरीकरणात उच्च-RPM टर्बोमशिनरी आणि उच्च-तापमान ज्वलन तंत्रज्ञानातील प्रगतीवर प्रकाश टाकण्यात आला; ज्यांच्यामुळे या स्वदेशी प्रणोदन प्रणालींचा विकास करणे शक्य झाले आहे.
वैज्ञानिक आणि औद्यीगिक संशोधन विभागाच्या सचिव आणि सीएसआयआरच्या महासंचालक डॉ. एन कलईसेल्वी यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपल्या भाषणात प्रकल्प चमूच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. अंतराळ अभियांत्रिकीमध्ये आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना स्वदेशी बनावटीच्या अशा अत्यंत विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण उप-प्रणालींचा विकास अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रणोदन प्रणालींचे अनावरण करताना एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी देशातच प्रगत गॅस टर्बाइन इंजिन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या सामरिक महत्त्वावर भर दिला. अशा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांमधील स्वदेशी क्षमतांमुळे राष्ट्रीय सुरक्षा बळकट होईल आणि सशस्त्र दलांची तांत्रिक आत्मनिर्भरता वृद्धिंगत होईल, असे त्यांनी नमूद केले.
NJ-05, NJ-50 आणि NJ-100 विकसित करण्यात मिळालेले यश, हे लघु गॅस टर्बाइन प्रणोदन प्रणालींचे आरेखन, विकास आणि निर्मिती यासाठी स्वदेशी परिसंस्था उभारणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उदयास येत असलेल्या देशांतर्गत निर्मिती क्षमतांसह हे तंत्रज्ञान भारताच्या वाढत्या यूएव्ही, ड्रोन आणि संरक्षण अंतराळ परिसंस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा आहे.

फोटो ओळ - नवी दिल्ली येथील एसएसबी सभागृहात स्वदेशी मायक्रो अँड स्मॉल गॅस टर्बाइन इंजिन्सच्या अनावरण कार्यक्रमात डीएसआयआरच्या सचिव आणि सीएसआयआर महासंचालक डॉ. एन कलईसेल्वी, सीएसआयसी आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल तेजिंदर सिंग (PVSM, VSM, VM) आणि सीएसआयआर-एनएएलचे संचालक डॉ. अभय पशिलकर

* * *
शैलेश पाटील/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2303372)
अभ्यागत कक्ष : 12