युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
विशाखापट्टणम इथल्या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांच्या क्रीडामंत्र्यांनी स्वीकारले संयुक्त घोषणापत्र
केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातील सहकार्यासाठी प्रत्यक्ष व्यासपीठ निर्माण करणाऱ्या ब्रिक्स क्रीडा भागीदारी करण्याचे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
23 AUG 2026 4:22PM by PIB Mumbai
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्र सर्वसंमतीने स्वीकारून ब्रिक्स सदस्य देशांच्या क्रीडा मंत्र्यांची बैठक 2026 संपन्न झाली. या माध्यमातून संवाद, परस्पर आदर आणि सर्वसमावेशकता यांद्वारे क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत सदस्य देशांनी आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.
भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत, ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री आणि वरिष्ठ क्रीडा प्रतिनिधी एकत्र आले होते; त्यांनी सहकार्याचे प्राधान्यक्रम आणि क्रीडा क्षेत्रातील विकासाबाबत चर्चा केली.

आपल्या प्रास्ताविक भाषणात, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सदस्य देशांच्या सामायिक दृष्टिकोनाला प्रत्यक्ष क्रीडा सहकार्यामध्ये रूपांतरित करणाऱ्या ब्रिक्स क्रीडा भागीदारीची उभारणी करण्याचे आवाहन केले.
आपण अशा प्रकारची ब्रिक्स क्रीडा भागीदारी निर्माण केली पाहिजे जी केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता क्रीडा सहकार्यासाठी प्रत्यक्ष व्यासपीठ तयार करेल; मग ते खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण असो, संयुक्त स्पर्धा असोत किंवा क्रीडा विज्ञानातील ज्ञानाची देवाणघेवाण असो, असे मांडवीय यावेळी म्हणाले.

राष्ट्रनिर्मितीमध्ये खेळांच्या भूमिकेवर भर देताना डॉ. मांडविया म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आपली क्रीडा परिसंस्था बदलत आहे आणि मैदानापासून ते विजयाच्या मंचापर्यंत विविध संधी निर्माण करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
मांडवीय यांनी क्रीडा साहित्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न विशद केले. ते म्हणाले की, क्रीडा साहित्य उत्पादन क्लस्टर्सच्या प्रोत्साहनासाठी लवकरच सुरू होणारी योजना गुंतवणुकीला चालना देईल आणि जागतिक बाजारपेठांसाठी देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देईल. जागतिक उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या आणि गुंतवणूकदारांना मेक इन इंडिया , प्ले इन इंडिया आणि ग्रो विथ इंडिया यांनी यासाठी भारतात येण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. मांडविया यांनी दिव्यांगांसाठीच्या खेळांना प्रोत्साहन उपक्रम आणि खेळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देण्याद्वारे क्रीडा क्षेत्र अधिक सर्वसमावेशक बनवण्याच्या भारताच्या कटिबद्धतेवरही भर दिला.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत तीन प्रमुख उपक्रम
भारताच्या अध्यक्षतेदरम्यान क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी तीन प्राधान्य उपक्रमांना चालना देण्यात आली आहे:
ब्रिक्स क्रीडा तंत्रज्ञान कार्यगट:
हा कार्यगट क्रीडा विज्ञान, खेळाडूंची कामगिरी, प्रशासन, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल रूपांतरण आणि नवोन्मेष या क्षेत्रांमध्ये ब्रिक्स देशांमधले सहकार्य मजबूत करेल. भारत विविध क्रीडा क्षेत्रांमध्ये तज्ज्ञांचे योगदान देईल.
ब्रिक्स क्रीडा उत्पादन परिषद:
भारताने प्रस्तावित केलेल्या ब्रिक्स क्रीडा उत्पादन परिषदेचे सर्वत्र स्वागत झाले असून तिचे पहिले आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये राजस्थानातल्या उदयपूर इथे करण्याचा प्रस्ताव आहे.
ही परिषद सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गुणवत्ता मानके, ब्रिक्समधले अंतर्गत व्यापार आणि मजबूत पुरवठा साखळी यावर लक्ष केंद्रित करेल. तसेच उत्पादक, निर्यातदार, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान पुरवठादार, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्ट-अप्स आणि संशोधन संस्था यांना एकत्र आणेल.

ब्रिक्स पारंपरिक आणि स्थानिक क्रीडा प्रात्यक्षिक स्पर्धा 2026:
या स्पर्धा 12-13 ऑक्टोबर 2026 रोजी गुजरातमधल्या अहमदाबाद इथे आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. या स्पर्धांमुळे ब्रिक्स देशांना त्यांच्या विविध पारंपरिक आणि स्थानिक क्रीडा वारशाचे प्रदर्शन आणि संवर्धन करण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल.
याचे स्वरूप केवळ स्पर्धात्मक नसून सांस्कृतिकदृष्ट्या केंद्रित उपक्रम म्हणून राबवली जाईल. यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण, लोकांमधले परस्पर संबंध आणि परस्पर समज वाढेल.
या स्पर्धांमुळे जिथे शक्य आणि योग्य असेल तिथे सहभागी देशांतील खेळाडू आणि तज्ज्ञांचा ऐच्छिक सहभागालाही प्रोत्साहन मिळेल. प्रत्येक खेळाशी संबंधित सांस्कृतिक महत्त्व, परंपरा आणि पारंपरिक ज्ञान प्रणाली लक्षात घेऊन सामायिक सांस्कृतिक संवेदनशीलता नियम आणि परस्पर आदराच्या चौकटीत हा सहभाग असेल.
ब्रिक्स मैत्री सायकलिंग उपक्रम
औपचारिक कार्यक्रमांपूर्वी सहभागी मंत्री आणि मान्यवरांनी विशाखापट्टणम इथे आयोजित करण्यात आलेल्या 87व्या फिट इंडिया “संडेज ऑन सायकल” उपक्रमाचा भाग म्हणून ब्रिक्स मैत्री सायकलिंग कार्यक्रमात सहभाग घेतला.

हा कार्यक्रम डॉ. मनसुख मांडवीय आणि युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, यूएई, इराण आणि दक्षिण आफ्रिका इथल्या मंत्र्यांनी भाग घेतला.

***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302528)
आगंतुक पटल : 19