संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑपरेशन सिंदूरने जागतिक संदेश दिला आहे की, भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी मर्यादेपलीकडे प्रयत्न करील: संरक्षण मंत्री


राजनाथ सिंह यांच्या हस्ते दिल्ली कँट येथील बेस हॉस्पिटलमध्ये ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ या रक्तदान शिबिराचे उद्घाटन; रक्तदात्यांमध्ये महाराष्ट्रातील 1000 खेळाडूंचा समावेश

आज दान केलेले रक्त गरजू सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक विश्वसनीय संचय म्हणून उपयोगी पडेल: संरक्षण मंत्री

Posted On: 09 AUG 2026 1:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2026

 

“ऑपरेशन सिंदूरने आपल्या संरक्षण दलांचे अतुलनीय शौर्य जगासमोर सिद्ध केले आहे. आणि त्यातून जागतिक स्तरावर हा संदेश दिला आहे की, भारत आपल्या महिलांच्या सिंदूराचे रक्षण करताना आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाईल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते 9 ऑगस्ट 2026 रोजी दिल्ली कँट येथील बेस हॉस्पिटलमध्ये आयोजित ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ रक्तदान शिबिराला संबोधित करत होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांना नेस्तनाबूत केल्याबद्दल तसेच भारतावर वाईट नजर टाकण्याचे धाडस करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगायला लावल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय संरक्षण दलांची प्रशंसा केली.

सिंदूर महारक्तदान यात्रेशी तुलना करताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने शौर्याचे दर्शन घडवले, तर हे भव्य रक्तदान शिबिरातून करुणा आणि मानवतेची भावना दिसून येत आहे. या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 1,000 कुस्तीपटू आणि खेळाडूंचा समावेश होता. त्यांच्या सहभागातून नि:स्वार्थ सेवेची भावना आणि संरक्षण दलांप्रति एकजुटीची भावना प्रदर्शित झाली.

रक्तदात्यांचे आभार मानताना संरक्षण मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, आज दान केलेले रक्त भविष्यात गरजू सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक विश्वसनीय साठा म्हणून उपयोगी पडेल. संरक्षण मंत्र्यांनी रक्तदानाला जीवनदान आणि महादान असे संबोधले. विज्ञान आणि वैद्यकशास्त्रातील मोठी प्रगती झाली असूनही, मानवी रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय अद्याप विकसित झालेला नाही, असे ते म्हणाले. रक्त केवळ मानवी शरीरातच तयार होऊ शकते आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला दान केले जाऊ शकते, त्यामुळे रक्तदान हे सर्वात उदात्त दानांपैकी एक आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

   

प्रत्येक रक्तदाता आणि रक्त स्वीकारणारा आपापल्या परीने राष्ट्राची सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी लोकांनी, विशेषतः तरुणांनी रक्तदानाला जीवनशैलीतील एक संस्कार बनवावा, असे आवाहन त्यांनी केले. “2047 मध्ये जेव्हा आपण आपल्या स्वातंत्र्याचा शतकोत्सव साजरा करू, तेव्हा आपले ध्येय केवळ विकसित अर्थव्यवस्था निर्माण करण्यापुरते मर्यादित नसावे; आपण एका अशा करुणामय समाजाची कल्पना केली पाहिजे, जिथे लोक निरोगी आणि सुरक्षित असतील आणि रक्तासारखी मौल्यवान संसाधने गरजेच्या वेळी सहज उपलब्ध असतील,” असे ते म्हणाले.

तरुणांनी तंदुरुस्तीला प्राधान्य द्यावे असे आवाहन करताना, संरक्षण मंत्र्यांनी यावर भर दिला की, एक निरोगी आणि तंदुरुस्त व्यक्ती समाजासाठी एक मोठी संपत्ती असते आणि अशी व्यक्ती रक्तदानासारख्या उदात्त कार्यांसाठी अधिक सक्षम असते. खेलो इंडिया आणि फिट इंडिया यांसारख्या उपक्रमांद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नागरिकांना, विशेषतः तरुणांना, तंदुरुस्तीला जीवनशैली म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या शौर्य आणि करुणेच्या दीर्घ परंपरेवर प्रकाश टाकत राजनाथ सिंह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. शारीरिक शक्तीचा खरा उद्देश इतरांचे संरक्षण करणे आणि राष्ट्राचे रक्षण करणे हा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील खेळाडू आणि कुस्तीपटूंचे योगदान राष्ट्राची एक उदात्त सेवा म्हणून स्मरणात राहील, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव; महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय रवींद्र सामंत; खासदार डॉ. श्रीकांत लता एकनाथ शिंदे; लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ; सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (एएफएमएस) च्या महासंचालक सर्जन व्हाईस ॲडमिरल आरती सारिन; ॲडज्युटंट जनरल लेफ्टनंट जनरल व्ही. पी. एस. कौशिक; दिल्ली कॅन्ट येथील बेस हॉस्पिटलचे कमांडंट मेजर जनरल विशाल चौधरी तसेच इतर वरिष्ठ लष्करी आणि नागरी अधिकारी उपस्थित होते.

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांसाठी, रक्ताचा पुरेसा साठा राखणे विशेष महत्त्वाचे आहे, कारण लष्करी रुग्णालयांमध्ये नियमित आरोग्यसेवेबरोबरच लष्करी कारवाया, आघातग्रस्त रुग्ण आणि आपत्कालीन परिस्थितीमध्येही उपचार केले जातात. या रक्तदान शिबिरात सुमारे 500 स्वेच्छा रक्तदात्यांच्या सहभागाने ‘स्वत:पेक्षा सेवा श्रेष्ठ’ या तत्त्वाची पुष्टी केली आणि नियमित स्वेच्छा रक्तदानाच्या माध्यमातून प्रत्येक पात्र नागरिक जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, हे अधोरेखित झाले.

 

* * *

शिल्पा नीलकंठ/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296813) अभ्यागत कक्ष : 105