आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सध्याच्या ऋतुमानानुसार होणाऱ्या इन्फ्लूएंझाच्या देशभरातील स्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष


घाबरण्याचे कारण नाही: ऋतुमानानुसार होणारा इन्फ्लूएंझा स्वमर्यादित; कोणताही नवीन किंवा असामान्य विषाणूचा प्रकार आढळला नाही - आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल

भारतातील H1N1 मध्ये ऋतुमानानुसार अपेक्षित बदल दिसून आले, मात्र कोणताही असामान्य जनुकीय बदल आढळला नाही

Posted On: 25 AUG 2026 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MoHFW), आरोग्य संशोधन विभाग (DHR), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांच्या समन्वयाने, एका मजबूत अखिल भारतीय देखरेख ठेवणाऱ्या नेटवर्कद्वारे सध्याच्या ऋतुमानानुसार होणाऱ्या इन्फ्लूएंझाच्या देशभरातील स्थितीवर सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सध्याच्या इन्फ्लूएंझाच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून घाबरण्याचे किंवा चिंतेचे कोणतेही कारण नाही, असे आरोग्य संशोधन विभागाचे (DHR) सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले. सध्या देशात पसरलेले इन्फ्लुएंझा विषाणू अलिकडच्या वर्षांत दिसून आलेल्या हंगामी स्वरुपाशी सुसंगत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देशभरातील डीएचआर-आयसीएमआरच्या 73 विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांच्या (व्हीआरडीएल) नेटवर्कद्वारे सुरू असलेल्या जनुकीय आणि साथरोगशास्त्रीय देखरेखीमुळे महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला आहे.

सध्या पसरलेल्या इन्फ्लुएंझा ए (एच1एन1) विषाणू ‘ए/मिसूरी/11/2025 (एच1एन1) पीडीएम094-सदृश’ विषाणू असल्याचे आढळून आले आहे. हेमाग्लुटिनिन (एचए) जनुकीय विश्लेषणानुसार हे आयसोलेट्स क्लेड 6बी.1ए.5ए2ए; सबक्लेड डी.3.1.1 या गटात येतात.

विषाणूंचा हा वंश 2025 पासून भारतात सतत पसरत आहे. त्यामध्ये आढळलेले जनुकीय बदल हे हंगामी इन्फ्लुएंझा विषाणूंमध्ये नेहमी दिसणाऱ्या सामान्य अँटीजेनिक ड्रिफ्टशी सुसंगत आहेत, अशी माहिती डॉ. बहल यांनी माहिती दिली. इन्फ्लुएंझा विषाणू पसरत असताना असे किरकोळ जनुकीय बदल नियमितपणे होत असतात आणि ते स्वतःहून नवीन किंवा धोकादायक स्ट्रेनच्या उदयाचे संकेत देत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या निरीक्षणांवरुन नवीन इन्फ्लूएंझा धोक्याच्या उदयाचे कोणतेही संकेत नाहीत आणि सध्याची परिस्थिती हंगामी इन्फ्लूएंझा विषाणूंच्या अपेक्षित वर्तनाशी सुसंगत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हंगामी इन्फ्लूएंझा, ज्यामध्ये इन्फ्लूएंझा ए (H1N1) चाही समावेश आहे, हा सामान्यतः निरोगी व्यक्तींमध्ये होणारा एक सौम्य आणि स्वतःहून बरा होणारा श्वसनसंस्थेचा आजार आहे. यांची सामान्य लक्षणे – ताप, खोकला, घसादुखी किंवा घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि अशक्तपणा.

बहुतेक लोकांमध्ये लक्षणांनुसार सहाय्यक उपचार आणि पुरेशी विश्रांती तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण राखल्याने लक्षणांमध्ये सुधारणा होते. एखाद्या व्यक्तीला H1N1 ची लागण झाली याचा अर्थ त्या व्यक्तीला गंभीर आजार होईल किंवा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासेल, असा नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. ऋतुमानानुसार होणारा इन्फ्लूएंझा सामान्यतः सौम्य असला तरी, काही विशिष्ट व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याचा धोका जास्त असतो. यामध्ये - वृद्ध व्यक्ती, लहान मुले, आधीपासूनच वैद्यकीय समस्या किंवा सह-व्याधी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींचा समावेश होतो. अशा व्यक्तींनी इन्फ्लूएंझासारखी लक्षणे दिसू लागली तर त्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. बहल यांनी केले. त्यांनी नागरिकांना श्वसन आरोग्य राखण्यासाठी आणि संसर्ग प्रतिबंधासाठी करावयाच्या उपायांबाबतही मार्गदर्शन केले.

काय करावे : 

  • खोकताना किंवा शिंकताना नाकतोंड झाकावे. 
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवावे किंवा योग्य हॅन्ड सॅनिटाइझरचा वापर करावा. 
  • प्रकृती बरी नसल्यास घरी विश्रांती घ्यावी आणि इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. 
  • पुरेसे पाणी प्यावे आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. 
  • सकस आणि संतुलित आहार घ्या.
  • लक्षणे गंभीर असल्यास, बराच काळ राहिल्यास किंवा प्रकृती बिघडत चालल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
  • तपासणी आणि उपचारासंदर्भात वैद्यकीय सल्ल्याचे पालन करा.

काय करू नये : 

  • एच1एन1 चे निदान झाल्यास घाबरून जाऊ नका.
  • वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँटीव्हायरल किंवा अँटीबायोटिक्स घेऊ नका.
  • लक्षणे असताना इतरांच्या जवळ जाणे टाळा.
  • न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आरोग्य संशोधन विभाग, आयसीएमआर आणि एनसीडीसी इन्फ्लूएंझाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सातत्याने महामारीविषयक, विषाणूविषयक आणि जीनोमिकसंबधी देखरेख ठेवत आहेत. व्हीआरडीएल अर्थात विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांच्या व्यापक जाळ्यामुळे श्वसनविकारांशी संबंधित पसरणाऱ्या विषाणूंचा वेळेवर शोध घेणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे शक्य होते.  तसेच कोणत्याही नवीन कलांचा  योग्य प्रकारे सामना करण्यास सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना मदत मिळते.

संनियंत्रण यंत्रणा इन्फ्लूएंझाच्या सक्रियतेतील बदल, पसरणारे स्ट्रेन्स  आणि आजाराची तीव्रता यांवर बारकाईने लक्ष ठेवणे सुरूच ठेवेल. मात्र  सध्या उपलब्ध असलेले पुरावे एच 1 एन 1 इन्फ्लूएंझाच्या गतिविधीत  कोणताही असामान्य बदल किंवा एखाद्या नव्या स्ट्रेनच्या उदयाचे संकेत देत नाहीत. 

नागरिकांनी सजग आणि सतर्क राहावे, मात्र घाबरून जाऊ नये, असा सल्ला दिला जात आहे. मोसमी इन्फ्लुएंझा  एक सामान्य आणि नियमितपणे देखरेखीखालील श्वसनसंबंधी संसर्ग आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला आणि अनावश्यक औषधांचा वापर टाळणे, यांमुळे व्यक्ती व समुदायांचे  संक्रमणापासून .संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. 

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/सोनाली काकडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303355) अभ्यागत कक्ष : 12