संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल 'निपुण' या दुसऱ्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाला सेवेत करणार दाखल

Posted On: 25 AUG 2026 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2026

 

भारतीय नौदलाच्या निस्तार-श्रेणीतील दुसरे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (डीएसव्ही) 'निपुण’ हे जहाज 31 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. या विशेष जहाजाच्या समावेशामुळे नौदलाच्या खोल समुद्रातील डायव्हिंग तसेच पाण्याखालील साहाय्यक क्षमतांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर पडेल आणि जहाजाच्या बांधणीपासून ते जहाज कार्यान्वित सेवेपर्यंतच्या प्रवासाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल.

विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने स्वदेशी पद्धतीने 'निपुण' या जहाजाची रचना आणि बांधणी केली आहे. संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणीमध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. सुसज्जता आणि चाचण्यांचा एक व्यापक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, हे जहाज 30 जुलै 2026 रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2292117&reg=22&lang=13

'निपुण' हे विविध प्रकारच्या डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमांना सहाय्य करण्यासाठी खास तयार करण्यात आलेले जहाज आहे. हे जहाज आधुनिक डायव्हिंग प्रणाली आणि पाण्याखालील कामगिरी क्षमतेने सुसज्ज आहे, यामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या डायव्हर्सना सातत्यपूर्ण सहाय्य करणे शक्य होईल. तसेच, पाणबुडी बचाव मोहीमांना सहाय्य करण्याची भारतीय नौदलाची क्षमता देखील वाढेल.

या जहाजात आधुनिक नेव्हिगेशन, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आणि अचूक स्थाननिश्चितीसाठी आधुनिक प्रणालींचा समावेश आहे. तसेच डायव्हिंग, पाण्याखालील कामगिरी आणि वैद्यकीय सहाय्यासाठी विशेष सुविधांनी ते परिपूर्ण आहे. या क्षमतांमुळे 'निपुण' हे पाण्याखालील गुंतागुंतीच्या मोहिमांसाठी एक एकात्मिक व्यासपीठ म्हणून कार्य करू शकते.

'निपुण'च्या आगामी सेवा प्रवेशामुळे भारताच्या सागरी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विशेष डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमा हाती घेण्याची भारतीय नौदलाची क्षमता आणखी मजबूत होईल. या स्वदेशी बनावटीच्या जहाजाचा नौदलात समावेश हा नौदलाच्या कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि विशेष जहाजे पुरवण्याची देशाच्या जहाजबांधणी परिसंस्थेची वाढती क्षमता अधोरेखित करणारा आहे.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2303285) अभ्यागत कक्ष : 20