पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

80व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन, पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील मुख्य मुद्दे

प्रविष्टि तिथि: 15 AUG 2026 4:44PM by PIB Mumbai

 

80व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट प्रत्यक्षात साकार करण्यासाठी भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी सज्ज बनवणे, उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, ऊर्जा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी, युवा आणि महिलांना सक्षम करण्यासाठी, तसेच, शक्ती च्या सप्तधारांच्या माध्यमातून, देशाच्या विकास यात्रेला नवी गती देण्यासाठीची व्यापक रूपरेखा प्रस्तुत केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:

1.आज आपण सगळे देशाच्या 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक हृदयाचे ठोके वंदे मातरम च्या नादाशी ताल राखत धडकत आहेत. आज प्रत्येक घर तिरंगा आणि प्रत्येक मन तिरंगा आहे आणि देश उत्साह आणि आनंदासह नवे संकल्प घेऊन पुढे जात आहे.

2. देश आज अशा सर्व महान सुपुत्रांचे स्मरण करत आहे, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, सर्वोच्च बलिदान दिले. आपले तप, त्याग आणि बलिदानातून, स्वातंत्र्याचे एकमात्र उद्दिष्ट घेऊन, आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले. पूज्य बापू यांच्यासह, सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, बलिदानाची महान परंपरा देशात जागृत करणाऱ्या सर्व महान क्रांतिकारकांना आज मी श्रद्धापूर्वक वंदन करतो. 

3. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आज लाल किल्ल्यावर वंदेमातरम चे सूर गुंजत आहेत. आज जेव्हा आपण सगळे लोक, वंदे मातरम ला 150 वर्षे झाल्याचा उत्सव साजरा करत आहोत, तर यापेक्षा उत्तम संधी काय असू शकेल?

4. गेल्या काही दिवसात, देशाच्या काही भागात पूरस्थिती राहिली, काही ठिकाणी भूस्खलन झाले, दरडी कोसळल्या त्यांचा अनेक कुटुंबांना फटका बसला. त्यांचे दु:ख आपणे सगळे समजू शकतो, अशा सर्व पीडित कुटुंबांना मी ग्वाही देतो, की आम्ही आणि संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.

5. कुठलेही राष्ट्र महान तेव्हा बनते, जेव्हा ते आपल्या सिद्धी प्राप्त करण्यात यशस्वी ठरते. जेव्हा आपली स्वप्ने, आपले संकल्प आणि आपल्या सामर्थ्याच्या बळावर पुढे जाते.

6. आपले संकल्प देखील उंच असायला हवेत कारण जेव्हा स्वप्ने उंच असतात, त्यावेळी आपल्या सामर्थ्यांची ऊंची देखील वाढते, आपल्या प्रयत्नांची ऊंची वाढते, आणि तेव्हाच आपण आपली स्वप्ने साकार करू शकतो.

7. आज भारतानेही एक खूप मोठे स्वप्न पहिले आहे, दृढ संकल्पाने, नव्या उंचीवर जाण्यासाठी स्वप्न पहिले आहे, आणि ते स्वप्न आहे, जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी असेल, त्यावेळी म्हणजे 2047 साली आपण विकसित भारत निर्माण करु.

8. 140 कोटी देशबांधवांच्या पुरुषार्थातून आपल्याला हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे आणि जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश, विकसित होण्याचा संकल्प करतो, तेव्हा या संकल्प जगभरातील लोकांना, आपल्या धाडसी, साहसी वृत्तीचा परिचय करून देणारा ठरतो. अशावेळी जगालाही आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलावाच लागतो.

9. गेल्या 12 वर्षांत देशातील कोट्यवधी नागरिक—दलित असोत, पीडित असोत, वंचित असोत, आदिवासी असोत, गावात राहणारे असोत, शहरात राहणारे असोत, गरीब असोत, मध्यमवर्गीय असोत, तरुण असोत, ज्येष्ठ असोत, महिला असोत, पुरुष असोत, उत्तर भारतातील असोत, दक्षिण भारतातील असोत, पूर्वेकडील असोत किंवा पश्चिमेकडील असोत—प्रत्येकाने गेल्या 12 वर्षांत एका संकल्पाने, समर्पणाने देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी प्रत्येक प्रकारे प्रयत्न केले आहेत.

10. त्यांच्या या प्रयत्नांविषयी मी आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचाच परिणाम आहे की, एवढ्या कमी कालावधीत देशातील 25 कोटी नागरिकांनी गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर पडले आहेत.

11. एकेकाळी आपल्या अर्थव्यवस्थेची गणना ‘फ्रेजाइल फाइव्ह’ म्हणजे पाच दुर्बल अर्थव्यवस्थामध्ये मध्ये केली जात होती. मात्र, 12 वर्षांच्या आत आपण महत्वाच्या अर्थव्यवस्थेसह जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत.

12. गेल्या 12 वर्षांत, देशातील संरक्षण उत्पादन जवळपास चार पटीने वाढले. खादी आणि ग्रामोद्योगाचे उत्पादन जवळपास पाच पटीने तर, इलेक्ट्रॉनिक उत्पादन जवळपास सात पटीने वाढले, आधुनिक रेल्वे कोचच्या निर्मितीत एकवीस पटीने वाढ झाली, मोबाइल फोनच्या उत्पादनात 35 पटीने वाढ झाली. एवढेच नाही, तर आधुनिक युगाचा विचार करून डिजिटल आणि नवोन्मेषाच्या जगातही आपण आपला झेंडा फडकवला आहे.

