वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-कंबोडिया व्यापार आणि गुंतवणूक संयुक्त कार्यगटाची तिसरी बैठक कंबोडियातील नोम पेन्ह इथे संपन्न
भारत-कंबोडिया द्विपक्षीय व्यापारात 2025-26 मध्ये 36टक्क्यांहून अधिक वाढ; व्यापार पोहोचला 406.78 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर
प्रविष्टि तिथि:
24 AUG 2026 5:13PM by PIB Mumbai
जेडब्ल्यूजीटीआय म्हणजेच भारत-कंबोडिया व्यापार आणि गुंतवणूक संयुक्त कार्यगटाची तिसरी बैठक 24 ऑगस्ट, 2026 (आज) रोजी कंबोडियातील नोम पेन्ह इथे पार पडली. या बैठकीचे सह-अध्यक्षपद भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वाणिज्य विभागातील सहसचिव अमित वर्मा आणि कंबोडियाच्या वाणिज्य मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय व्यापार महासंचालक लाँग केमविचेत यांनी भूषवले.
यावेळी उभय बाजूंनी द्विपक्षीय व्यापारातील उत्साहवर्धक गतीची नोंद घेतली. गेल्या आर्थिक वर्षातील 299 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत 2025-26 मध्ये हा व्यापार 36% हून अधिक वाढून 406.78 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. तसेच एप्रिल-जून 2026 या तिमाहीत वर्ष-दर-वर्ष आधारावर 63.25% वाढ नोंदवण्यात आली आहे. कंबोडिया हा सध्या 'आसियान' गटातील भारताचा आठवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि या गटासोबतच्या भारताच्या एकूण व्यापारात कंबोडियाचा वाटा ०.31% आहे. त्यामुळे व्यापारात वाढीची मोठी संधी असल्याचे दिसून येते.
या बैठकीमध्ये व्यापारात विविधता आणण्यात यावी तसेच व्यापार अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये पारंपरिक औषधोपचार पद्धती, ई-गव्हर्नन्स मॉड्यूल्स, भारतीय 'फार्माकोपिया'ला (औषध मानके) मान्यता, व्यापार आकडेवारीचा मेळ घालणे आणि प्रमुख व्यापार प्रदर्शने आणि व्यावसायिक शिष्टमंडळांबाबत माहितीची देवाणघेवाण यांसारख्या क्षेत्रांमधील सहकार्य आणि भागीदारीचा समावेश होता.
बैठकीत 2 जून 2026 रोजी नोम पेन्ह येथे ‘केएचक्यूआर’-सक्षम व्यापाऱ्यांकडे यूपीआय स्वीकारण्याच्या सुविधेच्या यशस्वी प्रारंभाचे स्वागत करण्यात आले. तसेच, कंबोडियन ‘पेमेंट ॲप्लिकेशन्स’द्वारे भारतात यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करण्याच्या पुढील टप्प्यावरही चर्चा झाली. यामुळे कंबोडियन प्रवाशांना भारतातील यूपीआय-सक्षम टर्मिनल्सचा सहजपणे वापर करणे शक्य होईल.
याव्यतिरिक्त, सीमाशुल्क सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली, त्याचे स्वागत करण्यात आले. याबाबत लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याबाबत चर्चा झाली. यामुळे सीमाशुल्क प्रक्रियेत एकसमानता येईल.
दोन्ही बाजूंनी कृषी क्षेत्रातील सहकार्य आणि बाजारपेठ उपलब्धतेचे मुद्दे, तसेच रंगद्रव्ये आणि रंगद्रव्य पावडर यांच्या व्यापाराचा विस्तार आणि बँकिंग आणि विमा क्षेत्रातील सहकार्य यांवरही चर्चा केली. दोन्ही बाजूंनी भारत आणि कंबोडिया यांच्यातील द्विपक्षीय गुंतवणूक कराराच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले आणि त्यावर लवकरात लवकर स्वाक्षरी करण्याबाबत सहमती दर्शवली.
‘भारत-कंबोडिया संयुक्त कार्यगट - व्यापार आणि गुंतवणूक’ ला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाल्यानंतरची ही तिसरी बैठक होती. या बैठकीतून भारत-कंबोडिया व्यापार आणि आर्थिक भागीदारीची खोली व त्यातील वाढती क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. जेडब्ल्यूजीटीआयची पुढील बैठक 2027 मध्ये भारतात होणार आहे.
तिसऱ्या भारत-कंबोडिया जेडब्ल्यूजीटीआय बैठकीच्या निमित्ताने, अमित वर्मा यांनी कंबोडियाचे 'अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट' टिथ रिथिपोल यांच्याशी फलदायी चर्चा केली. या चर्चेत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक बळकट करणे, औषधनिर्माण क्षेत्रातील सहकार्य आणि यूपीआय- केएचक्सूआर डिजिटल पेमेंट प्रणालीची यशस्वी जोडणी या मुद्द्यांचा समावेश होता. दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ करण्याबाबतची आपली सामायिक कटिबद्धता दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा व्यक्त केली
याप्रसंगी अमित वर्मा यांनी 'इंडियन बिझनेस चेंबर इन कंबोडिया' (आयबीसीसी) च्या सदस्यांचीही भेट घेतली. द्विपक्षीय व्यापार कराराबाबतच्या चर्चेला गती देणे, कंबोडियामध्ये भारतीय गुंतवणुकीला चालना देणे आणि शिक्षण, आरोग्यसेवा, माहिती तंत्रज्ञान , कृषी आणि पर्यटन यांसारख्या 5-7 प्राधान्य क्षेत्रांची ओळख पटवणे यांवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.
याचबरोबर, भारतात 'इन्व्हेस्ट इन कंबोडिया' ‘रोडशो’ आयोजित करणे, आसियान बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळवू पाहणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी कंबोडियाला उत्पादन केंद्र म्हणून विकसित करणे आणि खाजगी क्षेत्राचा अभिप्राय ‘जेडब्ल्यूजीटीआय’पर्यंत पोहोचवण्यासाठी आयबीसीसी/ फिक्कीI/जेबीसी यांच्यासाठी एक यंत्रणा उभारणे, यासंदर्भातही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

***
राधिका अघोर/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302869)
आगंतुक पटल : 14