युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये मुष्टियुद्ध, ज्युदो आणि दिव्यांगांच्या ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारांत पदक पटकावलेल्यांचा, डॉ. मनसुख मांडविया यांनी केला सत्कार; पुढील पिढीला मार्गदर्शन करण्याचे क्रीडापटूंना केले आवाहन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2026 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी आज, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये मुष्टियुद्ध, ज्युदो आणि दिव्यांगांच्या ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारांत पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी करून परतलेल्या भारतीय खेळाडूंचा सत्कार केला.
विजेत्यांचे अभिनंदन करताना डॉ.मांडविया यांनी खेळाडूंना, आपल्या स्पर्धात्मक कारकिर्दीपलीकडे जाऊन पुढील पिढीतील क्रीडापटूंना मार्गदर्शन करत आणि प्रेरणा देत, भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

या सत्कार समारंभाला भारतीय मुष्टियुद्ध पथकातील सदस्य उपस्थित होते. या पथकाने 7 सुवर्ण आणि 3 रौप्य अशा एकूण 10 पदकांची कमाई करत मुष्टियुद्ध प्रकाराच्या पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले.
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी ज्युदो पथकाचाही गौरव केला. या पथकाने 2 ऐतिहासिक सुवर्णपदकांसह एकूण 4 पदके जिंकत या प्रकारात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ग्लासगोमधील उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय दिव्यांग क्रीडा क्षेत्रासाठी नवा टप्पा गाठणाऱ्या दिव्यांग-ॲथलेटिक्स पथकाचाही यावेळी गौरव करण्यात आला.

पदक विजेत्यांना सुवर्णपदकासाठी ₹30 लाख, रौप्यपदकासाठी ₹20 लाख आणि कांस्यपदकासाठी ₹10 लाख रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले.
खेळाडूंशी संवाद साधताना डॉ.मांडविया यांनी त्यांना आपल्या स्पर्धात्मक कारकिर्दीपलीकडे विचार करून भारतीय क्रीडा क्षेत्राच्या पुढील पिढीच्या जडणघडणीत योगदान देण्याचे आवाहन केले. सुधारित 'खेलो इंडिया' योजनेसाठी आता ₹36,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून, खेळाडूंनी निवृत्तीनंतर क्रीडा अकादमी स्थापन करून नव्या गुणवंत खेळाडूंची जडणघडण करण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

"तुम्ही ग्लासगोमध्ये सुवर्णपदकासाठी झुंजत असताना आम्ही ₹36,000 कोटींच्या गुंतवणुकीसह विस्तारित 'खेलो इंडिया' योजना सुरू केली. ही योजना येत्या वर्षांत भारतीय क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्यपूर्ण गुंतवणुकीला बळ देईल," असे ते पुढे म्हणाले.

आशियाई क्रीडास्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांमधील हाच उत्साह आणि जिद्द कायम राखण्याचे आवाहन डॉ. मांडविया यांनी खेळाडूंना केले. "2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी सुवर्णपदके जिंकण्यासाठी तुम्ही सर्वांनी या आत्मविश्वासाचा उपयोग करावा, अशी माझी अपेक्षा आहे. ज्यांनी रौप्य आणि कांस्यपदके जिंकली आहेत त्यांनी पुढील वेळी सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवावे, तर सुवर्णपदक विजेत्यांनी उत्कृष्टतेचा हा दर्जा कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे," असे मंत्र्यांनी सांगितले.


माधुरी पांगे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294552)
आगंतुक पटल : 13