13. इंटरनेट वापरकर्ते, इंटरनेट ग्राहक जवळपास चार पटीने वाढले, पेटंट मंजूर होण्याची संख्या चार पटीने वाढली, डिजिटल व्यवहार 100 पटीने वाढले. त्यासोबतच, सामान्य माणसांसाठीच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्यासाठीही आपण तितक्याच गांभीर्याने प्रयत्न करत आहोत.

14. दरवर्षी सरासरी 15 पट अधिक वेगाने आम्ही नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या जोडण्या दिल्या.  दरवर्षी सरासरी  सहापट अधिक वेगाने लोकांना गॅस जोडण्या दिल्या. दरवर्षी चार पट अधिक वेगाने गरीबांसाठी शौचालये बांधण्याचे काम केले. दरवर्षी तीनपट अधिक वेगाने गरीबांना घरे देण्याचे काम केले.

15. देशाच्या प्रशासन व्यवस्थेतही मोठे बदल घडवून आणले. हजारोच्या संख्येने अनुपालनाच्या अटी समाप्त केल्या. शेकडो जुने कायदे रद्द केले. विसाव्या शतकातील कायद्यांच्या आधारे एकविसाव्या शतकाची वाटचाल होऊ शकत नाही.

16. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी सरकारने मेट्रोचा विस्तार केला आहे, सार्वजनिक वाहतुकीला बळ दिले आहे. ज्या वेगाने काम झाले, ज्या व्यापक स्तरावर काम झाले, हा वेग, हा विस्तार, हे यश स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गेल्या दशकात पाहायला मिळाले आहे. आणि जेव्हा आपल्या समोर एवढी सारी उपलब्धी असते, एवढा वेग दिसून येतो, देशबांधवांचे सामर्थ्य क्षणोक्षणी अधिक बळकट होत असते, तेव्हा 2047 मध्ये विकसित भारत बनण्याचा संकल्प कधीही अपूर्ण राहू शकत नाही.

17. आपल्याला आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. आपल्या हितसंबंधाची सुरक्षितता, आपल्याला स्वतःला करायची आहे आणि म्हणूनच, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला अत्यंत दृढ इच्छा शक्तीने आपण पुढे घेऊन जात आहोत. मेक इन इंडिया, स्वदेशी, व्होकल फॉर लोकल, अशा सर्व उपक्रमांशी आज भारतीय माणूस जोडला जात आहे.

18. आजच्या डिजिटल जगात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, चिपचे महत्त्व आपण समजतो. कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण असो, आपली वैद्यकीय उपकरणे असोत, आपल्या वाहतुकीची साधने असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिप अनिवार्य आहे आणि या चिपशिवाय जग ठप्प होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच भारताने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आपला सेमीकंडक्टर प्लांट, मोठा सेमीकंडक्टर प्लांट सुरू केला आहे. तीन सेमीकंडक्टर प्लांट सुरू झाले आहेत.

19. मी देशबांधवांना सांगू इच्छितो की, येत्या सात-आठ वर्षांत आणखी 5-7 किंवा 8 सेमीकंडक्टर प्लांट लवकरच सुरू होणार आहेत. हा आत्मनिर्भर भारत,  आपल्याला विकसित भारताच्या दिशेने जाण्यासाठीचा महामार्ग उपलब्ध करून देतो आहे.

20. महत्वाच्या खनिजांचे उद्दिष्ट सामायिक केले जावे, यासाठी आम्ही राष्ट्रीय महत्वपूर्ण सुरू केले आहे. अर्थसंकल्पात आम्ही क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉरची घोषणा केली आहे. अनेक देशांसोबत करार होत आहेत. जगातील अनेक देश आता या क्रिटिकल मिनरल्सच्या दिशेने भारतावर विश्वास ठेवू लागले आहेत.

21. आता ऊर्जेशिवाय जग चालवणे अत्यंत कठीण काम आहे, आणि म्हणूनच आपल्याला चिप असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर असो, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. ऊर्जा सुरक्षा ही काळाची गरज आहे, आणि हे ओळखूनच, सरकार त्याच दिशेने एकापाठोपाठ एक भक्कम पावले उचलत आहे.

22. ऊर्जा  सुरक्षेसाठीचे खूप मोठे माध्यम आहे, अणू ऊर्जा, न्यूक्लिअर ऊर्जा. आम्ही संसदेत, शांती कायदा मंजूर करत, एका नव्या उद्दिष्टाकडे जाण्याचा रस्ता आम्ही निश्चित केला आहे. 2047 पर्यंत आम्ही 100 गिगावॉट अणूऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

23. याच एक दशकात आम्ही पांच अणूऊर्जा अणूभट्टया सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या वर्षात, भारताने फास्ट ब्रीडर न्यूक्लियर तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवून एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे आणि त्यामुळे अणुइंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आपण एक मोठे यशस्वी पाऊल उचलले आहे.

24. आम्ही गेल्या वर्षी याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत ‘समुद्र मंथन’ची घोषणा केली होती आणि गेल्या काही दिवसांत आम्ही या कामासाठी 85,000 कोटी रुपये मंजूर करून या कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे.

