पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
भारताने मंगोलियातील उलानबाटर येथे आयोजित UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्थांवरील पहिली मार्गदर्शिका प्रकाशित केली
वनांसोबतच खुल्या नैसर्गिक परिसंस्थांच्या विज्ञानाधिष्ठित संवर्धनाच्या गरजेवर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी दिला भर
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2026 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2026
मंगोलियातील उलानबातार इथे, 17 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित 'वाळवंटीकरण रोखण्याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या करारा'च्या (UNCCD) 'कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज'च्या (COP17) 17 व्या सत्रात, भारताने 'भारतातील गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्थांवरील आजवरची पहिली मार्गदर्शक पुस्तिका' प्रकाशित केली. भारतातील गवताळ प्रदेश, सवाना, वाळवंट आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्थांची समृद्ध विविधता, पर्यावरणीय महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक महत्त्व या पुस्तिकेत अधोरेखित करण्यात आले आहे. या परिसंस्थांचे जतन, पुनरुज्जीवन आणि शाश्वत व्यवस्थापन बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांचा एक विशेष व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. गवताळ प्रदेश, झुडपी वने आणि दऱ्याखोऱ्यांचे बऱ्याच काळापासून केवळ 'वृक्षांचा अभाव' या दृष्टीकोनातून चुकीचे मूल्यमापन केले गेले; वास्तविक, या परिसंस्था पृथ्वीवर अन्यत्र कुठेही आढळून न येणाऱ्या अशा अनेक प्रजातींचे आश्रयस्थान आहेत तसेच पशुपालन करणाऱ्या जमातींचे या परिसंस्था भरण-पोषण करतात अशी माहिती यादव यांनी यावेळी दिली.

यादव म्हणाले की, ज्याला ‘पडीक जमीन’ असे म्हंटले जायचे अशी कुरणं आणि वाळवंटी भूमी असलेल्या राजस्थानमधील अजमेर येथे ते लहानाचे मोठे झाले, त्यामुळे या मार्गदर्शक पुस्तिकेबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा आहे.
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या देखरेख आणि मार्गदर्शनाखाली, UNCCD COP17 च्या एका अधिकृत कार्यक्रमात या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या पुस्तिकेच्या प्रकाशनामुळे भूमी पुनरुद्धार आणि शाश्वत भूमी व्यवस्थापनासाठी विज्ञान-आधारित आणि भूदृश्य-आधारित दृष्टिकोनाप्रती भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. गवताळ प्रदेश, पर्वतप्रदेश आणि इतर खुल्या नैसर्गिक परिसंस्थांना, जमिनीचा ऱ्हास, जैवविविधता संवर्धन, हवामानातील लवचिकता आणि शाश्वत उपजीविका या विषयांवर चर्चेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज यातून स्पष्ट झाली.
ही मार्गदर्शिका भारतातील गवताळ प्रदेश आणि इतर खुल्या परिसंस्थांच्या संवर्धन, पुनर्स्थापना आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या धोरणकर्ते, संशोधक, संवर्धन अभ्यासक, विकास संस्था आणि समुदायांसाठी एक मौल्यवान साधन ठरेल अशी अपेक्षा आहे. COP17 मध्ये करण्यात आलेल्या या मार्गदर्शिकेच्या प्रकाशनामुळे भारताला आपल्या विविध खुल्या परिसंस्थांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि भूमी पुनर्स्थापना, कुरणे आणि जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण आणि गुणवत्ता स्थिर राहण्यावरील यांवरील जागतिक चर्चेत त्यांचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठही उपलब्ध झाले आहे.
* * *
सुषमा काणे/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300655)
आगंतुक पटल : 11