उपराष्ट्रपती कार्यालय
चेन्नईतील एसआरएम विद्यान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22 व्या पदवीप्रदान समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानासारखे धोरणात्मक तंत्रज्ञान भविष्याला आकार देईल - उपराष्ट्रपती
स्वतःला केवळ भविष्यासाठी तयार करू नका, तर भविष्याला आकार देण्यासाठी स्वतःला सज्ज करा – उपराष्ट्रपतींचे विद्यार्थ्यांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2026 6:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2026
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नईजवळील चेंगलपट्टू मधील कट्टंकुलथूर इथे एस.आर.एम. विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 22 व्या पदवीप्रदान समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्र प्रथम या तत्त्वापासून प्रेरणा घ्यावी आणि आपले ज्ञान, कौशल्य आणि नवोन्मेषाचा वापर राष्ट्रउभारणीसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पदवीप्रदान समारंभ हा केवळ पदव्या देण्यापुरता मर्यादित नसतो, या दिवशी अनेक वर्षांची चिकाटी, शिस्त आणि शिक्षणाचा उत्सव साजरा होत असतो, तसेच उत्तरदायित्व आणि सेवेच्या प्रवासाची सुरुवात या निमीत्ताने होते असे उपराष्ट्रपती म्हणाले.

जर संशोधनातून योग्य परिणाम साधला गेला तर, त्यातून समाजात अर्थपूर्ण प्रभाव पडतो, त्याचे रुपांतर लोकांना व्यावहार्य लाभ मिळतात, असे संशोधन कौतुकास पात्र असते असेही उपराष्ट्रपती म्हणाले.
आंतरविद्याशाखीय शिक्षण, सर्जनशीलता, उद्योजकता आणि चिकित्सक विचारसरणीला चालना देणारी शैक्षणिक व्यवस्था निर्माण केल्याबद्दल सी. पी. राधाकृष्णन यांनी एसआरएमआयएसटी चे कौतुक केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर संशोधन, रोबोटिक्स, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत विकास या क्षेत्रांवर संस्थेचा वाढता भर असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, ही क्षेत्रे भविष्यातील अर्थव्यवस्था आणि समाजाला आकार देतील.
संशोधनाचे रूपांतर अशा व्यावहारिक उपायांमध्ये करण्यावर एसआरएमआयएसटी देत असलेल्या भरचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले, ज्यामुळे लोकांचे जीवनमान सुधारते, उद्योग क्षेत्र बळकट होते आणि शाश्वत विकासाला हातभार लागतो. जेव्हा संशोधन समाजाच्या हितासाठी कार्य करते, तेव्हाच ते आपले सर्वोच्च उद्दिष्ट साध्य करते, असे ते म्हणाले.

2014 पासून देशात उच्च शिक्षणाचा झालेला विस्तार उपराष्ट्रपतींनी आपल्या संबोधनातून अधोरेखित केला. या विस्ताराअंतर्गत देशात 16 भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITs), 8 केंद्रीय विद्यापीठे, 8 भारतीय व्यवस्थापन संस्था (IIMs), 7 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs), 2 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISERs), 1 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) आणि 12 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) स्थापना झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. आज देशभरात 1,425 पेक्षा जास्त विद्यापीठे, 54,000 महाविद्यालये आणि 16,850 स्वायत्त संस्था आहेत, असे त्यांनी नमूद केले.
उच्च शिक्षणामध्ये महिलांच्या नोंदणीत झालेली लक्षणीय वाढही सी. पी. राधाकृष्णन यांनी अधोरेखित केली. 2014 -15 मध्ये महिलांची नोंदणी 1.57 कोटी होती, त्यात एकंदर 42.2 टक्के इतकी वाढ झाली आणि 2023-24 मध्ये ही संख्या 2.24 कोटींपर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीप्रदान समारंभांमध्ये पदव्या आणि पदके मिळवणाऱ्या महिलांची वाढती संख्या ही अत्यंत स्वागतार्ह बाब असल्याचे ते म्हणाले.

देशातली जनता आणि विशेषतः युवा वर्ग ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. स्वतःला केवळ भविष्यासाठी तयार करू नका, तर भविष्याला आकार देण्यासाठी स्वतःला सज्ज करा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यासोबतच विद्यार्थ्यांनी नशा आणि सर्व प्रकारच्या व्यसनाधीनतेपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. भरकटण्याऐवजी शिस्त, प्रलोभनापेक्षा उद्देश आणि सोप्या मार्गांपेक्षा उत्कृष्टतेची निवड करण्याचे आवाहनही त्यांनी युवा वर्गाला केले.

* * *
राधिका अघोर/राजेश शिरभाते/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2300203)
आगंतुक पटल : 7