25. 2014 पूर्वी, म्हणजे आजपासून 12 वर्षांपूर्वी, आपल्या देशात केवळ 70 शहरांमध्ये पाइपद्वारे गॅसची व्यवस्था होती, पाइपद्वारे गॅसचे वितरण केले जात होते. 12 वर्षांत या 70 शहरांची संख्या आम्ही 700 शहरांपर्यंत पोहोचवली आहे. याला म्हणतात वेग, याला म्हणतात विस्तार!

26. 2014 पूर्वी जेमतेम 20-22 लाख घरांमध्ये पाइपद्वारे गॅस पोहोचत होता, आज पावणेदोन कोटी घरांमध्ये पाइपद्वारे गॅस जोडण्या पोहोचवण्याचे काम सुरू आहे. 12 वर्षांपूर्वी देशात सौरऊर्जेची क्षमता केवळ 2 गिगावॅट होती, 2 गिगावॅट! आज आम्ही 160 गिगावॅटचे लक्ष्य गाठले आहे.

27. आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आणि मला आज सांगतांना आनंद होत आहे, की इतक्या कमी काळात, 50 लाख घरांमध्ये, सौर ऊर्जेचे काम सुरू झाले आहे. हा आकडा आम्ही पार केला असून, अत्यंत वेगाने काम सुरू आहे आणि त्यामुळे हजारो घरांचे विजेचे बिल शून्य झाले आहे.

28. हजारो घरे, आपल्या गरजेपुरत्या विजेचा वापर करून, आता अतिरिक्त वीज विकून, कमाई देखील करत आहेत. प्रत्येक कुटुंबाला हे काम करण्यासाठी सरकारकडून 80000 रुपयांची मदत दिली जात आहे, तेव्हा हे काम पूर्ण होत आहे.

29. आपली जी रेल्वे आहे, त्याच्या विद्युतीकरणाचे काम देशात 1925 साली सुरू झाले होते. मात्र, 90 वर्षात, म्हणजे 1925 पासूनच्या 90 वर्षात, केवळ 30 टक्के रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले. आम्ही या एका दशकाच्या आत शंभर टक्के काम पूर्ण केले आहे. 90 वर्षांत 30 टक्के, 10 वर्षांत 70 टक्के—याला म्हणतात काम. आणि यामुळे डिझेलची बचत झाली, जे आपल्याला बाहेरून आयात करावे लागते. विजेवर आपल्या रेल्वे धावू लागल्या, पर्यावरणालाही त्याचा फायदा होऊ लागला.

30. देशाने हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू केली आहे आणि मला आनंद आहे की ही जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली ट्रेन आहे. यामुळे, जगात हायड्रोजन ट्रेनच्या क्षेत्रातही भारताने आपला झेंडा रोवला आहे.

31.   कोरोनासारख्या जागतिक साथीच्या रोगाने (महामारीने) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले होते, संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती; कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलो, तोच युद्धाच्या भीषणतेच्या बातम्या येऊ लागल्या, कुठे युक्रेन तर कुठे पश्चिम आशिया, प्रत्येक ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

32.   देशाने हे पाहिले आहे की गेल्या 10-12 वर्षातील विचारपूर्वक तयार केलेल्या योजना परिणाम सिद्ध करत आहेत आणि इतक्या मोठ्या संकटानंतरही 'नागरिक देवो भव:' या मंत्राला घेऊन जगणाऱ्या भारताने जी तयारी केली होती आणि एकामागोमाग एक पावले उचलली होती—हे संकट येईल असा विचार केला नव्हता, परंतु त्या संकटाच्या काळात या सर्व गोष्टी कामी आल्या आणि आज देशात गॅससुद्धा आहे, पेट्रोलसुद्धा आहे, युरियासुद्धा आहे. आपण आपल्या ताकदीवर उभे राहत आहोत, पुढे जात आहोत.

33.   सरकार आपल्या खांद्यावर तो भार उचलत आहे आणि जगातून जे 3000 रुपयांत युरियाचे पोते आपल्याला मिळते, ते आपल्या शेतकऱ्यांना आपण फक्त 300 रुपयांत देऊ शकत आहोत. एवढेच नाही, DAP चे दर आज जगातील बाजारात 5000 वर पोहोचले आहेत; परंतु माझ्या देशातील शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून 1350 रुपयांत आजही DAP देण्याचे काम आपण करत आहोत.

34.   जग आपल्याकडे जे काही आहे, त्याचे शस्त्रात रुपांतर (वेपनाइज) करण्यात गुंतलेले आहे. संसाधनांचे शस्त्रात रुपांतर, साधनसामग्रीचे शस्त्रात रुपांतर, पेट्रोल, डिझेल, खते, औषधे, तंत्रज्ञानाच्या चिप्स—एवढेच नाही तर भूभागाचेही शस्त्रांमध्ये रुपांतर केले जात आहे.

35. आज भारत जगासाठी एक स्वीकृत आणि सन्माननीय देश बनत आहे. भारताकडे स्थिर राजकीय कौल (पॉलिटिकल मॅन्डेट) आहे, स्थिर सरकार आहे, भारताची सचेतन लोकशाही आहे, भारताची मजबूत न्यायव्यवस्था आहे आणि आपल्या सर्वांना दिशा देणारे भारताचे संविधान आहे; आणि आता जग आपल्या या सामर्थ्याला ओळखू लागले आहे.  

36.   2014 नंतर, जगातील जवळपास 40 देशांसोबत आपला मुक्त व्यापार करार (FTA) होत आहे. आपण पहा, किती मोठी संधी आली आहे! परंतु हे जे व्यापार करार  झाले आहेत, ही एक अत्यंत मोठी संधी आहे आणि म्हणूनच विशेषतः मी माझ्या MSME क्षेत्राला सांगू इच्छितो की, आपण ही संधी दवडायची नाही.

