नागरी उड्डाण मंत्रालय
एअर इंडियाच्या AI2379 (फुकेत-दिल्ली) या विमान उड्डाणादरम्यान आज घडलेली घटना
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2026 9:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
आज दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी, एअर इंडियाच्या फ्लाइट AI2379 या एअरबस A320 (नोंदणी क्रमांक VT-EXO) विमानाला फुकेतहून दिल्लीकडे जात असताना, उड्डाणादरम्यान हवेच्या दबावामुळे हादरे जाणवले. त्यानंतर विमान त्वरित स्थिर करण्यात आले आणि ते दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्याही अडचणीशिवाय सुरक्षित उतरले.
या विमानात 3 बालकांसह 137 प्रवासी, आणि 2 वैमानिक, 6 केबिन क्रू सदस्य, असे एकूण 8 कर्मचारी होते.
विमान उतरताच खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय पथकांनी सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी केली. सविस्तर वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी आठ प्रवासी आणि चार केबिन क्रू सदस्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल केलेले सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. उर्वरित प्रवाशांना आवश्यक सहाय्य देण्यात आले.
नागरी उड्डाण मंत्र्यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव आणि DGCA चे महासंचालक यांच्यासह फोर्टिस रुग्णालयाला भेट देऊन जखमी प्रवाशांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही फोर्टिस आणि मेदान्ता रुग्णालयांना भेट दिली असून, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि सर्व आवश्यक मदत मिळावी, यासाठी ते रुग्णालय प्रशासन व विमान कंपनीशी समन्वय साधत आहेत.
विमान हँगरमध्ये हलवण्यात आले आहे आणि सविस्तर तपासणीसाठी 'फ्लाईट डेटा रेकॉर्डर' व 'कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर' सुरक्षित करण्यात आले आहेत.
DGCA ने या घटनेची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय आणि DGCA परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असून सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.



माधुरी पांगे/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294645)
आगंतुक पटल : 17