शिक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या 57 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित
“आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचे धाडस करणाऱ्यांसाठी आव्हानेच संधी बनतात”: पंतप्रधान
“भारताचे युवक आता केवळ जगाशी स्पर्धा करत नाहीत, तर जगाचे नेतृत्व करत आहेत”: प्रल्हाद जोशी
प्रविष्टि तिथि:
08 AUG 2026 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2026
भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीचा 57 वा दीक्षांत समारंभ आज संस्थेच्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भारताच्या विकासाच्या दिशेला आकार देण्यासाठी नवोन्मेष, संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.
भारत नव्या क्षेत्रांमध्ये प्रवेश करत असून देशाच्या युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, महत्त्वपूर्ण खनिजे, खोल समुद्रातील संशोधन आणि क्वांटम संगणन यांसारखी क्षेत्रे देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. युवकांनी राष्ट्रनिर्मितीत योगदान देताना या अत्याधुनिक क्षेत्रांमधील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

57 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारताची शिक्षणव्यवस्था “विद्यार्थीकेंद्रित, संशोधनाभिमुख आणि भविष्याची तयारी करणारी” बनली असल्याचे सांगितले. भारताचे युवक आता केवळ जगाशी स्पर्धा करत नाहीत, तर जगाचे नेतृत्व करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी भारताच्या युवकांच्या क्षमतेवर नेहमीच मोठा विश्वास व्यक्त केला असून विकसित भारत 2047 चे “प्रमुख शिल्पकार” म्हणून त्यांच्याकडे पाहिले असल्याचेही प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रपती सुवर्णपदक, संचालक सुवर्णपदक, शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक आणि परफेक्ट टेन पदकांसह विविध प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी पंतप्रधानांनी आयआयटी दिल्ली येथे ‘परम प्रज्ञा’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उच्च कार्यक्षमता असलेल्या सुपरकॉम्प्युटिंग आणि प्रकल्प क्लस्टर सुविधेचे उद्घाटन केले. देशातील अत्याधुनिक संशोधनाच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

* * *
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2296654)
आगंतुक पटल : 10