सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित - एनयूसीएफडीसी'च्या मुंबईतील नवीन कार्यालयाचे उद्घाटन


सहकार नवक्रांती कार्यक्रमादरम्यान शहरी सहकारी बँकांसाठी सुरक्षा परिचालन केंद्र आणि देशव्यापी कोअर बँकिंग सेवा यांचे अनावरण

राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण देखील होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या दृष्टिकोनाशी सुसंगत शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, सुरक्षित आणि स्पर्धात्मक बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2026 10:55PM by PIB Mumbai

 नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सहकार से समृद्धी' या दृष्टिकोनाला पुढे नेत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या 8 ऑगस्ट 2026 रोजी मुंबईत फोर्ट येथील शारदा सदन येथे राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित - एनयूसीएफडीसी'च्या नवीन कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान अमित शाह  महाराष्ट्रातील राज्य शहरी सहकारी बँक महासंघ आणि जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींशीही संवाद साधतील.

यानंतर केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या सहकार नवक्रांती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेड आणि राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाण देखील होणार आहे. या भागीदारीमुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षा मजबूत करण्यासह, तांत्रिक क्षमता आणि संस्थात्मक क्षमता वृद्धिंगत होईल.

याशिवाय शहरी सहकारी बँकांमधील सायबर सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सुरक्षा कार्यसंचालन केंद्राचे उदघाटन देखील अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. देशव्यापी सेवा पॅकेजअंतर्गत कोअर बँकिंग सेवा तसेच संबंधित पूरक सेवांचाही शुभारंभ करण्यात येणार आहे. शहरी सहकारी बँकांना आधुनिक, सुरक्षित आणि सामायिक डिजिटल बँकिंग पायाभूत सुविधा प्रदान करणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. ‘सहकार सीबीएस’शी यशस्वीपणे जोडल्या गेलेल्या पहिल्या सहा शहरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधींचाही या कार्यक्रमादरम्यान सत्कार केला जाईल.

या कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांच्या हस्ते भारतीय रिझर्व बँकेचे माजी उप महाव्यवस्थापक जी पी मिस्त्री लिखित ‘Operational Risk Management – A Practical Guide to Urban Co-operative Banks'  या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकामध्ये शहरी सहकारी बँकांना कार्यकारी जोखमींची ओळख, त्यांचे मूल्यमापन आणि त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी व्यावहारिक पातळीवरील मार्गदर्शन केले आहे. 

राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित'ची स्थापना 2 मार्च 2024 रोजी नागरी सहकारी बँकांसाठी सर्वोच्च  संस्था म्हणून करण्यात आली. या बँकांना सामायिक तंत्रज्ञान व्यासपीठ, कोअर बँकिंग सेवा, सायबर सुरक्षा उपाययोजना, क्षमता निर्माण आणि परिचालनात सहाय्य प्रदान करणे, हा त्यामागील उद्देश आहे. सामायिक सेवांमुळे प्रामुख्याने लघु आणि मध्यम शहरी सहकारी बँकाना आधुनिक बँकिंग व्यवस्थेचा अवलंब करणे शक्य होईल, ग्राहकांना सुधारित सेवा प्रदान करता येतील तसेच खाजगी आणि व्यापारी बँकांशी प्रभावीपणे स्पर्धा करणे शक्य होईल.

माधुरी पांगे/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2296428) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati