रेल्वे मंत्रालय
कपूरथळा येथील रेल कोच फॅक्टरीद्वारे बांगलादेश रेल्वेकरिता एलएचबी रेल्वे डब्यांची पहिली रेक तयार
प्रविष्टि तिथि:
11 AUG 2026 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026
कपूरथळा येथील 'रेल कोच फॅक्टरी'ने बांगलादेश रेल्वेकरिता तयार केलेल्या 19 एलएचबी ब्रॉड गेज प्रवासी डब्यांची पहिली रेक 12 ऑगस्ट 2026 रोजी पाठवणी करण्यात येणार असल्याने फॅक्टरी आणखी महत्त्वाचा टप्पा साध्य करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या रेकमध्ये 3 एसी स्लीपर कोचेस, 3 एसी चेअर कार्स, 11 नॉन-एसी चेअर कार्स आणि 2 पॉवर कार्स यांचा समावेश आहे. या डब्यांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि सुधारणांचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी अनेक गोष्टी एलएचबी प्रकारच्या डब्यांमध्ये पहिल्यांदाच विकसित केल्या गेल्या आहेत.

बांगलादेश रेल्वेच्या परिचालन आणि प्रवाशांच्या गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने हे खास डबे तयार करण्यात आले आहेत. आसनव्यवस्थेमध्ये स्टेनलेस स्टीलचे आर्मरेस्ट आणि फूटरेस्ट असलेल्या खास डिझाइन केलेल्या कलत्या खुर्च्यांचा समावेश आहे, त्यामुळे प्रवाशांना विविध कोनांमध्ये अधिक आरामशीरपणे बसता येऊ शकेल अशी सोय उपलब्ध झाली आहे.

हे डबे अनेक प्रवासी-केंद्रित वैशिष्ट्यांनी युक्त आहेत, त्यामध्ये एसी डब्यांमधील पंखे, एकात्मिक सीसीटीव्ही निगराणी प्रणाली, प्रवासी अलार्म प्रणाली, अंशतः उघडता येणाऱ्या खिडक्या, शिशु संगोपन कक्ष आणि प्रार्थना कक्ष अशा सुविधांचा समावेश आहे. विशिष्ट परिचालन परिस्थिती लक्षात घेऊन, गर्दीच्या वेळी गाडीच्या छतावर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे निर्माण होणारा अतिरिक्त भार सहन करता येऊ शकेल यादृष्टीने छताची अधिक भक्कम रचना करण्यात आली आहे.

ईएन 15227 या युरोपियन मानकाचे पालन करणाऱ्या, अपघात घडला तरी सुरक्षित राहण्यायोग्य रचनेचा समावेश हे या रेल्वेगाडीचे प्रमुख तांत्रिक वैशिष्ट्य होय.तसेच, भारतीय रेल्वेच्या डब्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक 750 व्होल्ट प्रणालीऐवजी, या डब्यांची विद्युत प्रणाली 415 व्होल्ट वर चालेल अशा खास पद्धतीने तयार करण्यात आली आहे.
आरसीएफ ने 2015-16 मध्ये बांगलादेश रेल्वेला 120 एलएचबी ब्रॉड गेज प्रवासी डब्यांचा पुरवठा केल्यापासून त्यांच्यातील संबंधांची सुरुवात झाली. याच यशस्वी भागीदारीच्या जोरावर, बांगलादेश रेल्वेने 2024 मध्ये 'राइट्स' च्या माध्यमातून आरसीएफ कडे सात विविध प्रकारांच्या 200 ब्रॉड गेज प्रवासी डबे तयार करून त्यांचा पुरवठा करण्याची प्रतिष्ठेची ऑर्डर विश्वासाने सोपवली होती.
निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2297995)
आगंतुक पटल : 36