संरक्षण मंत्रालय
‘रक्षा शक्ती’ ही विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्णायक ठरणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताने येत्या काळात अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा जागतिक पुरवठादार बनले पाहिजे : नरेंद्र मोदी
बदलत्या जागतिक परिस्थितीत स्वदेशी संरक्षण सामग्रीच्या निर्मितीला आणि सशस्त्र दलांची क्षमता बळकट करण्याला प्राधान्य द्यावे : पंतप्रधान
‘मिशन सुदर्शन चक्र’च्या अंमलबजावणीचे काम वेगाने सुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी
आधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी नागरी संरक्षण दल उभारणार : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 AUG 2026 3:26PM by PIB Mumbai
‘रक्षा शक्ती’ हा 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या सात शक्तिस्त्रोतांपैकी एक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. 15 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची गरज स्पष्टपणे मांडली. तसेच भारताने पुढील पिढीतील अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाचा जागतिक पुरवठादार म्हणून उदयास यावे, असे आवाहन त्यांनी केले.

“संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याला पर्याय नाही. जगातील देश वाढत्या प्रमाणात स्वतःच्या हिताला प्राधान्य देत असताना भारत केवळ जगाची बाजारपेठ बनून राहू शकत नाही. आपण ड्रोन आणि ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित केल्या पाहिजेत, तसेच हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नेतृत्व प्रस्थापित केले पाहिजे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेची पूर्तता करण्याच्या सरकारच्या दृढ निश्चयाचा पुनरुच्चार करताना नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की भारताने इतर देशांवर अवलंबून राहण्याची मानसिकता आता सोडली पाहिजे. “जगात अनेक गोष्टी स्वस्त दरात आणि अधिक वेगाने उपलब्ध होऊ शकतात. परंतु त्यांच्यावर अवलंबून राहिल्याने आपल्या स्वतःच्या क्षमतांचा विकास होत नाही, तसेच त्या क्षमतांची ताकदही तपासली जात नाही. त्यामुळे आपण आपल्या क्षमता अधिक सक्षम केल्या पाहिजेत आणि आपल्या हितांचे संरक्षणही स्वतःच केले पाहिजे. याच कारणासाठी आपण ‘आत्मनिर्भर भारत’ या दृढ संकल्पासह पुढे वाटचाल करत आहोत. ‘मेक इन इंडिया’, ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ यांसारख्या उपक्रमांशी भारतीय जनतेची मने जोडली जात आहेत,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की सायबर सुरक्षा हे देखील संरक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशाच्या आणि संपूर्ण जगाच्या हितासाठी या क्षेत्रात तरुणांच्या क्षमतांचा प्रभावीपणे उपयोग करून घेता येऊ शकतो.
नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीत देशाच्या संरक्षण दलांना कोणत्याही आव्हानासाठी सज्ज ठेवण्यासाठी स्वदेशी संरक्षण सामग्रीच्या निर्मितीवर भर देण्यासोबतच संरक्षण दलांच्या क्षमतांमध्ये सातत्याने वाढ करण्याची गरज स्पष्ट केली. ते म्हणाले, “आज युद्धाचे स्वरूप बदलत आहे. संघर्ष केवळ देशाच्या सीमांपुरताच मर्यादित राहील, याची आता खात्री देता येत नाही. आधुनिक युद्धात तेलशुद्धीकरण प्रकल्प, बँकिंग क्षेत्र किंवा डेटा सेंटर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. म्हणजेच, पायाभूत सुविधा आणि कारखाने उद्ध्वस्त करण्याच्या स्वरूपातील युद्धाची एक नवी पद्धत उदयास येत आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही ‘मिशन सुदर्शन चक्र’ची घोषणा केली होती आणि त्यावरचे काम वेगाने पुढे जात आहे.”
संरक्षण क्षेत्रात गेल्या 12 वर्षांत झालेल्या परिवर्तनावर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, देशातील संरक्षण उत्पादन जवळपास चौपट झाले आहे. तसेच, संरक्षण साहित्याच्या निर्यातीत जवळपास 50 पटींनी वाढ झाली असून, भारतीय बनावटीची शस्त्रास्त्रे आता सुमारे 100 देशांपर्यंत पोहोचत आहेत, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “आव्हान देशाच्या सीमांच्या आतून असो किंवा सीमेपलीकडून, भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे… जागतिक पटलावर भारताची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता सातत्याने वाढत आहे.”

नरेंद्र मोदी यांनी सुरक्षित आणि सशक्त भारताची उभारणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे अधोरेखित करत, उदयास येणाऱ्या नव्या स्वरूपाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी देशाची सज्जता अधिक भक्कम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “गेल्या शतकातील युद्धांचे स्वरूप लक्षात घेऊन आपल्या देशात विकसित करण्यात आलेल्या नागरी संरक्षण व्यवस्थेची रचना आता कालबाह्य झाली आहे. आगामी काळात आपण नागरी संरक्षणाचे एक सक्षम आणि गतिमान जाळे उभारणार आहोत. त्यांना आधुनिक यंत्रणा आणि कार्यपद्धतींची माहिती करून देणार आहोत. आधुनिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण नागरी संरक्षण स्वयंसेवकांचे एक विशाल दल उभारणार आहोत.”
पंतप्रधानांनी राष्ट्रनिर्माणाच्या प्रक्रियेत, विशेषतः संरक्षण दलांमध्ये ‘नारी शक्ती’ची वाढती भूमिका अधोरेखित केली. “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)मधून प्रशिक्षण घेऊन पदवीधर होणाऱ्या आपल्या मुली आत्मविश्वास आणि अधिकारपूर्ण नेतृत्वक्षमतेच्या बळावर देशाच्या लष्कराचे नेतृत्व करण्याची क्षमता सिद्ध करत आहेत,” असे ते म्हणाले.
***
माधुरी पांगे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2300033)
आगंतुक पटल : 9