संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज


'वंदे मातरम'ची 150 वर्षे आणि 'विकसित भारत@2047साठी युवा शक्ती' यावर आधारित भव्य सोहळ्याचे पंतप्रधान करणार नेतृत्व

सोहळ्याचा एक भाग म्हणून पहिल्यांदाच 'वंदे मातरम' सादर केले जाणार

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2026 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2026  रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून 80 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे नेतृत्व करतील. या भव्य कार्यक्रमात  राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या चिरंतन वारशाची 150 वर्षे  आणि 2047 पर्यंत भारताला 'विकसित भारत' बनवण्याच्या प्रवासात 'युवा शक्ती'ची ऊर्जा, आकांक्षा व महत्त्वपूर्ण योगदानाचा उत्सव साजरा  करण्यासाठी जय्यत आखणी करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरील या सोहळ्यात प्रथमच  'वंदे मातरम'गीताचे सादरीकरण होईल.

सोहळा

लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव  राजेश कुमार सिंह हे पंतप्रधानांचे स्वागत करतील. संरक्षण सचिव,  'जनरल ऑफिसर कमांडिंग', दिल्ली क्षेत्र, लेफ्टनंट जनरल राजेश सेठी यांची पंतप्रधानांशी ओळख करून देतील. त्यानंतर, जनरल ऑफिसर कमांडिंग (दिल्ली क्षेत्र) पंतप्रधानांना 'सॅल्यूटिंग बेस'पर्यंत घेऊन जातील; तिथे तिन्ही दलांचे संयुक्त पथक आणि दिल्ली पोलीस यांच्या संयुक्त तुकडीकडून नरेंद्र मोदी यांना मानवंदना  दिली जाईल. त्यानंतर, पंतप्रधान 'गार्ड ऑफ ऑनर'चे निरीक्षण करतील.

पंतप्रधानांसाठीच्या 'गार्ड ऑफ ऑनर' तुकडीमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलीस या प्रत्येक विभागातून एक अधिकारी आणि 24 जवान यांचा समावेश असेल. या वर्षीच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी भारतीय लष्कर हे समन्वयक दल म्हणून काम पाहत आहे. 'गार्ड ऑफ ऑनर'चे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अर्जुन सिंग करतील.

पंतप्रधानांच्या 'गार्ड'मधील लष्करी तुकडीचे नेतृत्व मेजर आदित्य शर्मा, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर नीलम राणा आणि हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर विपिन कुमार करतील. दिल्ली पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी विनीत कुमार करतील.

'गार्ड ऑफ ऑनर'ची पाहणी केल्यानंतर, पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीकडे रवाना होतील ; तिथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल एन. एस. राजा सुब्रमणी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन आणि लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ त्यांचे स्वागत करतील. दिल्ली क्षेत्राचे 'जीओसी'  राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी  पंतप्रधानांना तटबंदीवरील व्यासपीठापर्यंत घेऊन जातील.

राष्ट्रध्वज फडकवताना कॅप्टन सोनिया सिंह  चौहान पंतप्रधानांना साहाय्य करतील. त्याच वेळी  '1721 फील्ड बॅटरी (सेरेमोनियल)' च्या  जवानांकडून  21  तोफांची सलामी दिली जाईल.  स्वदेशी बनावटीच्या 105  मिमी 'लाइट फील्ड गन्स'चा वापर करणाऱ्या या तुकडीचे  नेतृत्व मेजर पवन सिंह  शेखावत करतील आणि 'गन पोझिशन ऑफिसर' म्हणून नायब सुभेदार (गनरीमधील सहाय्यक प्रशिक्षक) अनुतोष सरकार धुरा  सांभाळतील.

