पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

NBA कडून प्रवेश व लाभवाटप यंत्रणेंतर्गत 33 राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि राष्ट्रीय संस्थांना सुमारे 3.79 कोटी रुपये वितरित


महाराष्ट्रासाठी रु. 16.15 लाख रुपये

Posted On: 09 AUG 2026 12:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2026

 

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (NBA) प्रवेश आणि लाभ वाटप अंतर्गत जवळपास 3.79 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. ही रक्कम 33 राज्य जैवविविधता मंडळे आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदा, 'आयसीएआर'-राष्ट्रीय वनस्पती आनुवंशिक संसाधन ब्यूरो (ICAR-NBPGR), तसेच हरियाणा राज्य जैवविविधता मंडळामार्फत 'हिसार बोव्हाइन स्पर्म स्टेशन अँड रिसर्च सेंटर'ला वितरित करण्यात आली आहे.

या निधी वितरणात टोमॅटो, मिरची, वांगे, फ्लॉवर, कलिंगड, कारले, दुधी भोपळा, भेंडी, मोहरीच्या विविध जाती यांसारख्या भारतातील कृषी-जैवविविधतेच्या विस्तृत श्रेणीसह, साहिवाल जातीच्या वळूंच्या गोठवलेल्या रेताचाही (Semen) समावेश आहे. भाजीपाला आणि तेलबियांच्या आनुवंशिक संसाधनांचा संशोधन तसेच व्यावसायिक वापरासाठी वापर केल्याबद्दल मेसर्स बायर सायन्स अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स एचएम क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ॲडव्हान्टा एंटरप्रायझेस लिमिटेड यांसारख्या कंपन्यांकडून ही ABS रक्कम वसूल करण्यात आली होती.

याशिवाय, श्रीलंका सरकारच्या प्राणी उत्पादन आणि आरोग्य विभागाकडून साहिवाल जातीच्या वळूंच्या रेताच्या वापरापोटी प्रवेश आणि लाभ वाटपाची रक्कम प्राप्त झाली. जैवविविधता कायदा, 2002 अंतर्गत लागू केलेली आणि नागोया कराराशी (Nagoya Protocol) सुसंगत असणारी भारताची ABS रचना, जेव्हा परदेशी वापरकर्त्यांकडून जैविक संसाधनांचा वापर केला जातो, तेव्हा लाभांचे समान वाटप सुनिश्चित करते. संबंधित कंपन्यांनी बाजारपेठा, व्यापारी किंवा मध्यस्थांमार्फत ही जैविक संसाधने मिळवल्यामुळे, त्यांच्या मूळ स्रोताची ओळख पटवणे शक्य नव्हते. अशा प्रकरणांमध्ये, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (NBA) तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या आणि प्राधिकरणाने मंजूर केलेल्या लाभ-वाटप पद्धतींचा अवलंब केला.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पीकनिहाय लागवड क्षेत्राच्या आकडेवारीचा वापर करून, ही ABS रक्कम ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संबंधित पिकांची लागवड केली जाते, तेथील राज्य जैवविविधता मंडळे (SBBs) आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदांना (UTBCs) प्रमाणात वितरित करण्यात आली. जैविक संसाधनांचा तपशील आणि लाभार्थ्यांना वितरित केलेली ABS रक्कम खालीलप्रमाणे आहे:

जैविक संसाधन

कंपनी

जारी करण्यात आलेली ABS रक्कम

राज्ये / लाभार्थी

फुलकोबी (Brassica oleracea var. botrytis) बियाण्यांच्या जाती व संकरित वाण

Bayer Science and Innovation Pvt. Ltd. & HM Clause India Pvt. Ltd.

रु. 26.98 लाख

30 SBBs/UTBCs

कलिंगड (Citrullus lanatus) बियाण्यांच्या जाती व संकरित वाण

Bayer Science and Innovation Pvt. Ltd. & HM Clause India Pvt. Ltd.

रु. 24.32 लाख

25 SBBs/UTBCs

टोमॅटो (Solanum lycopersicum) बियाण्यांच्या जाती व संकरित वाण

Bayer Science and Innovation Pvt. Ltd. & HM Clause India Pvt. Ltd.

रु. 86.56 लाख

31 SBBs/UTBCs

मिरची (Capsicum annuum) बियाण्यांच्या जाती व संकरित वाण

Bayer Science and Innovation Pvt. Ltd. & HM Clause India Pvt. Ltd.

रु. 83.76 लाख

32 SBBs/UTBCs

वांगी (Solanum melongena) बियाण्यांच्या जाती व संकरित वाण

Bayer Science and Innovation Pvt. Ltd. & HM Clause India Pvt. Ltd.

