अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवरील दक्षतेत केली वाढ
प्रविष्टि तिथि:
07 AUG 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2026
महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन मोठ्या कारवायांमध्ये म्यानमारमधून तस्करी केलेले 15 किलो मेथॅम्फेटामाइन; 11 मेट्रिक टन विदेशी खसखस; आणि 10 मेट्रिक टन सुपारी जप्त केली; तीन जणांना केली अटक.
सीमापार तस्करी आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी सुरु असलेल्या सातत्यपूर्ण कारवाई अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने मिझोराम आणि आसाम मध्ये गुप्तचर माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीमध्ये म्यानमारमधून तस्करी केलेले 15 किलो मेथॅम्फेटामाइन ; 11 मेट्रिक टन विदेशी बनावटीच्या खसखशीच्या बिया आणि 10 मेट्रिक टन विदेशी सुपारी जप्त केली.

गुप्तचर माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या अमली पदार्थ विरोधी एका मोठ्या मोहिमेदरम्यान, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना आयझॉल–चम्फाई मार्गावर आयझॉलपासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर वैद्यकीय आपत्कालीन सेवेच्या नावाखाली अंमली पदार्थांची वाहतूक सुरु असल्याचा संशय आला. अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेला अडवून तपासणी केली असता रुग्णाच्या बेडजवळ ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या एचडीपीई (HDPE) पिशवीमध्ये लपवून ठेवलेली विटेच्या आकाराची एकूण 15 पाकिटे आढळून आली. या पाकिटांमध्ये एकूण 15 किलो वजनाच्या गुलाबी-केशरी रंगाच्या मेथॅम्फेटामाइन गोळ्या होत्या, ज्या सायकोट्रॉपिक पदार्थांच्या श्रेणीत मोडतात. संबंधित बेडवर एक बनावट (डमी) रुग्ण झोपवण्यात आला होता. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, हा अवैध माल म्यानमारमधून चम्फाई-झोखावथर मार्गे मिझोरममध्ये तस्करी करून आणण्यात आला होता आणि तो पुढे आसामला पाठवला जाणार होता. जप्त केलेले मेथॅम्फेटामाइन आणि ते वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी रुग्णवाहिका नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा, 1985 अन्वये जप्त करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेचा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

मेथॅम्फेटामाइन गोळ्यांना सामान्यतः "याबा" म्हणून ओळखले जाते, हे एक अत्यंत व्यसनाधीन कृत्रिम उत्तेजक औषध असून ते मानवी केंद्रीय मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. बेकायदेशीरपणे उत्पादन केलेल्या आणि म्यानमार मधून तस्करी केलेल्या मेथॅम्फेटामाइन गोळ्यांमध्ये सेवन करणाऱ्याला शारीरिक आणि मानसिक हानी पोहोचवण्याची क्षमता होती, यामध्ये व्यसन, आक्रमकता, संशयभ्रम आणि दीर्घकालीन मज्जासंस्थेचे नुकसान यांचा समावेश आहे. मेथॅम्फेटामाइन गोळ्यांमध्ये असलेली हानी पोहोचवण्याची क्षमता पाहता या कृत्रिम मनोविकारक उत्तेजक गोळ्यांवर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, 1985 अंतर्गत बंदी असून जगभरात अंमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईत त्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
दिनांक 5 आणि 6 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री, आणखी एका गुप्तचर माहितीवर आधारित मोहिमेदरम्यान, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी आसाम रायफल्सच्या मदतीने आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर येथील एका गोदामाची झडती घेतली. या कारवाईत सुमारे 11 मेट्रिक टन परदेशी बनावटीच्या खसखशीचा साठा जप्त करण्यात आला; हा साठा व्यावसायिक चहाच्या खेपेच्या खुणा असलेल्या एचडीपीई पिशव्यांमध्ये, खोक्यांमध्ये आणि गोदामात विखुरलेल्या स्वरूपात लपवून ठेवण्यात आला होता. हा माल भारत-म्यानमार सीमेवरील असुरक्षित भागातून भारतात तस्करी करून आणला गेला होता आणि तो देशाच्या विविध भागांत पुढे पाठवला जाणार होता, असे प्राथमिक तपासातून सूचित होत आहे. सुमारे.1.67 कोटी रुपये मूल्य असलेला हा पदार्थ सीमा शुल्क कायदा, 1962 अन्वये जप्त करण्यात आला आहे.
खसखशीचा वापर अनेक पाककृतींमध्ये खाद्यपदार्थ आणि मसाला म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र भारतात तिची आयात कठोर नियामक नियंत्रणांच्या अधीन आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरणाअंतर्गत खसखशीची आयात केवळ विशिष्ट देशांमधून आणि केंदीय अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोद्वारे प्रशासित नोंदणी व्यवस्थेद्वारेच केली जाऊ शकते. या उपाययोजनांचा उद्देश उत्पादनाचा माग ठेवण्याची क्षमता सुनिश्चित करणे आणि बेकायदेशीरपणे पिकवलेला माल कायदेशीर पुरवठा साखळीत येऊन त्याचा गैरवापर होऊ नये, हा आहे. नियमन नसलेल्या परदेशी खसखशीची तस्करी केवळ या नियंत्रणांना बगल देत नाही, तर कायदेशीर व्यापार आणि नियामक देखरेखीवरही विपरित परिणाम करते.
तत्पूर्वी 05.08.2026 रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रंगिया रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 22411 मधला मालाचा साठा अडवला आणि गाडीच्या पार्सल डब्यातून परदेशी उत्पत्तीच्या 10 मेट्रिक टन सुपारीच्या 120 पिशव्या जप्त केल्या. हा माल म्यानमारमधून भारतात तस्करी करून आणला गेला होता आणि ईशान्येबाहेरील बाजारांमध्ये तो पाठवला जात होता, असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. जप्त करण्यात आलेल्या या सुपारीचे मूल्य अंदाजे 1 कोटी रुपये असून, ती सीमा शुल्क कायदा, 1962 अन्वये जप्त करण्यात आली आहे.

देशाच्या ईशान्य सीमेवरून मोठ्या प्रमाणावर तस्करी केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये सुपारीचा समावेश होतो. परदेशी उत्पत्तीच्या सुपारीची मोठ्या प्रमाणावरील तस्करी सरकारी महसुलाचे मोठे नुकसान करते आणि देशांतर्गत उत्पादकांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम करते. सीमावर्ती भागातल्या संघटित तस्करी टोळ्या यात गुंतल्या असून सुपारीचा हा अवैध व्यापार रोखण्यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागत आहे.
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2296405)
आगंतुक पटल : 6