37.   आपल्याला जगात पोहोचायचे आहे; भारताचे प्रत्येक उत्पादन जगाच्या बाजारात पोहोचले पाहिजे. मग आपले कापड  असो, आपली यंत्रसामग्री असो किंवा औषधे असोत, आपण संधी सोडायची नाही. परंतु, जे जागतिक निकष आहेत, ते निकष आपल्याला पार करावे लागतील. जगाला जे मिळते, त्यापेक्षा उत्तम उत्पादन आपल्याला द्यावे लागेल.

38.   केरळमपासून गुजरातपर्यंत आणि तमिळनाडूपासून बंगालपर्यंत, हा आपला समुद्रकिनारा, आपले मच्छीमार बंधू-भगिनी; आज या एफटीएमुळे आपले श्रीम्प म्हणजेच कोळंबीच्या निर्यातीची खूप मोठी शक्यता वाढली आहे. आपले सी-फूड जगात पोहोचण्याची शक्यता वाढली आहे.

39.   आपण 'रिफॉर्म एक्स्प्रेस' मधून प्रवास करत आहोत आणि येत्या दिवसांत आपण पुढच्या पातळीवरील सुधारणांकडे आगेकूच करणार आहोत. म्हणूनच सरकार, समाज, उद्योग, उत्पादक, शेतकरी—या सर्वांनाच आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करावी लागेल, विचारांमध्ये सुधारणा करावी लागेल आणि आपल्या ध्येयांमध्ये सुधारणा करावी लागेल.

40.   आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी देशासमोर शक्तीच्या या सप्तधारेला आवाहन करत आहे. येत्या 5-7 वर्षांत, जे गेल्या 5-7 दशकांत झाले नाही, ते या सप्तधारेच्या सामर्थ्याने व शक्तीने आपण देशाला नवीन उंची, नवीन गती देऊ आणि नवीन उद्दिष्टे पार पाडणारे सामर्थ्य प्रदान करू.

41.   येत्या दिवसांत जेव्हा मी सप्तधारेबद्दल बोलतो, तेव्हा सप्तधारेची पहिली शक्ती आहे - उत्पादनाची शक्ती.

42.   आपल्याला उत्पादन क्षेत्राला खूप पुढे न्यावे लागेल आणि उत्पादन वाढवण्यासोबतच आपल्याला लहान-लहान सुटे भाग देखील बनवायचे आहेत आणि मोठ-मोठी उत्पादने बनवायची आहेत.

43.   संपूर्ण मूल्य साखळी आपली स्वतःची असली पाहिजे आणि तिला घेऊन पुढे चालायचे आहे; आपल्याला सुटे भाग देखील हवे आहेत आणि आपल्याला संपूर्ण उत्पादनप्रक्रिया सुद्धा हवी आहे, संपूर्ण उत्पादनसुद्धा हवे आहे. डिझाईनपासून मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत भारताला जागतिक पुरवठा साखळीचे एक विश्वासार्ह केंद्र बनावे लागेल.

44.   आपले कारखाने स्पर्धात्मक असोत, आपली उत्पादने वापरकर्ता-स्नेही असोत, आपले पॅकेजिंग जगातील लोकांना आकर्षित करणारे असो. आपले झिरो-डिफेक्ट प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग ही आपली ओळख बनली पाहिजे.

45. प्रत्येक उत्पादक, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक MSME ला मला हे सांगायचे आहे की, जागतिक बाजारात आपली ओळख ही विश्वासार्हता आणि गुणवत्ता या आधारावरच झाली पाहिजे. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही आणि म्हणूनच आपला मंत्र 'क्वालिटी, क्वालिटी, क्वालिटी' (गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता) असाच असायला हवा. हीच जागतिक ब्रँड व्हॅल्यू बनेल.      

46.   या सप्तधारेची दुसरी शक्ती आहे - कृषी आणि अन्न उत्पादन. अन्न प्रक्रिया अर्थात फूड प्रोसेसिंग, आपल्याला या दिशेने पुढे जावे लागेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी आता जगाचे बाजार खुले झाले आहेत; एफटीए मुळे आपल्याला एक खूप मोठा बाजार मिळत आहे, आपल्याला तिथे पोहोचायचे आहे, आपल्याला त्या जागेपर्यंत आपली पोहोच निर्माण करायची आहे, आपल्याला शेतापासून निर्यात बाजारपेठेच्या दिशेने जावे लागेल.

47.   आपले शेतकरी रासायनिक खतमुक्त शेतीवर भर देतील, जगात या उत्पादनांची मागणी आणखी वाढणार आहे; आणि जागतिक निकषांमध्ये सर्व प्रकारे सिद्ध होणारी आपली शेती उत्पादने असली, तर आपण जगात सहजपणे पोहोचू शकू.

48.   माझ्या सप्तधारेची तिसरी शक्ती आहे - तंत्रज्ञान आणि नवोन्मेष. आजचा काळ एआय (AI), क्वांटम, स्पेस, रोबोटिक्स आणि डेटा सेंटर्सचा आहे; पूर्णपणे एक नवीन क्षेत्र खुले झाले आहे. आणि नव्याने उदयास येणारी तंत्रज्ञाने आपल्याला प्रत्येक क्षणी आव्हान देत आहेत, म्हणूनच देशाला जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू द्यायचे नाही, तर आपल्याला नवोन्मेषाचे केंद्र बनायचे आहे.

49.   आपण यूपीआय (UPI) आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे, आपल्या ताकदीची ओळख करून दिली आहे. आता भारताला डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहे. भारताला नेक्स्ट जनरेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये नेतृत्व करायचे आहे.

50.   'मेड इन इंडिया 6G'  प्रत्येक कोपऱ्यात पोहोचावे हे आपले उद्दिष्ट असायला हवे आणि आपण यात गती आणली पाहिजे; यासाठी आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत.

51.   सप्तधारेची चौथी शक्ती आहे - गतिशक्ती. या गतिशक्तीअंतर्गत, देशात अखंड आणि जलद कनेक्टिव्हिटीवर आपल्याला भर द्यावा लागेल. शहरे हाय-स्पीड रेलने जोडली पाहिजेत. आधुनिक महामार्ग, अंतर्गत जलमार्ग, विमानतळ आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक्सची व्यवस्था आपल्याला हवी आहे.

52.   आपल्याला बंदरे  केवळ माल उतरवण्याची आणि चढवण्याची जागा किंवा जगातील जहाजे येऊन नांगर टाकण्याची जागा एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवायची नाहीत, तर बंदरांवर आधारित विकासाच्या दिशेने आपल्याला पुढे जावे लागेल.

53.   आपल्या सप्तधारेची पाचवी शक्ती आहे - संरक्षण शक्ती. या संरक्षण शक्तीचे महत्त्व सर्व दृष्टीने अत्यंत जास्त आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे किती गरजेचे आहे, याचा अनुभव आता भारताने घेतला आहे आणि जगानेही घेतला आहे; याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय नाही.

54.   नेक्स्ट जनरेशन संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आपल्याला जागतिक पुरवठादार बनण्याच्या दिशेने उद्दिष्ट ठेवून वाटचाल करायची आहे. आपल्याला ड्रोन, काउंटर-ड्रोन सिस्टम्स विकसित कराव्या लागतील आणि हायपरसोनिक डिफेन्स टेक्नॉलॉजीजमध्ये नेतृत्व करावे लागेल.

55.   सायबर सुरक्षा सुद्धा आज घरोघरी एक समस्या बनत आहे. तेदेखील संरक्षणाचेच एक क्षेत्र आहे, ज्यामध्ये आपल्या तरुणांचे जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा उपयोग आपण देशासाठी आणि जगासाठी करू शकतो.

56. आपल्या सप्तधारांपैकी सहावी शक्ती म्हणजे हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थांमधून हरित रोजगारांचीदेखील निर्मिती होते. आपल्याला हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित गतिशीलता आणि जागतिक स्तरावरील हरित उत्पादन या क्षेत्रांमध्ये निश्चितपणे आघाडी घ्यायची आहे.

57. भारताकडे नील अर्थव्यवस्थेसाठीही मोठ्या संधी आहेत. भारताला विस्तीर्ण आणि प्रदीर्घ समुद्रकिनारा लाभला आहे. नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्यव्यवसाय, किनारी पर्यटन, सागरी तंत्रज्ञान अशी अनेक क्षेत्रे आहेत, ज्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो.

58. आपली सातवी धारा म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर. भारताच्या सॉफ्ट पॉवरची मोठी ताकद आहे. आज योगाने संपूर्ण जगाला भारताशी जोडले आहे. योग हा जगासाठी एक ऊर्जा बनत चालला आहे.

59. ज्या भारताकडे श्रद्धेची आणि आस्थेची केंद्रे आहेत, ज्या भारताकडे आयुर्वेद आहे, ज्याप्रकारे भारताकडे समग्र आरोग्यसेवेची व्यवस्था आहे, ‘हील इन इंडिया’ हे अभियान आहे, त्याआधारे आपण जगासमोर आपल्या सामर्थ्याची ओळख निर्माण करू शकतो.

60. हस्तकला असो, संस्कृती असो, आपले चित्रपट असोत, आपले सर्जनशील जग असो, व्हीएफएक्स असो, आपले ॲनिमेशन असो, आपले गेमिंग असो किंवा डिजिटल कंटेंट असो, सर्जनशील विश्वात भारत आपला दबदबा निर्माण करू शकतो.

61. आज भारताने व्हे्वज शिखर परिषदेच्या माध्यमातून या क्षेत्राला मोठी ताकद दिली आहे. जग हळूहळू भारताच्या जागतिक दृक्-श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची वाट पाहत आहे. ही परिषद भारताची सॉफ्ट पॉवर आणि भारताच्या सर्जनशील जगाची जगाला ओळख करून देईल.

62. भारताकडे विशाल वनसंपदा आहे. आपल्या देशात 100 हून अधिक राष्ट्रीय उद्याने आहेत. क्षमता मोठी आहे; मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कमी पडलो आहोत. आपल्या सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगभरातील पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची आपल्याला संधी आहे. आपले सामर्थ्य आपल्याला जगाला दाखवायचे आहे.

63. आज जगात क्रीडा क्षेत्र देखील भारताबद्दल आकर्षणाचे एक मोठे केंद्र ठरत आहे. जगातील क्रीडा स्पर्धांचे आयोजन भारतात का होऊ नये? कॉन्सर्ट अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि देशातील तरुणांचे त्याकडे मोठे आकर्षण आहे. जगातील प्रत्येक कलाकाराला कधी ना कधी भारताच्या भूमीवर आपली कॉन्सर्ट आयोजित करावासी वाटतो. ही एक मोठी संधी आहे. या संधीचा प्रभावीपणे उपयोग करण्यासाठी आपल्याला आवश्यक व्यवस्था उभाराव्या लागतील.

64. देश म्हणजे केवळ सरकार नव्हे, तर देश म्हणजे प्रत्येक नागरिकाचा सहभाग. आपण असा विचार करू शकत नाही का, की ‘फॉर्च्युन 500’ची चर्चा आपण नेहमी ऐकतो. येत्या एका दशकात या ‘फॉर्च्युन 500’ कंपन्यांपैकी 50 कंपन्या भारतीय का असू नयेत? हे आपले लक्ष्य का असू नये?

65. आज बँकिंग क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर भरभराट होत आहे. जगातील आघाडीच्या बँकांमध्ये भारताच्या बँकेची पताका का फडकू नये? भारताची बँकही जगातील आघाडीच्या बँकांमध्ये असावी. जगातील पहिल्या पाच आघाडीच्या बँकांमध्ये भारताचीही एक बँक असली पाहिजे.

66. भारताने औषधनिर्मितीच्या क्षेत्रातही मोठे काम केले आहे. मात्र, काळाची गरज अशी आहे की, जगातील पाच मोठ्या औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील एक-दोन औषधनिर्मिती कंपन्यांचे नावही ठळकपणे झळकले पाहिजे.

67. आपली एखादी सल्लागार कंपनी किंवा लेखा-विषयक कंपनी जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये का असू नये? भारतातील तंत्रज्ञान कंपन्या जगात अग्रस्थानी असाव्यात, हे आपले लक्ष्य असले पाहिजे.

68. आपले असे ब्रँड असावेत, ज्यांच्याकडे जग आकर्षित व्हावे. आपले ब्रँड ही आपल्या देशाची ओळख बनावेत आणि भारत हे जगासाठी एक आकर्षणाचे ठिकाण बनावे, या दिशेने आपल्याला काम करायचे आहे.

69. यासाठी मला राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सांगायचे आहे, भारत सरकारचेही हे दायित्व आहे की, आपल्याला आपल्या सुधारणांची गती वाढवावी लागेल.

70. आपल्याला 2047 च्या लक्ष्याच्या अनुषंगाने व्यवस्था विकसित कराव्या लागतील. आपण जुन्या काळातील धोरणे आणि नियमांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला येणाऱ्या काळाच्या स्वप्नांनुसार धोरणे आणि नियम तयार करावे लागतील.

71. विकसित भारताच्या वाटचालीत युवकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. एवढेच नव्हे, तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थीही माझ्या देशातील युवक आहे. त्यामुळे विकसित भारताचे लक्ष्य युवकांशी जोडून पुढे नेले पाहिजे. युवकांना सर्वोच्च प्राधान्य देत आपल्याला पुढे जायचे आहे.

72. गेल्या 10-12 वर्षांत त्या दिशेने बरेच काही घडले आहे. स्टार्टअप इंडिया अभियानामुळे आज संपूर्ण देशात अडीच लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत. देशातील युवक स्वतः तर काम करत आहेतच, शिवाय अनेकांना रोजगारही देत आहेत.

73. भारत सरकारने 1 लाख कोटी रुपयांचा नवोन्मेष निधी जाहीर केला आहे. मला देशातील युवकांना सांगायचे आहे की, तुम्ही तुमची स्वप्ने घेऊन या; संसाधनांची कमतरता भासू देणार नाही. संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल इंडिया अंतर्गत उपलब्ध झालेल्या स्वस्त डेटा सुविधेने युवकांना सशक्त केले आहे.

74. आम्ही अंतराळ क्षेत्र खुले केले आहे. राष्ट्रीय ड्रोन धोरण तयार केले आहे. खेलो इंडिया धोरण तयार केले आहे. 35 वर्षांपर्यंत नवीन शिक्षण धोरण नव्हते; आम्ही नवीन शिक्षण धोरण घेऊन आलो आहोत आणि त्याचा लाभ मध्यमवर्गीय कुटुंबांना झाला आहे.

75. 2004 ते 2014 या कालावधीत आपल्या देशात 350 पेक्षाही कमी विद्यापीठे होती. आज अवघ्या 10-12 वर्षांच्या कालावधीत सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली आहे. आपण सुमारे 1 हजार विद्यापीठांच्या संख्येपर्यंत पोहोचत आहोत.

76. 2014 पूर्वी वैद्यकीय क्षेत्रातील केवळ 400 जागा उपलब्ध होत्या. आज वैद्यकीय क्षेत्रातील जागांची संख्या जवळपास 850 झाली आहे. एवढेच नव्हे, तर आता परदेशी विद्यापीठेही भारताच्या भूमीवर येत आहेत. भारतातच परदेशी विद्यापीठाची पदवी माझ्या देशातील युवकांना मिळावी, याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

77. आपल्या देशातील युवकांचे मन लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे आकर्षित व्हावे, या दिशेने आम्ही काम करत आहोत. त्यामुळे आम्ही सुमारे 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग प्रयोगशाळा छोट्या-छोट्या मुलांच्या हाती सोपवल्या आहेत, जेणेकरून त्यांच्यामध्ये नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी.

78. भारतातील खासगी स्टार्टअप्समधील सरासरी 28 वर्षे वयाच्या युवकांनी जगात पहिल्यांदाच, पहिल्याच प्रयत्नात आपला उपग्रह आणि रॉकेटही प्रक्षेपित करत अत्यंत मोठे काम केले आहे.

79. आज देशात अडीच लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. नुकतेच आपण एआय इम्पॅक्ट शिखर परिषद आयोजित केली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे.

80. लाल किल्ल्यावरून मला देशातील युवकांसाठी एक घोषणा करायची आहे. आम्ही येत्या एका वर्षात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. यामुळे आपल्या देशातील युवकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही नेतृत्व करण्याचे सामर्थ्य निर्माण होईल.

81. जैव अर्थव्यवस्थेत (Bioeconomy) देशाच्या युवा शक्तीने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. मित्रहो, 2014 पूर्वी जो व्यवहार 60 हजार कोटी रुपयांचा होता, ती जैव अर्थव्यवस्था आज 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

82. 2009-10 चा कालावधी होता, तेव्हा अवघी 1.5 लाख म्हणजे दीड लाख इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तर या 2025-26 मध्ये 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे.

83. नागरी विमान वाहतूक क्षेत्रही माझ्या युवा वर्गासाठी अत्यंत वेगाने पुढे वाटचाल आहे. नवीन विमानतळ, नवे मार्ग, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत आहेत. देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल यामुळेही देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाला काम मिळत आहे. मेड इन इंडिया विमाने बनवण्याच्या दिशेने आपण यश मिळवले आहे. मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेले लष्करी वाहतूक विमान C295 याआधीच यशस्वी उड्डाण पूर्ण करून कार्यरत झाले आहे.

84. सुमारे सव्वातीन कोटी कुटुंबांना स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला असून, यामुळे 140 लाख कोटी रुपयांची मालमत्ता वापरायोग्य झाली आहे, त्या आधारे बँकांकडून कर्ज मिळू शकते आणि लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.

85. आम्ही युवा वर्गासाठी विविध परीक्षांची मोफत ऑनलाइन मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI - Digital Public Infrastructure) आहे, उत्तम गुणवत्ता आणि शिक्षक आहेत. या सर्व साधनांची सांगड घालून आपण देशातील युवा वर्गाला मोफत मार्गदर्शन देणारे एक संपूर्ण जाळे उभारणार आहोत.

86. टॉप्स (TOPS - Target Olympic Podium Scheme) योजनेअंतर्गत मोठे यश गाठले आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा, विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, हिवाळी क्रीडा स्पर्धा, बीच क्रीडा स्पर्धा, क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडूंसाठी प्रशिक्षण, क्रीडा वैद्यकशास्त्र आणि क्रीडा पोषण या सर्व क्षेत्रांत भारत आता प्रभुत्व साध्य करण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करतो आहे. क्रीडा जगतात भारताची कामगिरी अधिकाधिक चमकदार होत असून, आपण 2036 मधील ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहोत, तसेच 2030 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद आता भारत भूषवणार आहे.

87. 2036 मध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हावी अशी आपली इच्छा आहे, पण 2036 च्या ऑलिम्पिकमध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये भारत आज खेळत नाही, ज्या प्रकारांमध्ये भारत पात्र ठरत नाही किंवा ज्या स्पर्धा भारताने बाजूला ठेवल्या आहेत, असा तीन चतुर्थांश भाग आपली वाट पाहतो आहे. भारत त्यावर विशेष भर देईल आणि त्यासाठी आपण गुणवत्ता शोधाचे अभियानही राबवणार आहोत.

88. 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांमधील क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी गावोगावी, शहराशहरांत आणि शाळाशाळांमध्ये एक गुणवत्ता शोध अभियान राबवले जाईल. मुलांमधील प्रतिभेची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन देशासाठी खेळणारे उत्कृष्ट खेळाडू घडवले जातील.

89. देशासमोर आणि देशातील युवा वर्गासमोर व्यसनाधीनता हे एक अत्यंत मोठे संकट बनत चालले आहे. नशामुक्त भारत हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य असायला हवे.

90. नक्षलवाद आणि माओवादाने लाखो युवा वर्गाचे भविष्य उद्ध्वस्त केले. या नक्षलवादाने चार चार दशके भारताच्या एका मोठ्या भूभागाला आणि प्रचंड लोकसंख्येला ओलीस ठेवले होते. बंदुकीच्या जिवावर ओलिस ठेवले होते, संविधानाची पायमल्ली केली होती आणि देशातील सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी आपल्या पोलीस आणि सुरक्षा दलांचे 3500 पेक्षा जास्त जवान शहीद झाले.

91. आज मला आनंद होत आहे की, नक्षलवादी माओवादी हिंसाचारात अखेरचा श्वास घेण्याची ताकदही आता उरलेली नाही. जिथे कधीकाळी नक्षलवाद्यांच्या गोळ्या झाडल्या जायच्या, जिथे कधी भूमी रक्तरंजित होत होती, आज त्याच नक्षलग्रस्त भागांत, त्याच प्रदेशांत, नक्षलमुक्त झाल्यामुळे विकास, विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा फडकत आहे.

92. सशस्त्र नक्षलवादी तर संपले, पण वैचारिक नक्षलवादी (दिमागी नक्षलवादी) अजूनही संधीच्या शोधात आहेत. ते हिंसा आणि अराजकतेचे मार्ग शोधत आहेत. समाजाला चुकीच्या मार्गावर ढकलण्यासाठी ते नानाविध डावपेच आखत आहेत.