राष्ट्रीय ध्वज रक्षक दलात  एक अधिकारी आणि भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल तसेच दिल्ली पोलीस दलातील एकूण 32 विविध दर्जाचे जवान,पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण होत असतांना, राष्ट्रीय सलामी देतील. या आंतर-सैन्यदल सेवा आणि पोलीस दल पथकाचे नेतृत्व मेजर लोकेन्द्र सिंह शेखावत करतील.

राष्ट्रीय ध्वज रक्षक दलातील लष्करी तुकडीचे नेतृत्व मेजर विकास यादव, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर अभिलाष, तर वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर उमेश जी. करतील. तर, दिल्ली पोलिसांच्या तुकडीचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस उपायुक्त विकास मीणा करतील.

ध्वजारोहण झाल्यानंतर तिरंग्याला राष्ट्रीय सलामी दिली जाईल. एक जेसीओ  आणि 25 इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले लष्करी बँड पथक ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताची धून वाजवेल त्यावेळी लाल किल्ल्यावर उपस्थित सर्वजण राष्ट्रीय गीत गातील. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन करण्यात येईल. या बँडचे संयोजन सुबेदार ईश्वर सिंह करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या एमआय -17 या दोन हेलिकॉप्टर्सद्वारे, लाल किल्ल्यावर पुष्पवर्षाव केला जाईल. एका हेलिकॉप्टरवर राष्ट्रीय ध्वज, तर दुसऱ्या हेलिकॉप्टरवर ‘वंदे मातरम्’ दर्शवणारा ध्वज असेल. या हेलिकॉप्टरचे कॅप्टन विंग कमांडर रजत आणि स्क्वाड्रन लीडर अंकित वर्ष्णेय असतील.

पुष्पवर्षाव झाल्यानंतर, पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला संबोधित करतील. त्यांचे संबोधन संपल्यावर, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) चे छात्र, आणि माय भारत चे स्वयंसेवक, राष्ट्रीय गीत, वंदे मातरम सादर करतील, त्यानंतर पाठोपाठ राष्ट्रगीत गायले जाईल.

एकूण 2,500 कॅडेट्स मुले आणि मुली (लष्कर, नौदल आणि वायुसेना) तसेच ‘माय भारत’ स्वयंसेवक या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. हे कॅडेट्स आणि ‘माय भारत’ स्वयंसेवक लाल किल्ल्याच्या बुरुजासमोरील ज्ञानपथावर बसणार आहेत . त्यातून ते ‘वंदे मातरम्’ ही आकृती साकारतील. ज्ञानपथावर ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेवर आधारित व्ह्यू कटर बसवण्यात येणार आहेत.

विशेष पाहुणे :

समाजाच्या विविध क्षेत्रातील 5000 पेक्षा अधिक पाहुण्यांना, लाल किल्ल्यावरच्या यंदाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

तर, विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 1500 पेक्षा अधिक व्यक्तींना देखील, त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण आहे.

आसन व्यवस्थेतील विभागांची नावे

व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी तसेच जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, 2026 च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात आसन व्यवस्थेतील विभागांना नद्यांची नावे देण्यात आली होती.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी आसन व्यवस्थेतील विभागांना भारताच्या प्रमुख सरोवरांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये बडखल, भीमताल, चंद्रताल, चिलका, दलपत सागर, डिमना, दूधसागर, हाफलाँग, हरीके, हुसेन सागर, कंवर, कांकरिया, कोल्लेरू, लोकटक, लोणार, पँगोंग त्सो, पुलिकट, पुष्कर, रवींद्र सरोवर, रामगड ताल, रुद्रसागर,  शांती सागर, वेम्बनाड आणि वुलर यांचा समावेश आहे.

बँड पथकांचे सादरीकरण

नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी, देशभरातील 343 प्रमुख ठिकाणी विविध बँड पथकांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.

बेटांवरील ध्वजारोहण

अंदमान आणि निकोबार बेटे तसेच लक्षद्वीप येथे भारतीय नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

सोनाली काकडे/सुषमा काणे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2299120) आगंतुक पटल : 21
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , Tamil