संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना संबंधी संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक संपन्न
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 6 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची बैठक झाली, यावेळी टेरिटोरियल आर्मी अर्थात प्रादेशिक सेना यावर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समितीच्या सदस्यांना प्रादेशिक सेनेचे कार्यक्षेत्र, भूमिका आणि प्रमुख कामगिरी यांबाबत सविस्तर माहिती दिली. सदस्यांनी या दलाला अधिक बळकट करण्यासाठी आणि त्याची एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
आपल्या भाषणात संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विकसित भारत या संकल्पनेला पुढे नेण्यात प्रादेशिक सेनेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, संरक्षण दलांची भूमिका प्रामुख्याने सुरक्षेशी संबंधित बाबींबाबत असली तरी प्रादेशिक सेना पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवा यांसारख्या इतर क्षेत्रांमध्येही योगदान देते. प्रादेशिक सेना हे नागरिक-सैनिक या संकल्पनेचे जिवंत उदाहरण आहे. याचे सदस्य नागरी कार्यामध्ये कार्यरत असतानाच, सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षा राखण्यासाठी गणवेशही परिधान करतात.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, प्रादेशिक सेना प्रशिक्षित सैनिकांचे राखीव दल तयार करून संरक्षण दलांसाठी आरक्षित, गरज असताना सज्ज होणारी अतिरिक्त क्षमता निर्माण करते.
प्रादेशिक सेना हे एक प्रशिक्षित,प्रेरित आणि सक्षम दल असून त्यात सुमारे 44,400 कर्मचारी आणि 59 विविध विभागांचा समावेश आहे. संरक्षण मंत्र्यांनी या दलाचे वर्णन 'फर्स्ट रिस्पॉन्डर्स' अर्थात कोणत्याही संकटकाळात त्वरित प्रतिसाद देणारे असे केले, जे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी त्वरित मदत आणि आधार देतात. केरळमधील पूर, ओडिशामधील चक्रीवादळ आणि आसाममधील अलीकडील पूरपरिस्थितीच्या वेळी मदत व बचाव कार्य करण्यात तसेच गरजूंना वैद्यकीय मदत पुरवण्यात त्यांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी दखल घेतली.

पर्यावरण व्यवस्थापन आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासंदर्भात त्यांच्या योगदानाची प्रशंसा करताना राजनाथ सिंह म्हणाले की, प्रादेशिक सेनेच्या पर्यावरण कार्यदलाने आजवर सुमारे 10 कोटी रोपांची लागवड केली आहे आणि या रोपांच्या जगण्याचे प्रमाण 80-85 टक्के इतके आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या प्रादेशक सेनेने हर घर तिरंगा मोहिम अधिक उंचीवर नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
सुषमा काणे/राजेश शिरभाते/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295433)
आगंतुक पटल : 20