93. या वैचारिक नक्षलवाद्यांना ओळखणे गरजेचे आहे. या वैचारिक नक्षलवाद्यांना एकटे पाडले पाहिजे आणि देशाच्या युवा पिढीला राष्ट्र विकसित करण्याच्या मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे.

94. सुरक्षित भारत घडवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आव्हान सीमेच्या आतले असो वा सीमेबाहेरचे, भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आज युद्धाचे स्वरूप बदलत आहे. आता युद्ध फक्त सीमेवरच लढले जाईल, याची शाश्वती नाही.

95. आम्ही मिशन सुदर्शन चक्रची गेल्या काही वर्षांत घोषणा केली होती. त्यावर अतिशय वेगाने काम सुरू आहे. आज आपली संरक्षण निर्यात सुमारे 50 पटीने वाढली आहे. सुमारे 100 देशांमध्ये आपली शस्त्रास्त्रे पोहोचत आहे.

96. मी आज लाल किल्ल्यावरून ही घोषणा करत आहे की, येत्या काही दिवसांत आपण नागरी संरक्षणाची एक बहुआयामी व्यवस्था उभारू. त्यांना आधुनिक प्रणालींशी जोडू.

97. राष्ट्र उभारणीत आज आपल्या भगिनी आणि कन्यांचे योगदान आपल्या सर्वांसाठी खूप मोठ्या प्रेरणेचा स्रोत बनले आहे. लढाऊ विमाने असोत वा नागरी विमान वाहतूक क्षेत्र, आपल्या मुली आघाडीवर दिसत आहेत.

98. आज आपण 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, ते आपण पार केले आहे. आता आपण 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहोत. 3 कोटी नव्या लखपती दीदी तयार होणे म्हणजे मातृशक्तीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत खूप मोठा बदल घडून येणार आहे.

99. मी देशाच्या सर्व राजकीय पक्षांना आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा झेंड्याच्या सावलीत उभा राहून प्रार्थना करतो, विनंती करतो. त्या महिलांच्या सन्मानासाठी पुढे या आणि लवकरात लवकर आपल्या माता-भगिनींना 33% विधानसभा आणि लोकसभेत प्रतिनिधित्व मिळून द्या, त्यांना भारताचे धोरण आखून यात आपले योगदान देता यावे. 

100. ही काळाची गरज आहे आणि मी सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा विनंती करतो, या, महिला आरक्षण लागू करून महिलांच्या सन्मानात तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हीही यश घ्या, तुम्हीही श्रेय घ्या, पण माझ्या माता भगिनींना त्यांचा हक्क द्या.

101. गेल्या 5-7 दशकांत केवळ 25 कोटी, आम्ही एका दशकभराच्या आत 100 कोटी देशवासीयांना सामाजिक सुरक्षेचे कवच दिले आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 70 वर्षे वयाच्या ज्येष्ठांनाही आज 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचाराची सुविधा मिळते आहे.

102. जनगणनेचे काम सुरु आहे, मोजणी सुरू आहे आणि मोजणी केवळ आकडेवारीने होत नाही. त्यातील तपशीलांतून धोरणे बनतात, योजना बनतात, देश पुढे जाण्याची आपली रूपरेषा तयार केली जाते आणि म्हणूनच अचूक माहिती असणे खूप गरजेचे आहे.

103. मी देशाच्या युवा वर्गाला सांगतो की आपण आपल्या कुटुंबातील लोकांना बसवून संपूर्ण अर्ज समजून घ्या. तुम्ही बघा, एवढे मोठे काम देश करेल आणि देशाचा वेळ तसेच शक्ती योग्य कामासाठी वापरात येईल, म्हणूनच मी देशाच्या युवा वर्गाला जनगणनेच्या या कामात सक्रियतेने जोडले जाण्यासाठी मी विनंती करतो.

104. मी लाल किल्ल्यावरून पंचप्रणबद्दल बोललो होतो. या पंचप्रणाने देशाला आपल्या आत्मगौरवाच्या दिशेने पुढे नेण्याचे, ध्येय साध्य करण्याच्या सामर्थ्यासह पुढे जाण्याचे एक खूप मोठे बळ दिले आहे. आपल्याला गुलामगिरीची मानसिकता क्षणोक्षणी मिटवतच वाटचाल करायची आहे.

105. स्वतःपेक्षाही वर राष्ट्राचे हित असो. स्वतःपेक्षाही वर राष्ट्राचे हित असो आणि कर्तव्य हीच आपली ओळख असो. मी सर्व देशवासीयांना सांगेन वेळ आपली आहे, मी सर्व देशवासीयांना सांगेन वेळ आपली आहे, संधी आपली आहे, संकल्प आपला आहे, चला स्वप्नांना संकल्प बनवूया, संकल्पाला सामर्थ्य बनवूया आणि सामर्थ्याला यशात बदलून दाखवूया.

106. चला प्रत्येक पावलाला विकासाचे पाऊल बनवूया, पावलाला पाऊल मिळवूया, मनाला मनांशी जोडूया, ध्येयाशी जोडलेले राहूया, एका दिव्याने हजारो दिवे उजळू देत, चला मिळून विकसित भारत बनवूया.

*** 

नितीन फुल्लुके / राधिका अघोर / शैलेश पाटील / राज दळेकर / तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2299906) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Gujarati , Telugu , Kannada , Assamese , English , Urdu , Tamil