कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदाच्या अंतर्गत ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाच्या दुसऱ्या बैठकीचे हैदराबाद इथे आयोजन

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 8:41PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षपदांतर्गत केंद्रीय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीने ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाची दुसरी बैठक, तसेच मालमत्ता वसुलीविषयक ब्रिक्स तज्ञांच्या यंत्रणेची दुसरी बैठक आयोजित केली जाणार आहे. येत्या 4 आणि 5 ऑगस्ट 2026 दरम्यान तेलंगणातील हैदराबाद इथे या बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.

लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी ही बिक्र्सच्या भारताच्या अध्यक्षपदाची संकल्पना आहे. या संकल्पनेला अनुसरूनच या बैठकांचे आयोजन केले जाणार आहे.

कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिव रचना शाह यांच्या हस्ते या बैठकीचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमात ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींसोबतच सदस्य देशांमधील वरिष्ठ धोरणकर्ते, तज्ञ, अभ्यासक तसेच भ्रष्टाचारविरोधी आणि कायदे अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

याआधी 2 आणि 3 जून 2026 रोजी आभासी पद्धतीने ब्रिक्स भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाची बैठक झाली होती. या बैठकीतल्या फलनिष्पत्तीच्या पार्श्वभूमीवर आत्ता हैदराबाद इथल्या बैठकीचे आयोजन केले जात आहे. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश मालमत्ता वसुलीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला बळकटी देणे, सीमेपलीकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणे तसेच प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे या विषयांवर चर्चा करतील.

खाली नमूद मुद्द्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सहकार्याला कशा रितीने पुढची दिशा देता येईल यावर या बैठकीतल्या चर्चेत भर दिला जाणार आहे.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये फरार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी अनौपचारिक सहकार्य बळकट करणे आणि प्रत्यार्पण प्रक्रियेला पाठबळ देणे.

मालमत्ता वसुलीविषयक ब्रिक्स तज्ञांच्या यंत्रणेच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण आणि परिचालनात्मक सहकार्याचा विस्तार करणे, आणि

वित्तीय तंत्रज्ञान (FinTech), डिजिटल मालमत्ता आणि नवीन डिजिटल वित्तीय साधनांमुळे निर्माण होणाऱ्या भ्रष्टाचारविषयक धोक्यांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच अशा धोक्यांविरोधात दिलेल्या लढ्यासंबंधीचे अनुभव आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करणे.

या मुद्यांवरील चर्चेसोबतच समांतरपणे 5 ऑगस्ट 2026 रोजी नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींच्या माध्यमातून नीतीमूल्याधारित प्रशासन या विषयावरील एका विशेष कार्यक्रमाचेही  आयोजनही केले जाणार आहे. हा कार्यक्रमामुळे ब्रिक्स सदस्य देशांसाठी तंत्रज्ञानाधारित प्रशासनाबाबतीचे अनुभव सामायिक करण्यासाठीचा एक मंच उपलब्ध होणार आहे. यासोबतच या मंचाच्या माध्यमातून डिजिटल सार्वजनिक खरेदी, नागरिकांचा सहभाग, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सार्वजनिक प्रशासनातील नैतिकतेला बळकटी देण्यासाठीच्या नवोन्मेषी पद्धती परस्परांसोबत सामायिक करण्याचीही संधी असणार आहे.

हैदराबाद इथे होणाऱ्या या बैठकीच्या माध्यमातून संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि सहकार्यात्मक उपक्रमांच्या माध्यमातून ब्रिक्स सदस्य देशांमधील प्रत्यक्ष सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठीची भारताची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. ब्रिक्स 2026 च्या भारताच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाची ही अंतिम बैठक असणार असून, बैठकीतून या वर्षभरात साध्य केलेल्या प्रगतीला बळ मिळेल, तसेच मालमत्ता वसुली, सीमेपलीकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराला प्रतिबंध, तंत्रज्ञानाधारित शासन तसेच संस्थात्मक क्षमता बांधणी या क्षेत्रांत ब्रिक्स सदस्य देशांमधील शाश्वत सहकार्याचा पाया रचला जाईल अशी अपेक्षा आहे.


शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

  

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2294066) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu