गृह मंत्रालय
80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्वदेशी, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेचा दृढनिश्चय; देशाला सर्व क्षेत्रात पुढे नेण्यासाठी हे भाषण मार्गदर्शक ठरेल: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 2:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणातून स्वदेशी, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेचा दृढनिश्चय व्यक्त झाल्याचे सांगत, हे भाषण, देशाला सर्व क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी प्रतिक्रिया, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी दिली आहे.
एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे, "80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताच्या उभारणीसाठीचा एक सर्वसमावेशक, विस्तृत आराखडाच सादर केला. यात, नशामुक्त भारत, सुरक्षित भारत आणि राष्ट्र प्रथम या संकल्पनांच्या भावनेने प्रेरित ‘विकसित भारताची कल्पना मांडली.
सेमीकंडक्टर, महत्वाची खनिजे, ऊर्जा आणि रेल्वे वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये गेल्या 12 वर्षांत झालेल्या अभूतपूर्व प्रगतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि सर्वच क्षेत्रांत आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सामर्थ्याच्या सात स्तंभांचा अर्थात ‘सप्तधारा’चा मंत्र मांडला,” असेही त्यांनी म्हटले आहे.
युवकांच्या क्षमतांना नवे पंख देण्यासाठी, पंतप्रधानांनी, एका वर्षात एक कोटींपेक्षा अधिक युवकांना, एआय कौशल्य प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाची घोषणा केली. त्याशिवाय ऑनलाईन मोफत कोचिंग आणि 2036 ऑलिंपिकसाठी खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने, टॅलेंट हंट मोहीम सुरू करण्याचीही घोषणा केली.
त्याशिवाय त्यांनी 2047 सालापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता साध्य करणे आणि आठ नवीन सेमीकंडक्टर युनिट्स उभारणे यांसारखी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टेही देशासमोर ठेवली आहे. स्वदेशी, समृद्धी आणि आत्मनिर्भरतेच्या संकल्पनेने ओतप्रोत भरलेले मोदीजींचे हे भाषण, प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
आणखी एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी म्हटले आहे, “स्वातंत्र्य चळवळीचा जोशपूर्ण घोष असलेले ‘वंदे मातरम्’ स्वातंत्र्यानंतर 80 वर्षांनी आज प्रथमच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून गायले गेले. हा ऐतिहासिक क्षण पाहताना केवळ अंगावर रोमांच उभे राहिले नाहीत, आपले संपूर्ण अस्तित्व आनंदाने भारावून गेले,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
***
माधुरी पांगे/राधिका अघोर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2300036)
आगंतुक पटल : 10