माहिती आणि प्रसारण मंत्रालय
नवीन आंतरराष्ट्रीय भागीदारी आणि सहकार्यासह ब्रिक्स वेव्हज बझार 2026 चा समारोप
एनएफडीसीने ब्राझीलच्या रिओफिल्म आणि रशियाच्या गोस्फिल्मोफॉन्ड बरोबर दृकश्राव्य सहयोगाची घोषणा केली
Posted On:
07 AUG 2026 7:15PM by PIB Mumbai
मुंबई,7 ऑगस्ट 2026
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) माध्यमातून आयोजित केलेला 'ब्रिक्स वेव्हज बझार 2026' (BRICS WAVES Bazaar 2026) आज मुंबईत यशस्वीपणे संपन्न झाला. ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार, अशा 20 देशांच्या प्रतिनिधींना एकत्र आणणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात उच्च-स्तरीय उद्योग-संवाद, व्यावसायिक नेटवर्किंग आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर चर्चा झाली.
'ब्रिक्स वेव्हज बझार मध्ये उद्योग क्षेत्रातील 900 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले. यात निर्माते, स्टुडिओ, प्रसारक, चित्रपट आयोग, एव्हीजीसी, सरकारी प्रतिनिधी, गुंतवणूकदार, तंत्रज्ञान कंपन्या आणि सर्जनशील उपक्रम चालवणाऱ्या संस्था यांच्यात 275 पेक्षा जास्त विशेष बी2बी बैठका झाल्या. या उपक्रमांनी ब्रिक्स राष्ट्रे आणि भागीदार देशांमधील नवीन सह-निर्मिती, व्यावसायिक भागीदारी, संस्थात्मक सहयोग आणि दीर्घकालीन सर्जनशील देवाणघेवाणीचा पाया रचला.
'बझार'च्या (Bazaar) निष्पत्तीबद्दल बोलताना, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले: "ब्रिक्स वेव्हज बझारने ब्रिक्स देश आणि भागीदार देशांमधील सर्जनशील सहकार्याच्या अफाट क्षमतेचे दर्शन घडवले आहे. या ठिकाणी सुरू झालेली भागीदारी आणि संवाद मजबूत सह-निर्मिती, व्यावसायिक सहयोग आणि सर्जनशील देवाणघेवाणीची सुरुवात दर्शवतात. ' वेव्हज (WAVES)' च्या माध्यमातून, जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेला बळकट करणारे शाश्वत दुवे निर्माण करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे."
प्रमुख घोषणा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य :
'ब्रिक्स वेव्हज बझार' हे बी2बी, इरादा पत्रे (एलओआय), सामंजस्य करार आणि सीमापार व्यावसायिक घोषणांच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सहयोगांसाठीचे व्यासपीठ ठरले. यात पुढील बाबींचा समावेश आहे:
एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि ब्राझीलच्या रिओ चित्रपट आयोगाचे प्रमुख डॅनियल सेली यांनी एनएफडीसी आणि रिओफिल्म यांच्यातील दृकश्राव्य सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि भारत-ब्राझील सर्जनशील भागीदारीला बळकटी देण्यासाठी, तसेच वेव्हज 2027 मध्ये ब्राझीलचा सहभाग सुलभ करण्यासाठी इरादा पत्राचे आदानप्रदान केले. यामधून भारत आणि ब्राझील यांच्यातील सर्जनशील भागीदारी अधिक बळकट झाली.

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि ब्राझीलच्या रिओ फिल्म कमिशनचे प्रमुख डॅनियल सेली यांनी ब्रिक्स वेव्ह्ज बझार 2026 दरम्यान दोन्ही संस्थांमधील दृकश्राव्य सहकार्य मजबूत करण्याबाबतच्या इरादा पत्राचे आदानप्रदान केले
- एनएफडीसी-एनएफएआय ने रशियाच्या गोसफिल्मोफॉन्ड बरोबर सुरू असलेल्या सहकार्याची घोषणा केली असून, दोन्ही एफआयएएफ सदस्य अभिलेखीय सहकार्याला अधिक औपचारिक स्वरूप देण्याच्या संधींचा शोध घेत आहेत.
- दक्षिण आफ्रिका, रशिया, थायलंड आणि कझाकस्तानमधील उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी 'ग्लोबल साउथ फिल्म फेस्टिव्हल 2027' ची घोषणा केली. उदयोन्मुख सर्जनशील अर्थव्यवस्थांमधील सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक सहकार्य अधिक दृढ करणे, हे याचे उद्दिष्ट आहे.
- 'मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया' (एमईएआय) आणि व्हिएतनाम सरकारच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयांतर्गत असलेल्या 'सिनेमा विभागाने', चित्रपट क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि एका औपचारिक द्विपक्षीय कराराच्या दिशेने पावले उचलण्यासाठी ‘रेकॉर्ड ऑफ मीटिंग’ ची घोषणा केली.
- भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (आयआयसीटी) आणि ग्राफिटी मल्टीमीडिया प्रा. लि. यांनी औद्योगिक भागीदारी, आशय निर्मिती, शैक्षणिक उपक्रम, मुद्रिकरण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
- द साऊथ ग्लोबल न्यूज या मूळच्या ब्राझील येथील माध्यम मंचाने ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये तसेच व्यापक प्रमाणावर संपूर्ण ग्लोबल साऊथ मध्ये संवाद, माध्यम सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक मजबूत करण्यासाठी एका नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे.
- भारत, ब्राझील, पोर्तुगाल आणि फ्रान्समधील भागीदार आणि सह-निर्मात्यांना एकत्र आणणाऱ्या ‘पोर्तुगीज मॅन ‘ओ वॉर या भारत-पोर्तुगाल फीचर फिल्मची घोषणा.
- कार्टिना एंटरटेनमेंट आणि वेगा फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या कोरोवा या भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असलेल्या 'कोरोवा' चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली, ज्यामुळे द्विपक्षीय सर्जनशील सहकार्य अधिक दृढ झाले आहे.
- झेक प्रोडक्शन कंपनी Movie s.r.o. आणि भारताच्या Cinema4Good यांनी टोमास बाटा यांच्यावर आधारित एका आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक महाकाव्याची घोषणा केली असून, यामध्ये भारत, चेक प्रजासत्ताक, चीन, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती येथील सहयोगी एकत्र येत आहेत.
- दक्षिण कोरियाच्या एनकोर आय एन सी (nCORE Inc.) आणि युएई-स्थित व्हिजनएक्स (VisionX) यांनी भारतात कॅलिव्हिजन एआय स्टुडिओ (Calivision AI Studio) सुरू करण्याची घोषणा केली असून, हा एआय-आधारित आशय निर्मिती स्टुडिओ, सिनेमॅटिक आणि अनुभवाधारित कथाकथन यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे.
- उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी ब्रिक्स इंडिपेंडेंट प्रोड्युसर्स अलायन्स (BIPA) चे अनावरण केले. ब्रिक्स राष्ट्रांमधील उत्पादकांना सहकार्य, गुंतवणूक, शिक्षण आणि नवोपक्रम यांच्या माध्यमातून जोडणारे एक कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जाणार आहे.
- क्लिप (KLIP), या नवीन प्रीमियम मायक्रो-ड्रामा मंचाने, आपली सर्जनशील दृष्टी आणि आगामी कार्यक्रमांची अधिकृतपणे घोषणा केली. ईटीव्हीने (ETV) आपल्या आगामी भारतीय ॲनिमे मालिकेची घोषणा केली असून दूरचित्रवाणी प्रसारणासाठी त्याचे पोस्टरही प्रदर्शित केले आहे.
- आसाम एव्हीजीसी-एक्सआर डेव्हलपमेंट असोसिएशनने गेम डेव्हलपमेंट, कॉमिक्स, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ प्रवेश आणि आयपी वितरण मजबूत करण्यासाठी गेम डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया, मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन कॉमिक्स असोसिएशन यांच्यासोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
- वैभवी स्टुडिओने त्यांच्या आगामी ॲनिमे चित्रपट 'ट्रिओ'ची घोषणा केली.
- इंडियन कॉमिक्स असोसिएशन आणि मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्य, प्रतिनिधींची देवाणघेवाण, बाजारपेठ उपलब्धता आणि बौद्धिक संपदा वितरण वाढवण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
ब्रिक्स वेव्ह्स बाजार 2026 ची यशस्वी सांगता ही ब्रिक्स देशांमधील सर्जनशील अर्थव्यवस्थेतील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. सरकार, उद्योग क्षेत्रातील नेते, निर्माते, गुंतवणूकदार आणि विविध संस्था यांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून, या बाजारपेठेने शाश्वत आंतरराष्ट्रीय भागीदारीला चालना देण्याच्या तसेच सर्जनशील उद्योगांना सांस्कृतिक मुत्सद्देगिरी आणि आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून प्रस्थापित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे.
सृजनशील उद्योगांसाठी एक समर्पित बाजारपेठ म्हणून आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमाने चित्रपट, दूरदर्शन, एव्हीजीसी-एक्सआर, गेमिंग, ॲनिमेशन, मीडिया आणि डिजिटल आशय क्षेत्रातील भागधारकांना नवीन भागीदारी निर्माण करण्यासाठी, सह-निर्मितीच्या संधी शोधण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि ब्रिक्स परिसंस्थेमध्ये सांस्कृतिक आणि सृजनशील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मंच उपलब्ध करून दिला.
माधुरी पांगे/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2296290)
अभ्यागत कक्ष : 59