रु. 7.18 लाख

31 SBBs/UTBCs

कारले, दुधी भोपळा, वांगी, फुलकोबी, हिरवी मिरची, भेंडी आणि टोमॅटो यांचे जनुकीय वंशसाठे (Germplasm)

Advanta Enterprises Limited

रु. 148 लाख

31 SBBs/UTBCs

मोहरी (Brassica juncea) बियाण्यांच्या जाती

Advanta Enterprises Limited

रु. 0.57 लाख

ICAR-NBPGR, नवी दिल्ली

साहीवाल गोवंश (Bos indicus) वीर्य

Dept. of Animal Production & Health, Sri Lanka

रु. 0.98 लाख

Hisar Bovine Sperm Station & Research Centre (Haryana SBB मार्फत)

 

संबंधित पिकांच्या लागवडीतील राज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, ABS अंतर्गत मिळालेल्या रकमेतील सर्वाधिक हिस्सा खालील राज्यांना वितरित करण्यात आला: 

अ. क्र.

राज्य/केंद्रशासित प्रदेश

जारी करण्यात आलेली रक्कम

1.

मध्य प्रदेश

रु. 46.93 लाख

2.

पश्चिम बंगाल

रु. 44.76 लाख

3.

ओडिशा

रु. 44.08 लाख

4.

गुजरात

रु. 34.76 लाख

5.

आंध्र प्रदेश

रु. 29.21 लाख

6.

बिहार

रु. 29.20 लाख

7.

कर्नाटक

रु. 21.34 लाख

8.

छत्तीसगड

रु. 18.49 लाख

9.

तामिळनाडू

रु. 16.57 लाख

10.

उत्तर प्रदेश

रु. 16.24 लाख

11.

महाराष्ट्र

रु. 16.15 लाख

12.

तेलंगणा

रु. 9.24 लाख

13.

हरियाणा

रु. 8.76 लाख

14.

आसाम

रु. 8.49 लाख

15.

झारखंड

रु. 8.14 लाख

16.

पंजाब

रु. 7.41 लाख

17.

राजस्थान

रु. 5.17 लाख

18.

इतर

रु. 13.70 लाख

 

निधी प्राप्त करणाऱ्या राज्य जैवविविधता मंडळांना (SBBs) आणि केंद्रशासित प्रदेश जैवविविधता परिषदांना (UTBCs) या रक्कमेचा वापर विविध उपक्रमांसाठी करणे बंधनकारक आहे. यामध्ये 'लोक जैवविविधता नोंदवही' तयार करणे व अद्ययावत करणे, जैवविविधतेचे स्व-स्थाने आणि अन्य-स्थाने संरक्षण करणे, जैवविविधता वारसा स्थळांचे सक्षमीकरण, जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची क्षमता बांधणी आणि स्थानिक समुदायांचा सामाजिक-आर्थिक विकास यांसारख्या कामांचा समावेश आहे. यामुळे भारताच्या जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरातून मिळणारा लाभ हा जैवविविधतेचे रक्षण आणि स्थानिक समुदायांच्या कल्याणासाठीच पुन्हा गुंतवला जात असल्याची खात्री मिळते.

हे निधी वितरण कुन्मिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता आराखड्याच्या (Kunming-Montreal Global Biodiversity Framework) अंमलबजावणीप्रती भारताची कटिबद्धता अधोरेखित करते; विशेषतः आनुवंशिक संसाधनांच्या वापरातून मिळणाऱ्या लाभांचे न्याय्य आणि समान वाटप करण्याबाबतचे 'लक्ष्य 13' (Target 13) आणि आनुवंशिक विविधतेचे जतन करण्याबाबतचे 'लक्ष्य 4' (Target 4) पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे. तसेच, हा उपक्रम 'शाश्वत विकास ध्येये' (SDGs) साध्य करण्यातही योगदान देतो, ज्यामध्ये ध्येय 2 (भुकेचे निर्मूलन - Zero Hunger), ध्येय 12 (जबाबदार उपभोग आणि उत्पादन -Responsible Consumption and Production), ध्येय 15 (जमिनीवरील जीवन - Life on Land) आणि ध्येय 17 (ध्येयपूर्तीसाठी भागीदारी -Partnerships for the Goals) यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने (NBA) आतापर्यंत हस्तांतरित केलेली एकूण 'एबीएस' (ABS) रक्कम 166 कोटी रुपयांहून अधिक झाली असून, प्रत्येक निधी वितरणामुळे जैवविविधता संरक्षण, वैज्ञानिक संशोधन आणि भारताच्या समृद्ध जैविक संसाधनांचे जतन करणाऱ्या स्थानिक समुदायांची उपजीविका यांच्यातील नाते अधिक दृढ होत आहे.

 

* * *

शिल्पा नीलकंठ/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2296747) अभ्यागत कक्ष : 71