पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यातल्या आपल्या भाषणातले काही क्षण पंतप्रधानांनी केले सामायिक

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 4:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने केलेल्या आपल्या भाषणातले काही क्षण सामायिक केले. 2047 सालापर्यंत भारताला विकसित भारत बनविण्याच्या दिशेने देशाचा प्रवास, अभूतपूर्व प्रगती, जागतिक संकटांच्या काळात भारताने दाखविलेली लवचिकता आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच विकासाची प्रमुख क्षेत्रे, युवकांचे सक्षमीकरण, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या सामूहिक संकल्पावर त्यांनी भर दिला. देशाच्या बहुआयामी विकासावर भर देताना, ‘सप्तधारा’ या प्रभावी चौकटीच्या माध्यमातून देशाला नवी गती मिळणार असून भारत अधिक उंची गाठणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘एक्स’वर केलेल्या पोस्टच्या मालिकेत पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“लाल किल्ल्यावरचा अविस्मरणीय स्वातंत्र्यदिन! ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची आठवण हा दिवस करून देतो. त्याच वेळी, विकसित भारताच्या उभारणीसाठी आपली बांधिलकी नव्याने दृढ करण्याचा हा दिवस आहे. तिरंगा आपल्याला प्रत्येक आव्हानावर मात करण्यासाठी प्रेरणा देत राहो, एकतेचे बंध अधिक दृढ करो आणि राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देत राहो.”

“स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यादरम्यान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून केलेल्या भाषणातले आणखी काही क्षण.”

 “आपले ध्येय निश्चित आहे… 2047 पर्यंत विकसित भारत बनणे. गेल्या 12 वर्षांत भारताच्या प्रगतीचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व राहिली आहे. आज भारत नव्या आत्मविश्वासाने आणि दृढनिश्चयाने प्रगती करत आहे. भारताची ही प्रगतीची गती जगही अनुभवत आहे.”

 “विकसित भारत हा आत्मनिर्भर भारतही असला पाहिजे. दीर्घकालीन सामर्थ्य आपल्या स्वतःच्या क्षमता विकसित करण्यातून निर्माण होते. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ यामागे हाच दृढ विश्वास आहे. या परिवर्तनाचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. भारत संपूर्ण अर्धसंवाहक उत्पादन परिसंस्था विकसित करत आहे. अर्धसंवाहक प्रकल्प सुरू झाले आहेत, चिप्सची निर्यात सुरू झाली आहे आणि येत्या काही वर्षांत आणखी अनेक प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. तसेच, महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील आपल्या क्षमताही आपण अधिक मजबूत करत आहोत.”

'जाऊ नका'पासून 'पुढे जा' पर्यंत 

 “शस्त्रधारी नक्षलवादी तर गेले, मात्र वैचारिक नक्षलवादी समाजाला चुकीच्या मार्गावर ओढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या वापरत आहेत. त्यांना ओळखून समाजापासून अलग करण्यासोबतच देशाच्या युवा पिढीला विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडावे लागेल.”

 “गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर शिकवणी वर्गांचा आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्ही युवकांसाठी विविध परीक्षांची मोफत ऑनलाइन तयारी करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या दिशेने आम्ही एक मजबूत व्यवस्था देखील उभारणार आहोत.”

“2036च्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर देशातील गावांपासून शहरांपर्यंत प्रतिभाशोधाची एक मोठी मोहीम राबवली जाणार आहे. या अंतर्गत 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या क्रीडा प्रतिभेला विशेष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकसित केले जाणार आहे.”

“भारताची खरी ताकद संकटाच्या काळात तपासली गेली आहे. कोविड-19 साथरोगापासून ते युक्रेन आणि पश्चिम आशियातील परिस्थितीपर्यंत भारताबाबत अनेक प्रकारच्या भीती आणि शंका व्यक्त करण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या दशकभरात भारताने उभारलेल्या क्षमतांमुळे या सर्व शंका चुकीच्या ठरवण्यात आपण यशस्वी झालो. कोणत्याही प्रकारच्या दबावाचा संपूर्ण परिणाम गरीब कुटुंबे आणि शेतकऱ्यांवर होऊ नये, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केले आहेत. अनिश्चिततेने भरलेल्या जगाचा सामना करण्याची आपली क्षमता आपल्या पूर्वतयारीमुळे अधिक मजबूत झाली आहे.”

“आज भारताकडे स्थिर राजकीय जनादेश, स्थिर सरकार, सशक्त लोकशाही, मजबूत न्यायव्यवस्था आणि आपल्या सर्वांना दिशा देणारे संविधान आहे. याच कारणामुळे आज जगभरात भारताचा सन्मान वेगाने वाढत आहे.”

“देशाला शक्तीच्या या सप्तधारांमधून नवी गती आणि नवी उंची मिळणार आहे :

1. उत्पादन क्षमता

2. कृषी आणि अन्नप्रक्रिया

3. तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

4. गतिशक्ती

5. संरक्षण क्षमता

6. हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था

7. सांस्कृतिक शक्ती

“देशाच्या मातृशक्तीला नमन करत, सर्व राजकीय पक्षांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की, महिलांसाठीचे आरक्षण लवकरात लवकर लागू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.”

“देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेच्या संदर्भात सर्व देशवासीयांना, विशेषतः माझ्या युवा सहकाऱ्यांना, माझे हे नम्र आवाहन आहे…”

“काळ आपला आहे, संधी आपली आहे, संकल्प आपला आहे… चला, एकत्र येऊन विकसित भारत घडवूया.”

***

माधुरी पांगे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2300081) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Assamese , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu